स्पेशल रिपोर्ट

आमचे संसार, आमची बाळं वाचवा!

विवेक राजूरकर, चापानेर, औरंगाबाद
"गावातील इतरांप्रमाणं माझे बाबाही दारू पितात. आईनं कष्टानं कमवलेले पैसेही जबरदस्तीनं दारूसाठीच खर्च होतात. आमच्या भविष्याचं काय?” हा प्रश्न विचारलाय सहावीत शिकणाऱ्या मयुरी पवार या चिमुरडीनं.  दारूबंदीसाठी इथल्या महिलांनी सुरू केलेल्या लढ्यात ही चिमुरडीही हिरिरीनं उतरलीय. हे चित्र फक्त तिच्या घरातलं नाहीये, तर चापानेर गावातील प्रत्येक घरात, तसंच कन्नड तालुक्यातील अनेक गावांत पाहायला मिळतंय. दारूबंदीसाठी इथल्या महिलांनी पुकारलेला हा लढा दारूबंदी होईपर्यंत सुरूच राहणार आहे.
 


कन्नड तालुक्यातील चंपानेर गावातील महिला डोळ्यात प्राण आणून वाट पाहताहेत ती गावातून कायमची दारूबंदी होईल या दिवसाची... कारण या दारूपायी या गावातील अनेक घरांची धूळधाण झालीय. अनेक संसार देशोधडीला लागलेत. अनेक महिलाचं कुंकू पुसलं गेलं तर अनेक म्हाताऱ्यांनी आपला कर्तासवरता मुलगा या व्यसनापायी गमावलाय.

 

aur4तरुण मुलंही दारूच्या अधीन

आता तर या गावातील महिलांची सहनशक्ती संपत आलीय आणि हे दिवस पाहण्याअगोदर आपण मेलो असतो तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया प्रत्येक पीडित महिलेची आहे. या ठिकाणी तुम्ही-आम्ही असतो तर तुमच्याही याच भावना असत्या यात शंका नाही. शालेय जीवनातील कोवळं वय असणारी १५ ते २० वयोगटातील मुलं आता चक्क दारूच्या अधीन झालीत. आई-वडिलांना रोज शिवीगाळ, दारूसाठी पैसे मागणं आणि नाही दिले तर मारहाण इतक्या खालच्या थराला ही मुलं गेलीत. इतकंच नाही तर या दारूसोबतच आता गुटखा, सिगारेट, मटका, जुगार, पत्ते या सर्व गोष्टींकडंही तरुण पिढी वळताना दिसतेय.

 

चापानेरच्या महिलांचा लढा

इथल्या महिलांनी या व्यसनाविरोधात मोहीम उघडलीय. त्यांचं म्हणणं आहे की, आपण वयस्कर मंडळींना व्यसनापासून वाचवू शकलो नाही. निदान आपल्या तरुण मुलांना तरी या व्यसनापासून सोडवण्यासाठी चापानेरच्या महिलांनी लढा पुकारलाय. यासाठी त्यांनी तालुका, शहर, जिल्हा उत्पादन शुल्क खात्यावर दोनदा मोर्चाही नेला. गावात दारूबंदी झालीच पाहिजे. गावातील दारूचं दुकान कायमचं बंद झालं पाहिजे यासाठी त्यांनी अनेक धरणं, आंदोलनं केलीत. शासनाकडं अर्ज, आर्जवं केली. मात्र गेंड्याची कातडी पांघरूण बसलेलं सरकार मात्र शासकीय अध्यादेशाच्या नावानं या महिलांच्या मागणीला कचऱ्याची टोपली दाखवत आहे. कारण सरकारला या व्यवसायातून कराच्या रूपात सर्वात जास्त निधी मिळतो. मात्र सरकारला लोकांच्या सुखी संसारापेक्षा आपलं उत्पन्न जास्त महत्त्वाचं वाटतं. ग्रामसभेत ठराव पास करा, नंतर शासनाकडून परीक्षण करून घ्या, नंतर अहवाल मग विचार, नंतर उपचार अशा प्रकारे या महिलांना तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिळत आहे. मात्र याच्या लढ्याला यश काही मिळत नाही. तरीही या महिलांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे.

 

मुलांच्या व्यसनमुक्तीसाठी मंदिरात पारायणं

या महिलांनी मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी मंदिरात पारायणंसुद्धा ठेवली आहेत. सरकार नाही तर मायबाप ईश्वर तरी आपल्या मुलांना या व्यसनापासून दूर ठेवेल, असा भोळाभाबडा आत्मविश्वास त्यांना आहे. दारूचं दुकान चालवणाऱ्या धनदांडग्यांना कायद्यातील अनेक पळवाटा माहीत आहे. नेमका ते त्याचा वापर करत अनेक अधिकाऱ्यांना अनेक गावकऱ्यांना आपल्या कृष्णकृत्यात सामील करून घेताहेत. दारूबंदीतील सहभागी महिलांच्या नवऱ्यांना चिथावून त्यांनाच फुकट दारू पाजण्याचा प्रकारही इथले हे दारूमाफिया करताना दिसताहेत. परिणामी दारूबंदीच्या लढ्यातील सहभागी महिलांचं खच्चीकरण करण्याचा प्रकार येथे सर्रास चालू आहे.

 

महिलांच्या लढ्यात तरुणांचं पाठबळ

कायद्यातील किचकट बाबी समजावून देण्यासाठी या महिलांच्या लढ्यात आता उत्कर्ष प्रतिष्ठानची तरुण मुलंदेखील सामील झाली आहेत. यामुळं चापानेर इथल्या महिलांच्या लढ्याला तरुण बळ मिळालं आहे. त्यामुळं ते आणखी जोमानं हा लढा लढणार आहेत. मात्र सरकारनं प्रयत्न केल्यास ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पास झाल्याबरोबर लगेचच निर्णय घेऊन कमीत कमी दिवसात योग्य निर्णय घेतला तर परिणामी दारूमुळं उद्ध्वस्त होणारे हजारो संसार वाचवता येतील, यात शंका नाही. मात्र यासाठी सरकारची आणि नेत्यांची सकारात्मक, प्रबळ इच्छाशक्ती असावयास हवी अन्यथा दारूबंदी ही फक्त घोषणाच ठरेल. बाकी उरेल ती अनेक संसारांची राखरांगोळी.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.