स्पेशल रिपोर्ट

बँका कर्ज देईना.. योजना पदरी पडेना!

प्रवीण मनोहर, अमरावती
राज्य सरकार वंचित घटकांच्या कल्याणासाठी कल्याणकारी योजना राबवत असतं. परंतु त्यात अशी काही ग्यानबाची मेख असते की, त्याचा लाभ लोकांना घेताच येत नाही. पशुसंवर्धन विभागाच्या नावीन्यपूर्ण योजनेतही काहीसं असंच घडलंय. दारिद्र्य रेषेखालील लोकांना लाभार्थी होण्यासाठीचा वाटा भरता येत नाही. भरलाच तर बँका कर्ज देत नाहीत आणि योजना पदरी पडत नाहीत.
 

pashusamvardhanनावीन्यपूर्ण योजना
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागानं गेल्या वर्षापासून नावीन्यपूर्ण योजना सुरू केलीय. या योजनेअंतर्गत दुधाळ जनावरं आणि शेळीवाटप करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं असून, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्यात आलाय. मात्र दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्याची पैसे भरण्याची क्षमता नसल्यानं निवड होऊनही त्यांच्या पदरी प्रत्यक्ष लाभ पडतच नाही.

दुधाळ जनावराची (म्हशी) योजना ही 3लक्ष50हजाराची, तर शेळ्यांची योजना ही 64 हजारांची आहे. यात लाभार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार लाभार्थी हिस्सा भरावयाचा आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थींना योजनेच्या 25टक्के, तर इतरांसाठी 50 टक्के रक्कम भरावी लागते. दोन्ही योजनेत लाभार्थ्याची निवड करण्याचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे.

1) दारिद्र्य रेषेखालील

2) अत्यल्प भूधारक (एक हेक्टर भूधारक)

3) अल्पभूधारक (1ते 2 हेक्टर भूधारक )

4) सुशिक्षित बेरोजगार

5) बचत गट सदस्य

या योजनेची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आल्यानं दुधाळ जनावरं गटात जिल्ह्यातील 14 तालुक्यांतून एकूण 7 हजार, 137 अर्ज आले, तर शेळी गटात 12,698 अर्ज आले. या योजनेत प्राधान्यक्रमानुसार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्याची निवड करण्यात आली. दुधाळ जनावरांच्या गटात फक्त 38 तर शेळी गटात केवळ 94 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यातही लाभार्थ्यांची हिस्सा भरण्याची क्षमता नसल्यानं त्यांना या योजनेपासून वंचितच राहावं लागत आहे.

दुधाळ गटात एपीएल – 4228 तर बिपीएल - 2909 अशा एकूण - 7137 उमेदवारांनी अर्ज केलेत. मात्र, या योजनेत निवड फक्त 38 लाभार्थ्यांचीच करण्यात आली. त्यातही प्रत्यक्ष लाभ 18 लाभार्थ्यांनाच देण्यात आलाय. त्याला कारण म्हणजे लाभार्थी हिस्सा भरण्यासंबंधातील अडचणी

पैशांअभावी वंचितच
अमरावती तालुक्यातून निवड झालेला अनिल सोळंकेला लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी पैसे जमवता न आल्यानं निवड होऊनही त्याला योजनेपासून वंचित राहावं लागलं. सोळंके हा दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असून त्याचं वार्षिक उत्पन्न 20,000 च्या आत आहे. या योजनेत मात्र त्याला 25 टक्के रक्क्म म्हणजे जवळपास 80,000रुपये भरायचे होते. त्यानं निवड झाल्यावर पंचायत समितीशी संपर्क साधला तेव्हा त्याला 50टक्के म्हणजेच 1लाख 62 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. योजनेत सांगितल्याप्रमाणे तो बँकाकडं गेला. मात्र दारिद्र्य रेषेखालील माणसाला कर्जच देणं बँकांनी नाकारलं. सरतेशेवटी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रं गोळा करण्यासाठी केलेला खर्च आणि बुडालेली मजुरी या नुकसानीशिवाय त्याच्या हाती काहीच लागलं नाही. त्याचा सोबती मारोती मोहोडनंही आपला अर्ज भरला होता. मात्र, त्याची निवड झाली नाही. त्याला तर वाटतंय की बरं झालं आपली निवड झाली नाही. निवड झाली असती तर कोठून आणले असते इतके पैसे?

अधिकारी झटकतायत हात 
या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांकडं विचारणा केली असता त्यांनी बँकेनं कर्जपुरवठा करणं किंवा न करणं हे बँक आणि लाभार्थी यांच्या संबंधांवर अवलंबून असल्याचं तांत्रिक कारण देऊन हात झटकले.

वास्तवाचा विचार करा
दारिद्य ऱेषेखालील लाभार्थ्याला बँक 1लक्ष 62 हजाराचं कर्ज देईल का? या सोप्या प्रश्नाचं उत्तर “नाहीच” असतं. अशा परिस्थितीत खाजगी सावकार किंवा नातेवाईक यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनीही नाकारलं तर योजनेपासून वंचित राहण्याशिवाय त्यांच्यापुढं पर्याय नसतो. योजना तयार करताना, अंमलबजावणी करताना वास्तविकतेचा विचार होणं गरजेचं असल्याचं लोकांचं मत आहे. योजना थोडी लहान करा, पण आम्हाला झेपेल एवढंच द्या, असं लाभार्थ्यांचं मत आहे.

पुनर्विचार गरजेचा
दुधाळ जनावरं गटात 7137 अर्ज आले, शेळी गटात 12हजार 698 अर्ज आले यावरून ही योजना नावीन्यपूर्ण असण्याबाबत काही दुमत नाही. मात्र निवड जेव्हा अनुक्रमे केवळ 38 व 94 लाभार्थ्यांचीच होते आणि त्यातही प्रत्यक्ष लाभ मात्र अनुक्रमे 18 व 68 लाभार्थ्यांनाच मिळतो तेव्हा या योजनेसंदर्भात पुनर्विचार होणं गरजेचं आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना या वर्षासाठीही मंजूर करण्यात आलीय. मात्र स्वरूप जैसे थे आहे. त्यामुळं सरकारला नेमकं काय करायचंय, असा प्रश्न निर्माण होतो.


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.