स्पेशल रिपोर्ट

दापोलीतही होतेय स्ट्रॉबेरी

मुश्ताक खान, दापोली
स्ट्रॉबेरी कुठं होते, हा प्रश्न जर कुणाला विचारला तर आपसूकच उत्तर एकच महाबळेश्वरमध्ये. पण महाबळेश्वरची मक्तेदारी मोडीत काढत दापोलीही स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी सज्ज झालीय. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं ही किमया साधली असून शेतकऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलंय. दापोली हे कोकणातलं महाबळेश्वर आहे, यावर यामुळं शिक्कामोर्तब झालंय.
 

Dapoliस्ट्रॉबेरी हे थंड हवामानात येणारं पीक आहे. या पिकाला २५ डीग्री सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची गरज असते. दापोली इथल्या सिंचन आणि निचरा विभागानं गेल्या वर्षी स्ट्रॉबेरीच्या स्वीट चार्ली, कामारोजा आणि विंटर टोन अशा तीन प्रजातींची लागवड केली होती. त्यापैकी स्वीट चार्लीनं इथल्या वातावरणाला चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाच्या हंगामात प्रयोगिक तत्वावर 6 गुंठ्यामध्ये स्वीट चार्लीची लागवड करण्यात आली.
गेल्या आठवड्यामध्ये १५ किलो स्ट्रॉबेरीची विक्रीही झाली. पर्यटकांची संख्या दापोलीत वाढू लागल्याने स्ट्रॉबेरी काढण्याआधिच बुकिंग केली जात आहे, अशी माहीती सिंचन तज्ज्ञ डॉ. महानंद माने यांनी दिली. २० नोव्हेंबर २०१२ रोजी लावलेलं हे पीक मार्च – एप्रिलपर्यंत उत्पादन देतं. त्यामुळं दापोलीतल्या शेतकऱ्यांनीही या पिकाकडं वळायला काहीच हरकत नाही, असं मतही डॉ. माने यांनी व्यक्त केलं आहे.
लागवड पद्धत
सर्व प्रथम जमीन चांगली नांगरुन आणि कुळवून घ्यावी. त्यानंतर त्यात शेण खत मिसळून घ्यावे. मग त्या जमिनीवर ७० सेंटीमीटर रुंदीचे उंच वाफे बनवून घ्यावेत आणि त्या वाफ्यावर ठिबक नळी (लॅटरल) अंथरुन घ्यावी. त्यावरच पंचवीस मायक्रॉन जाडीचा सिल्व्हर-काळ्या रंगाचा कागद टाकावा. या कागदाचा सिल्व्हर रंग वर आणि काळा खाली असावा. त्यानंतर जिथे रोपे लावायची त्या ठिकाणी ५ सेंटीमीटर व्यासाची छिद्रे करुन रोपांची लागवड करावी... ही लागवड जोड ओळ पद्धतीने करावी आणि दोन ओळीतील अंतर ३० सेंटी मीटर ठेवावे. त्याचबोरबर २ रोपातील अंतरही ३० सेंटी मीटरच असावे.
अर्थशास्त्र
स्ट्रॉबेरीजची एका हेक्टरमध्ये ६०-६५ हजार रोपे लावता येतात. जर या पीकाला एकदमच पोशक वातावरण असेल तर एका झाडाला दोनशे ग्राम उत्पादन मिळते. वातावरणा जर थोडा फार बदल झाला तरी दिडशे ग्रामपर्यंत उत्पादन मिळवता येतं. अशा प्रकारे दर हेक्टरी १२ ते १४ टन उत्पादन मिळू शकतं. स्ट्रॉबेरीजना १०० ते १५० रुपये प्रति किलो दर मिळतं. जर ढोबळ मनाने १०० रुपये प्रति किलो दर धरले तरी हेक्टरी १२ लाख रुपये मिळू शकतात. यातील रोपांना तीन रुपये प्रमाणे धरले खर्च जवळपास २ लाखांपर्यंत जातो. ठिबक सिंचनासाठी ८० हजार, मजूरी, ओषधे आणि पॅकिंगसाठी ४० हजार रुपये खर्च येतो. त्याचबरोबर अकाळी संकटांच्या उपाय योजनेसाठीही काही खर्च केला तरीही नफा ५ ते ९ लाखापर्यंत मिळू शकतो. 


Comments (6)

Load More

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.