स्पेशल रिपोर्ट

रेशीम शेतीतून नफा मिळवा

ब्युरो रिपोर्ट

वर्धा - कमी कालावधीत, अल्प खर्चात वर्षभरात किमान आठ वेळा उत्पन्न देणारं पीक म्हणजे रेशमाची शेती. नोकरीच्या मागं धावण्यापेक्षा आपल्या शेतात नगदी पीक घेतलं तर त्यातून मिळणारा नफा हा नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असतो. हे आपल्या शेतीत तुतीची लागवड करून झाडगावच्या भोजराज भागडे या शेतकऱ्यानं सोदाहरण दाखवून दिलंय. 

शेतीत तुतीची लागवड

वर्धा जिल्ह्यातील झाडगावातील भोजराज भागडे यांनी आपल्या साडेचार एकर शेतीमध्ये तुतीची लागवड केली. आधी कापूस, सोयाबिन या पारंपरिक पिकासोबत भाजीपाल्याचं पीक ते घेत. पण मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यानं ते पर्यायी पिकाचा शोध घेऊ लागले. तेव्हा त्यांना रेशीम उत्पादनासंदर्भात माहिती मिळाली आणि 2007मध्ये पहिल्यांदा त्यांनी आपल्या शेतात तुतीची लागवड केली. जवळचे दीड लाख रुपये खर्चून 20x50 फूट अंतराची शेड उभी केली. हळूहळू त्यांनी त्यात वाढ केली आणि आज दोन हजार स्क्वेअर फुटात त्यांचं हे शेड उभं आहे. ही शेड उभारण्यासाठी त्यांना जवळपास अडीच लाख रुपये खर्च आला. त्यांना शेड उभारणीसाठी जवळपास एक लाख रुपयांचं अनुदान मिळालं.

रेशीम शेतीतून नफा

रेशीम उत्पादन घेणारांसाठी तुतीचं खूप महत्त्व आहे. भोजराज भागडे ही तुतीची लागवड पाच बाय अडीच फुटांवर करतात. तुतीच्या पाल्याची गुणवत्ता जितकी चांगली तितकंच रेशमाच्या उत्पादनवाढीसाठी त्याची मदत होते. त्यामुळं भागडे हे तुतीच्या पानांची विशेषत्वानं काळजी घेतात. एकदा तुतीची लागवड केली की त्यापासून सहा ते सात वर्षं पानांची निर्मिती होत राहते. हीच पानं रेशीम देणाऱ्या अळ्यांचं खाद्य असतं. एका महिन्यात एका बॅचपासून उत्पादन मिळतं. सुरुवातीला शेडचं निर्जंतुकीकरण आवश्यक असतं. त्यासाठी सुरुवातीला फार्मोनिल, सायनॅटिक या निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी करतात. नंतर उत्पादन सुरू असताना विजेता, विटकेअर तसंच चुनामिश्रित पावडरची फवारणी करतात. एका बॅचमध्ये 600 अंडीपुंजांचा वापर करावा लागतो. त्यापासून त्यांना सरासरी तीन ते चार क्विंटलपर्यंत रेशीम कोष मिळतात. हे रेशीम कोष जिल्हा रेशीम कार्यालयात 178 रुपये प्रती किलोच्या हमीदरानं खरेदी केले जातात. भागडे हे व्यापाऱ्यांना किलोमागं हमीभावापेक्षा 20 रुपयांपेक्षा जास्त दरानं रेशीम कोषांची विक्री करतात. एका बॅचला दीडशे रुपयांना शंभरप्रमाणं असे 900 अंडीपुंज, व्यवस्थापनाला 3 हजार रुपये आणि उत्पादन होईपर्यंत 20 हजार रुपयांपर्यंत एकूण खर्च होतो. भागडे यांना रेशीम कोषविक्रीतून जवळपास 80 हजार रुपये मिळतात. खर्च वजा करता एका बॅचमधून 60 हजार रुपये असे 8 बॅचमधून त्यांना सरासरी चार लाख 50 हजार रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळतं.

एकूणच तरुण शेतकऱ्यांनी तुती लागवड करत रेशीम निर्मितीचा मार्ग चोखाळल्यास आर्थिक सुबत्ता साधण्यास निश्चितच हातभार लागेल. 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.