स्पेशल रिपोर्ट

आश्रमशाळा विषबाधेच्या चौकशीची मागणी

अविनाश पवार

पुणे - पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या कोळवाडी आश्रमशाळेतील चार विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा होऊन दोन विद्यार्थ्यांचा जागेवर मृत्यू झाला, तर दोन विद्यार्थी अजूनही मृत्यूशी झुंज देताहेत. या संतापजनक प्रकाराची चौकशी करण्याची मागणी जोर धरतेय. या घटनेमुळं राज्यातील आश्रमशाळांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

तीन दिवसांपूर्वी कोळवाडीमधल्या विनाअनुदानित आश्रमशाळेतले चार विद्यार्थी अत्यवस्थ अवस्थेत याच शाळेच्या मागच्या बाजूला पडले होते. शाळेतल्या इतर मुलांनी सांगितल्यानंतर शिक्षकांनी हा प्रकार संस्थाचालकांना कळवला. ओतूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या विद्यार्थ्यांना नेण्यात आल्यावर त्यातील दोन विद्यार्थी मृत झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच इतर दोन विद्यार्थी अत्यवस्थ असल्यानं त्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आता तीन दिवस उलटूनही अजून यासंदर्भात पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही. या विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याचं कारण सांगत पोलीस कारवाईकरता विलंब करताहेत, संस्थाचालक या मुलांनी बाहेरचं फरसाण खाल्ल्याचा दावा करताहेत, तर मुलांचे नातेवाईक या मुलांना बाहेरचं अन्न का खावं लागलं, याचा जाब संस्थेला विचारताहेत. खरं तर ही निवासी आश्रमशाळा असल्यानं या विद्यार्थ्यांच्या बाहेर जाण्यासंदर्भात संस्थाचालकच दोषी असल्याचं प्रकल्प अधिकारी उमाकांत शेरकर यांनी स्पष्ट केलंय. दोषी शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाली असली तरीदेखील पोलीस याकडं अजूनही गांभीर्यानं पाहात नसल्यानं पालकांतून संतापाचं वातावरण आहे.

राजकीय दबावामुळंच कारवाई नाही

ही आश्रमशाळा जुन्नर तालुक्यातील माजी आमदार बाळासाहेब दांगट चालवत आहेत. त्यामुळं राजकीय दबावामुळं कारवाई होत नसल्याची चर्चा आदिवासी पालक करताहेत. आश्रमशाळांमधली राहण्याची आणि जेवणाची योग्य व्यवस्था नसल्याचं इथल्या भेटीत समोर आलंय. सध्या कडाक्याची थंडी पडली असतानाही लहान मुलांना थंड पाण्यानं आंघोळ करावी लागत असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. शौचालयांचीसुद्धा दुरवस्था झालीय. धान्य आणि फळभाज्या यासुद्धा पुरेशा प्रमाणात नसल्याचं दिसून आलंय. यामुळंच या विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव जवळच्या उपाहारगृहात जाऊन भूक भागवावी लागत असल्याचा आरोप होतोय.

पुरेसा निधी मिळतो तरीही...

पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांमधल्या आश्रमशाळा घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या अखत्यारीत येतात. येथील प्रकल्प अधिकारी उमाकांत शेरकर यांनी या आश्रमशाळांना पुरेसा निधी उपलब्ध करून देत असल्याचं सांगितलं. एका विद्यार्थ्यामागं महिन्याला ९०० रुपये इतका खर्च दिला जातो. असं जर असेल तर विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा का दिल्या जात नाहीत, हा प्रश्न विचारला जात आहे.

23 आश्रमशाळा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वरील चार जिल्ह्यांमध्ये २३ शासकीय आश्रमशाळा आणि २४ शासकीय वसतिगृहांमध्ये मिळून एकूण ७५०० विद्यार्थी शिक्षण घेताहेत. हे विद्यार्थी आदिवासी दुर्गम भागातील असल्यानं त्यांची आणि पालकांची कित्येक दिवस भेट होत नाही. अशा परिस्थितीत संस्थाचालकच पालकांची जबाबदारी पार पाडत असतात. मात्र, दुर्दैवानं जबाबदारीचं भान विसरून केवळ अनुदान लाटण्यासाठी अनेक आश्रमशाळा चालवल्या जातायत की काय, असा प्रश्न पडतोय.

पटपडताळणी मोहिमेदरम्यान अनेक बोगस आश्रमशाळा सापडल्या होत्या. त्यावर देखील अद्याप कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. आता जुन्नर तालुक्यातल्या या प्रकारानंतर तरी सरकारला जाग येणार आहे का, हाच संतप्त सवाल आदिवासी बांधव करताहेत. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.