स्पेशल रिपोर्ट

डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचं आवाहन

मुश्ताक खान

चिपळूण - पाणी प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असल्यामुळं केवळ साहित्यिकांनी नाही तर एकूणचं समाजानं पाण्याबद्दल जागरुक रहावं, असं आवाहन ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना केलंय.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण कधी पाणी संपल्याचं ऐकत नाही पण खेड्यांमध्ये पाणी नाही, अशा स्वरुपाच्या बातम्या कायम येत असतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं गंभीर झालं पाहिजे, उपाय योजना करण्यासाठी अभ्यास गट तयार करुन प्रश्न सोडवण्यावर भर दिला पाहिजे, असंही कोतापल्ले म्हणाले.

पर्यायी पिकांची गरज

पिकांच्या लागवडीबद्दलही आता आपल्याला अधिक जागरुक होण्याची गरज आहे. उसासारख्या पिकाला जर सर्वाधिक पाणी लागत असेल तर त्याऐवजी बीटसारख्या पर्यायी पिकांचा विचार करावा लागेल, हेही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारनं यासाठी आयोग स्थापन करुन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असंही त्यांनी सुचवलंय. 

वाद हे जिवंत समाजाचं लक्षण

समाज किती जागरुक आहे, हे वादावरुनच कळतं. वाद होणं हे जिवंत समाजाचं लक्षण आहे. वाद होऊ नये, असं मी कधीही म्हणणार नाही. उलट वाद झालेच पाहिजेत, याच मताचा मी आहे. पण वाद चर्चेने सुटले पाहिजेत. त्यातून आपण पुढं गेलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी बोलून दाखवली. साहित्य संमेलन एक असं व्यासपीठ आहे जिथं जुन्या काळापासून सामाजिक प्रश्न मांडले जातायत. संयुक्त महाराष्ट्राचा ठराव, नामांतराचा ठराव आणि सीमा प्रश्नाबद्दल आपण ठराव मांडतो आहोत. सामाजिक प्रश्न साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडले जातात, ही आपली परंपरा आहे. त्यामुळं समाजातून नव्यानं जागरुक झालेल्या लोकांना वाटतं की आपले प्रश्नही मांडले जावेत आणि त्यात काहीच वाईट नाही. योग्य ठिकाणी त्यांच्या प्रश्नाबद्दल मी नक्कीच बोलेन, असंही कोतापल्लेंनी सांगितलं. 

वंचितांसाठी सरकार कटीबद्ध  

साहित्य संमेलनाच्या खर्चात कपात करुन उरलेला पैसा वंचित लोकांच्या कल्याणासाठी वापरावा, अशी मागणी केली जातेय. संमेलनाचा खर्च कमी झाला पाहिजे, या मताचा मी आहे हे मान्य करताना सोशीत लोकांच्या कल्याणासाठी संमेलनाचा निधी वापरण्याची गरज नाही, हेही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी स्तरावर वेगवेगळ्या विभागांत कल्याणकारी योजना असतात. वंचितांच्या उद्धारासाठी सरकार कटीबद्ध आहे, वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनीच उपाययोजना केली पाहिजे, त्यांनीच निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.