स्पेशल रिपोर्ट

कडब्याचंबी झालंय अॅडव्हान्स बुकिंग

राहुल विळदकर, अहमदनगर

''अगं बाबो...आक्षी मोरावानी कणीस हाय हो, काय इसळककर, जादू केली का भानामती? आमाला आता याचं बीज पायजे बरं का, बाजारच गाजवतो 'फुले रेवती' वापरून...!" या प्रतिक्रिया आहेत इसळक गावाला भेट देणाऱ्या बळीराजांच्या....! ऐन दुष्काळाच्या तोंडावर बाबा गोसावी कृषी गटानं ही किमया साधलीय.

पाण्याचा काटेकोर वापर, शास्त्रीय पद्धतीनं बीजप्रक्रिया आणि मशागतीपासून खळ्यापर्यंत पंचसूत्री योजना... या सगळ्याचा वापर करून त्यांनी हे मोत्यावानी भरघोस असं ज्वारीचं पीक उभं केलंय.
हंगामात पावसानं अक्षरशः चेष्टा केलेली. सरासरीच्या धड निम्मापण पाऊस नाही. अशा वेळी या गटाच्या मदतीला धावून आलं तालुक्याचं कृषी खातं. त्यांनी इसळककरांना एक पंचसूत्री कार्यक्रम दिला; ज्यात रानबांधणी, पेरणी, बीजप्रक्रिया, विरळणी आणि कोळपणी ही पाच सूत्रं अशा पद्धतीनं राबवली गेली, की आज ९-१० फुटांची ज्वारीची धाटं अशी बेगुमान वाऱ्यावर डोलतायत. एक एक कणीस असं टपोरं, मोत्यासारख्या दाण्यांचं!

यासाठी शेतकऱ्यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं संशोधन करून विकसित केलेलं फुले रेवती वाण पेरणीसाठी निवडलं. ज्याचा दाणा तजेलदार आणि वजनदारही आहे. पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांपुढं आव्हान होतं ते पाण्याचं. अवघा ४३ टक्के एवढाच झालेला पाऊस लक्षात घेऊन १०x१० आकाराचे वाफे रानबांधणीच्या वेळीच तयार केले, त्यातून पाणी वाहूनच गेलं नाही, सगळं जमिनीतच मुरवलं. १८ इंचाच्या सरी धरल्या, तेही पेरताना, दोन रोपांत १५-१५ सें.मी.चं अंतर ठेवून. गंधक, PHBची बीजप्रक्रिया केली. त्यासाठी गटासह शेतकरी खास विद्यापीठात जाऊन प्रशिक्षण घेऊन आले. अशी प्रक्रिया केल्यावर हवेतलं नत्र जातं कुठं, ते पिकांना मिळणारच, अशी जोरदार खात्री होती. शिवाय परत शिवारात येऊन कृषी खात्यानं विशेष कार्यशाळाही घेतली. रोपं डोलायला लागली, तशी दोन टप्प्यांत विरळणी केली. त्यामुळं दाट झालेली रोपं विरळ होऊन त्यांना योग्य वाढीसाठी वाव मिळाला. त्यामुळं एक रोप राजा, बाकी सगळी रंक हे टळलं. सगळ्यांनी एकत्र, जोमानं वाढण्याचा समाजवाद असा पेरला गेला. मग तीन टप्प्यांत झाली कोळपणी... अशी ही पंचसूत्री योजना.

