स्पेशल रिपोर्ट

बाधित शेतकऱ्यांची एकीची वज्रमूठ

अविनाश पवार, पुणे
पुणे - पुण्याजवळ चाकण येथील नियोजित विमानतळासाठी जमिनी देण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. अलीकडंच या बाधित शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ वळून लढण्याचा पवित्रा जाहीर केलाय. त्यामुळंच आतापर्यंत शांतपणं मार्गी लागत असलेल्या या प्रकल्पाची इथून पुढची वाटचाल खडतर असेल, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.

शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच विमानतळ जागेची प्रत्यक्ष पाहणी आणि त्यापाठोपाठ नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विरोध होऊ नये म्हणून केलेली विमानतळ जागेची हवाई पाहणी; यामुळं कोणत्याही परिस्थितीत खेड तालुक्यातील पाईट-कोये परिसरातच नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं यावर सत्ताधाऱ्यांनी जवळपास शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळंच बाधित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर धामणे इथं संबंधित गावातील शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये उपस्थित सर्वच शेतकऱ्यांनी हा विमानतळ कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. 

पूर्वसूचना दिली नाही

ज्या गावातील जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आलाय, त्या गावांना यासंबंधीची कोणतीही पूर्वसूचना अद्यापपर्यंत दिली गेलेली नाही. त्यामुळंच शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. आमच्या जमिनीवर विमानतळ बांधण्यापेक्षा आधी आमच्या हक्काचं भामा आसखेड धरणाचं पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. यासाठी माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्याचंही निश्चित झालंय.

भामा खोऱ्यातील शेतीच संपणार

२००९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना हा विमानतळ नको असल्यास, तो इतरत्र नेला जाईल, असं ठोस आश्वासन राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी दिलं होतं. परंतु त्याचा आता त्यांना सोयीस्कर विसर पडलाय. भामा नदीच्या दक्षिण बाजूला औद्योगिक वसाहत निर्माण झाली असून आता उत्तर बाजूला विमानतळ प्रस्तावित आहे. या महाकाय प्रकल्पामुळं भामा खोऱ्यातील संपूर्ण शेतीच संपणार आहे. बाधित होणाऱ्या गावांतील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतीशिवाय त्यांना उत्पन्नाचं दुसरं कोणतंही साधन नाही. ज्या जागी हा विमानतळ प्रस्तावित आहे ती सर्व जागा सपाट असून या जमिनीत शेतकरी विविध पिकं घेतात. यात बटाट्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. दरवर्षी बटाट्याच्या उत्पन्नाच्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल होते. शेतकऱ्यांनी बँकांचं कर्ज काढून भामा-आसखेड धरणातून आणि भामा नदीतून उपसा सिंचन योजना राबवून आपली शेती सिंचित केलेली आहे. काही शेतकऱ्यांनी तर आपली काही जमीन विकून शेती बागायत केलेली आहे. एकट्या कोये गावात चाळीसपेक्षा अधिक ट्रॅक्टर आहेत. दुसरीकडं खेड तालुक्यात विमानतळ होणार म्हणून भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणात जमिनीत आर्थिक गुंतवणूक केलीय. यामध्ये राजकारण्यांचा मोठा पैसा गुंतलाय. 

टाऊनशिपचा फायदा कोणाला?

महत्त्वाचं म्हणजे, विमानतळासोबत म्हणजे पुणे-नाशिक महामार्ग ते प्रस्तावित विमानतळाच्या दरम्यान एक नवीन टाऊनशिप निर्माण करण्याची घोषणा झालीय. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या असून कधीही ठिणगी पडून रान पेटू शकतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.