स्पेशल रिपोर्ट

मराठवाड्यातली गावं पडू लागली ओस

विवेक राजूरकर

जालना - यंदाचा दुष्काळ माणसं, जनावरांच्या जीवावर उठलाय. पाणीटंचाईनं उग्र रूप धारण केल्यानं मराठवाड्यातली अनेक गावं ओस पडू लागलीत. शेतकरीराजा घर, शेतीवाडी सोडून मुलाबाळांना घेऊन पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकू लागलाय.

शेतातील पिकं तर कधीच करपून गेलीत. मोसंबी आणि इतर फळबागा वाळून गेल्यात. पाण्याअभावी खरीप हंगाम वाया गेला, पाठोपाठ रब्बीही गेला. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून द्यायचं? अशा संकटात सापडलेल्या बळीराजानं नाईलाजानं आपल्या जनावरांनाही बाजार दाखवायला सुरुवात केलीय.

६० दिवसांत एकदा पाणी

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईनं कळस गाठलाय. यावर्षी राज्यात जालन्यात सर्वात कमी पाऊस झाला. जवळपास २८० मिलिलिटर म्हणजेच केवळ सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस या जिल्ह्यात झाला. इथं सात मध्यम, तर ५७ लघु प्रकल्प आहेत. यातील अनेक प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे चार महिन्यांपासून कोरडे आहेत. अनेक बंधाऱ्यांतील सदोषपणामुळं त्यातील पाणी केवळ १५ ते २० दिवसच टिकतं. भूगर्भातील जलपातळी चार ते पाच मीटरनं खालावलीय. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील ९७० गावांत भयानक दुष्काळी परिस्थिती आहे, त्यातील ७९९ गावांतील परिस्थिती तर अत्यंत बिकट आहे. गावांतील नळांना ६० दिवसांत एकदा पाणी येतं. ९४ गावांत ६४ तर शहरात ३० टॅंकरनं पाणीपुरवठा केला जातो. दुष्काळाच्या झळानं त्रस्त झाल्यानं गावातील लोक पाण्याअभावी आता स्थलांतर करू लागलेत.

जालन्यात स्थलांतर

जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील कर्जत गावातील शेती पाण्याअभावी पार सुकून गेलीय. येथील शेतकऱ्यांवर मोसंबीच्या बागा जळाल्यानं त्या तोडण्याची नामुष्की आलीय. काही बागा तर आता शेवटची घटका मोजताहेत. गावातील महिलांना पिण्यासाठी पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागतेय. पाण्याअभावी इथले अनेक व्यवसाय ठप्प झालेत. त्यामुळं गावातील अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी आता गाव सोडत आहेत. या गावातील लोकसंख्या जवळपास १५०० इतकी आहे. नेहमी लोकांनी गजबजलेलं हे गाव आता निर्मनुष्य झालंय. या गावातील ४० ते ५० कुटुंबीयांनी आपल्या (जवळपास ३०० ते ४०० लोकांनी गाव सोडलंय) घराला कुलूप ठोकून इथून काढता पाय घेतलाय. गावात आता फक्त आबालवृद्ध आणि काही महिला इतकेच लोक दिसताहेत. ज्यांना गाव सोडण्याचा पर्याय नाही असं कुटुंब कसंबसं तग धरून आहे. सरकार आपल्यासाठी काहीतरी व्यवस्था करील, असा विश्वास येथील लोकांना वाटतोय, मात्र अद्याप सरकारकडून कुणीही या गावांकडं फिरकलेलं नाही. हीच स्थिती राहिली तर खेडीच्या खेडी ओस पडल्याशिवाय राहणार नाहीत हेच खरं. ही कथा फक्त कर्जत गावाचीच नाही, तर जालना जिल्ह्यातील अनेक गावांत हीच परिस्थिती आहे.

जनावरं काढली विक्रीला

ज्या शेतकऱ्याला एकरी ६० ते ७० टन कापसाचं उत्पन्न मिळायचं, त्याला त्याच्या शेतात गुंतवलेला पैसाही मिळणं आता दुरापास्त झालंय. अनेक शेतकऱ्यांना डोळ्यादेखत आपल्या शेतातील ऊस पाण्याअभावी जळाल्याचं दुःख सहन करावं लागतंय. अनेकांना मुलाप्रमाणं जपलेली, वाढवलेली मोसंबीची झाडं तोडण्याची वेळ आलीय. तर चारा-पाणी नसल्यामुळं अनेकांनी आपली जनावरं विक्रीला काढलीत.  सरकारनं तर दुष्काळ जाहीर केलाय, पण प्रत्यक्षात पिकांचा पंचनामासुद्धा करण्यात आलेला नाहीये. मग नुकसानभरपाई मिळणार कशी, असा प्रश्न येथील शेतकरी विचारताहेत.

लग्नंही झाली रद्द

इतकंच नाही तर गाव-परिसरातील अनेक मुला-मुलींची लग्नंही या दुष्काळानं पुढं ढकलण्याची वेळ आलीय. त्यामुळं भविष्याचं सुखद स्वप्न पाहणाऱ्या नववधूंना यंदा कर्तव्य तर नाहीच, पण पाण्यासाठी रानोमाळ भटकणं नशिबी आलंय.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.