स्पेशल रिपोर्ट

सोनेगावच्या शेतकऱ्याची यशोगाथा

ब्युरो रिपोर्ट

गोंदिया -  धान आणि कापूस ही विदर्भातील पारंपरिक मुख्य पिकं. परंतु तिरोडा तालुक्यातील सोनेगाव येथील विठ्ठलराव पटले यांनी नवीन मार्ग अवलंबत टोमॅटोची यशस्वी शेती केलीय. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील हे मुख्य पीक नजीकच्या काळात विदर्भाच्या मातीतही रुजण्याची आशा निर्माण झालीय.

रोजचं १७,५००रु. उत्पादन

गोंदिया जिल्ह्यातील पारंपरिक शेती म्हणजे धान पीक. त्यामुळं परिसरातील इथला शेतकरीही धान पिकालाच शेतीसाठी योग्य पर्याय आहे असं मानतो. पण विठ्ठलराव पटले यांनी मात्र वेगळी वाट चोखाळत टोमॅटोची शेती करण्याचा निर्णय घेतला. हे पीक त्यांनी साडेतीन एकर शेतीमध्ये घेतलं. यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली. पाणी देण्याकरता त्यांनी ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केलाय. त्यांच्या या शेतीतून दररोज ३५ क्विंटल टोमॅटोचं उत्पादन होऊन दररोज १७,५०० रुपयांचं उत्पन्न होतं. वर्षभरात त्यांनी वीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे. 

विठ्ठलरावांच्या शेतीतील टोमॅटो आता फक्त गोंदियाच नाही, तर मध्य प्रदेश, बालाघाट, जबलपूर, छत्तीसगड, रायपूर, भिलाई, दुर्ग, नागपूर, भंडारा इत्यादी ठिकाणी विक्रीकरता जातोय. विठ्ठलरावांकडून प्रेरणा घेण्यासाठी परिसरातील इतर शेतकरीही त्यांच्या शेतामध्ये पाहणी करण्याकरता येत आहेत आणि पुढच्या वेळी आपणही या पद्धतीनं टोमॅटोची लागवड करण्याचा निर्धार करतायत. प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलराव पटले यांची 'उद्यान पंडित' पुरस्कारासाठी नोंदही करण्यात आलीय. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.