स्पेशल रिपोर्ट

केळी शेतीसाठी ऊतीसंवर्धित रोपांची लागवड फायदेशीर

अविनाश पवार

पुणे - केळीचं अधिकाधिक उत्पन्न घेता यावं यासाठी ऊती संवर्धन प्रयोगशाळेत ऊतीसंवर्धित रोपं तयार करून सुधारित केळीची शेती करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. इथं तयार झालेली ग्रेन ९८ जातीची केळीची रोपं शेतकऱ्यांना वाजवी दरात दिली जातात. यावर्षीपासून बाबू, सिमोनियम, प्यारीफैलम, थायकस अशा विविध जातींची ऊतीसंवर्धित बारा लाख रोपं तयार करण्याचा ऊती संवर्धन विभागाचा मानस आहे. यासाठी सरकारकडून या केंद्राला निधीही मंजूर करण्यात आला आहे. गरज आहे ती या केंद्रात येऊन अशा प्रकारच्या आधुनिक शेतीची कास धरण्याची.

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधील ८० टक्के शेतकरी आजही केळीच्या कंदाची पारंपरिक पद्धतीनं लागवड करताहेत. यामुळं केळी उत्पादनात नफ्यापेक्षा घटच अधिक होतेय.  केळी पिकाचं अधिकाधिक उत्पन्न शेतकऱ्याला घेता यावं यासाठी ऊती संवर्धन प्रयोगशाळेची २००७ मध्ये स्थापना झाली. पुण्यातील तळेगाव-दाभाडे इथल्या या हॉर्टिकल्चर प्रशिक्षण केंद्रात ऊतीसंवर्धित रोपं तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या केंद्रातून अनेक शेतकरी प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर आपल्या शेतीत करताहेत.

केळीच्या मृगबागेची लागवड जून-जुलै महिन्यात, तर कंदबागेची लागवड ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात करण्यात येते. बागेसाठी निवडलेल्या जमिनीचा सामू ६.५ ते ८.० च्या दरम्यान असणं गरजेचं आहे. हलक्‍या, मूरमाड, क्षारयुक्त आणि चोपण जमिनीत केळीची लागवड करू नये. महाराष्ट्रात बसराई, श्रीमंती, अर्धापुरी, ग्रॅण्ड नैन या ड्‌वार्फ कॅव्हेंडिश गटातील जाती प्रामुख्यानं लावल्या जातात. घडातील फण्यांमध्ये चांगलं अंतर, आकर्षक, किंचित वक्राकार फळं देणारी आणि बारा महिन्यांत काढणीस तयार होऊन अधिक उत्पादनं देणारी जात निवडणं गरजेचं असतं.

ऊतीसंवर्धित केळीचं रोप तयार करण्यासाठी मागील वर्षीच्या केळीच्या मृगबागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्यात येते. यातील जातिवंत आणि निरोगी बागांमधील अधिक उत्पादन देणारे मातृवृक्ष निवडले जातात. या मातृवृक्षांचे कंदच ऊती संवर्धन रोपं तयार करण्यासाठी वापरले जातात. बागेतून हे कंद आणल्यानंतर त्यांचं निर्जंतुकीकरण करण्यात येतं. केळीचं ऊतीसंवर्धित रोप तयार करण्यापूर्वी प्रयोगशाळेतील हवाबंद भागात एका विशिष्ठ तपमानात २३ प्रकारची रासायनिक द्रव्यं वापरून एक विशिष्ठ माध्यम तयार करण्यात येतं. त्यानंतर ७२ तास या माध्यमाचं निर्जंतुकीकरण केलं जातं. यात मातृवृक्ष कंदाचं बेन तयार करण्यात येतं. बाहेरील दूषित वातावरणातील कीटाणू यात येऊ नयेत याची विशेष काळजी इथं घेण्यात येते. एका रोपण केलेल्या रोपट्यापासून अनेक रोपं तयार करण्यासाठी पाच वेळा याची प्रतवारी करण्यात येते. एकूण पाच वेळा यावर रासायनिक प्रक्रिया करण्यात येते. दोन महिन्यांत या कंदाला मूळ यायला सुरुवात होते. तीन महिन्यांत याला अनेक रोपं यायला लागतात.
प्रयोगशाळेत ही ऊतीसंवर्धित रोपं काळजीपूर्वक तयार केली जातात. यामागचा मुख्य उद्देश एवढाच की, एका बादलीत या रोपाची जेव्हा वाढ होत असते, त्यात एका जीन्सपासून अनेक रोपं तयार होतात. नवजात शिशुला जन्म देणारी आई ज्याप्रमाणं बालपणात संगोपन करते, त्याप्रमाणं या ऊतीसंवर्धित रोपाची काळजी अधिकाधिक आणि दर्जेदार रोपं मिळावीत यासाठी या प्रयोगशाळेत घेतली जाते. पारंपरिक कंदाच्या लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात अनियमितता असते. एकाच वेळी संपूर्ण घड काढणीला येत नाहीत आणि घडाचं वजनही फक्त १५ ते २० किलो एवढंच असतं. परंतु ही ऊतीसंवर्धित रोपं लावल्यास बारा महिन्यांनंतर ती एकाच वेळी संपूर्ण काढणीला येतात. तसंच केळीच्या घडाचं वजनही ३५ ते ४० किलोच्या दरम्यान असतं. खोडवा आणि निडवा ही दुबार येणारी काढणीसुद्धा दर्जेदार असते. केळीच्या सुधारित आणि ऊतीसंवर्धित रोपांची लागवड केल्यास केळी उत्पादकांना यातून निश्चित दामदुप्पट नफा होईल.


Comments (1)

  • मी शेतकी अधिकारी होतो मी स्वच निवृत्ती घेतली व शेती करतो mala आपले उटी सावर्धानाचे training घ्याला आवडेल

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.