ज्वारी हुरड्यात आली, तशी पंचसूत्रीची कमाल दिसू लागली. शेजारचा, पारंपरिक पद्धतीनं केलेला ज्वारीचा प्लॉट उगी कुपोषित झाल्यासारखा आणि बाबा गोसावी गटाच्या गायकवाडांची ज्वारी ही अशी रसरसलेली... शेजारच्या प्लॉटमध्ये बाटुक म्हणावं अशी धाटं-कणसं, तर इकडं भले पाणसोटासारखी वाढलेली फुले-रेवतीची धाटं... बरं पाण्याचं म्हणाल, तर दोघांनाही पाऊस सारखाच, पाणीही सारखंच. हा विलक्षण फरक होता शास्त्रीय पद्धतीनं, पाण्याचं सुयोग्य नियोजन करून केलेल्या आधुनिक शेतीमुळं. आता या गटाची तब्बल २५० एकरची जमीन ज्वारीच्या कणसांनी डोलतीय, तीही सगळीकडं दुष्काळाचं सावट पसरलं असताना... ज्वारीच्या विक्रीचं तर राहू द्या, नुसती धाटंच कडब्यासाठी आताच, पीक शेतात उभं असतानाच बुक झालीयेत... अॅडव्हान्स बुकिंग राजे हो अॅ़डव्हान्स बुकिंग...!

इसळकरांची ही बहारदार ज्वारी आता सोंगणीला (पिकांची काढणी) आलीये. लवकरच मळणीला जाऊल खळी धरली जातील आणि बाहेर पडणारं उत्पादन असेल एकरी तब्बल १० क्विंटल, तेही या अशा कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीत. त्याच वेळी नियोजन न करता, पारंपरिक पद्धतीनं घेतलेल्या ज्वारीचं उत्पादन फार फार तर ३ क्विंटलपर्यंत जाईल. म्हणजे तब्बल तीनपट जास्त उत्पादन गोसावी बाबा कृषी गटाला होईल. पाणी पाणी म्हणत रडत न बसता, आधुनिकतेची कास धरली आणि थोडा आळस झटकला तर सुखाच्या राशी कशा अंगणात खेळतात, ते इसळकच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय. या एका उपक्रमानं गावाचा हा परिसर अक्षरशः अॅग्रो-टुरिस्ट स्पॉट झालाय. आजवर हजारो शेतकरी आणि तज्ज्ञांनी या शेतीला भेट देऊन, अभ्यास केला. हैदराबादच्या तज्ज्ञांनी तर थेट भेटीचं आमंत्रण दिलं, शिवाय ज्वारीपासून बनणाऱ्या तब्बल ५५ उपपदार्थांचं ट्रेनिंग देण्याचं आश्वासनही या शेतकऱ्यांना दिलंय.

हे सगळं यश पाहून इसळककर सुखावले आहेत. त्याचबरोबर आता या वाणाचा ग्रामबीज उत्पादन उपक्रम राबवण्याचाही त्यांचा मानस आहे. सामूहिकतेचा संदेश देत, सामाजिक भान जपत दुष्काळावरही कशी मात करायची, ते गावकऱ्यांनी दाखवून दिलंय.

अशी आहे पंचसूत्रीः

१) रानबांधणी-मशागत, १० X १० वाफे तयार केले, त्यात पाणी मुरवलं, (फायदा - पाण्याचा निचरा नाही, जमिनीची धूप नाही)
२) बीजप्रक्रिया- बियाणे निवड- वाण फुले रेवती, गंधक वापरून बीज तयार करणे, PHB काढणे
   (फायदा- हवेतलं नत्र शोषून घेतो, पीक जोमदार, कीडविरहित राहतं.)
३) पेरणी-काटेकोर मापात सरी धरल्या, दोन्ही सरीत सरासरी अंतर १८ इंच. दोन रोपांत कमीत कमी १५ सें. मी. अंतर राहील, अशी बीजपेरणी.
४) विरळणी (दोन टप्पे) - रोपं जास्त दाट होऊ न देणे - पेरणीनंतर १५ ते २० दिवसांत, त्यामुळं सगळ्या रोपांना हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश समसमान
५) कोळपणी - (३ टप्पे.)- पहिली ३ आठवड्यांनंतर, दुसरी ५ आठवड्यांनंतर, तिसरी ८ आठवड्यांनंतर. (फायदा- जमिनीला पडलेल्या भेगांत माती सारखी होते, त्यामुळं भेगांमधून होणारं बाष्पीभवन टाळलं जातं.)


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.