स्पेशल रिपोर्ट

लागवडीसाठी उपयुक्त स्कूपिंग पद्धत

शशिकांत कोरे

सातारा - स्कूपिंग पद्धतीनं ऊस बियाणं तयार करून त्याच्या रोपांची लागण केली तर पाण्याची बचत आणि एकरी 100 टनांपर्यंत उसाचं उत्पादन मिळणं शक्य होतं. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी साताराजवळच्या भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं कंबर कसलीय. त्यांनी या पद्धतीनं तब्बल दोन कोटी ऊस बियाणं तयार करण्याचा संकल्प केलाय.

या प्रकियेचा पहिला टप्पा सुरू झाला असून 50 हजार रोपं तयार होतायत.

 किसनवीर कारखान्याचा पुढाकार

पश्चिम महाराष्ट्र हा उसाचा पट्टा आहे. आता खान्देशासह मराठवाडा, विदर्भातही उसाचं उत्पादन वाढतंय. मात्र पाणीटंचाईचं भीषण संकट उभं राहिल्यानं ऊस शेती आणि साखर कारखाने अडचणीत आलेत. ऊस हे सर्वाधिक पाणी लागणारं पीक असल्यानं भविष्यात पाण्याची टंचाई राहणारच आहे. त्यामुळंच कमीत कमी पाण्यात ऊस पीक कसं घेता येईल, हे आपल्यापुढचं आव्हान आहे. त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्य़ूटसारख्या जागतिक पातळीवरच्या संस्था झटतायत. उसाला पर्यायी पीक निर्माण करण्याचाही प्रयत्न होतोय. परंतु, सध्या तरी स्कूपिंग पद्धतीनं ऊस बियाणं तयार करून त्याच्या रोपांची लागण करणं, हाच एकमेव पर्याय दिसतोय. त्यामुळंच किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं  हे पाऊल उचललंय. त्यासाठी हैदराबाद येथील ईक्कशु अॅग्रोटेक या कंपनीचं सहकार्य घेण्यात आलंय.विशेष म्हणजे, त्यांनी यामुळं कमीत कमी पाण्यात एकरी 100 टनांपर्यंत उत्पादन होतं, हे सप्रमाण सिद्ध केलंय.

 स्कूपिंग पद्धत

सर्वसाधारणपणे सध्या शेतकरी लागणीसाठी ऊस बियाणाचं एक अख्खं पेरं वापरतात. त्याऐवजी त्यातील फक्त डोळा बाजूला काढून तो मातीच्या पिशवीत लावायचा. त्यानंतर कोकोपीट, वर्मी कंपोस्ट खतांचा वापर करायचा. यामुळं ट्रेमधील रोप 30 दिवसांत तयार होतं. त्यानंतर ते शेतात लावायचं. अशी याची साधारण पद्धत आहे. एक स्क्वेअर फुटाला एक रोप याप्रमाणं लागण करायची. एक ऊस दोन ते अडीच किलोचा होतो. चार फुटांवर सरी असेल तर अडीच फुटांवर आणि पाच फुटांवर सरी असेल तर दोन फुटांवर एक रोप लावायचं. याप्रमाणं एकरी 4,356 रोपं लागतात. एक रोप अडीच किलोपर्यंत वाढलं तर एकरी 100 टन उत्पादन मिळतं, असं कृषी अधिकारी अशोक धुमाळ यांनी सांगितलं. याला ठिबक सिचन पध्दतीनं पाणी देऊनच उत्पन्न वाढवलं जातं. पाणीही कमी लागतं हेदेखील सिद्ध झालंय, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

बियाणाचा ऊस वाचून गाळप वाढेल

बियाणाच्या उसाच्या कांडीचा डोळा काढून घेतल्यान्ंतर राहिलेला ऊस गाळपासाठी उपलब्ध होतो. सध्याची पारंपरिक लागवड विचारात घेता या पद्धतीनं ऊस लागवड झाल्यास बियाणासाठी जाणारा ऊस वाचेल आणि तो मोठ्या प्रमाणात गाळपासाठी उपलब्ध होईल. सध्याची पारंपरिक ऊस शेती फायदेशीर नाही. पाणी वाचवून जादा उत्पादन देणारं हे तंत्र म्हणूनच काळाची गरज आहे. असं झालं तर... 

''घाटाघाटानं उभारी धरली

 पेरपेरांत साखर भरली

नाही वाढीस जागा उरली

रंग पानांचा हिरवा ओला'' 

…हे प्रत्यक्षात येऊन फड जोमात येणारच बघा ! 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.