शेतीचा गंधही नसलेल्या लता यांनी त्यांचे पती रमेश पाटील यांच्या अपघाती निधनानंतर शेतात जाण्यास सुरुवात केली. शेतीची काहीच माहिती नसल्यानं त्यांनी प्रथम शेतीबाबतच्या सर्व गोष्टींची माहिती करून घेतली. आपली दोन मुलं आणि घर सांभाळून लता यांनी इतर पिकांसोबतच फळशेतीचीही परिपूर्ण माहिती घेतली आणि या फळबागांची लागवड आपल्या शेतात करण्यास सुरुवात केली. आज लता यांना या फळांच्या शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळतंय, तसंच त्यांची ही शेती गावात चर्चेचा विषय ठरलीय.
वर्षाला २० ते २२ लाखांचं उत्पन्न
केवळ शेतीपुरतंच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं नाही तर घर सांभाळून शेतमजुरांवर लक्ष ठेवणं, उत्पादित केलेला माल बाजारात पोहोचवणं यांसारखी बाहेरची कामंसुध्दा लता स्वतःच करतात. या सगळ्या शेतीतून लता यांना सर्व खर्च जाऊन वर्षाला २० ते २२ लाखांचं उत्पन्न मिळतं, एवढंच नाही तर ज्या पध्दतीनं लता फळांची लागवड करतात त्यापद्धतीनं संपूर्ण वर्धा जिल्ह्यात अशी शेती कोणीच करत नाहीये. त्यामुळं त्यांची ही शेती एक आदर्श शेती म्हणून पाहिली जातेय.
विविध जातींची सीताफळं
आपल्या ३५ एकर शेतामध्ये लता यांनी २ एकरमध्ये सीताफळ, ४ एकरमध्ये चिकू, ४ एकरमध्ये लिंबू, तर उर्वरित जागेवर आवळा, संत्री आणि मोसंबी लावली आहे. त्यांचा मुलगा पंकज नागपूरमध्ये शिक्षण घेतोय, शिवाय आईला शेतीतही मदत करतो. लतांच्या या बागेचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची पपई आणि सीताफळाची नर्सरी पंकजनं तयार केलीय.
यामध्ये वेगवेगळ्या जातींची सीताफळं असून सीताफळाचं मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेतलं जातं. त्याचप्रमाणे पपईच्या रोपांची लागवडसुद्धा या नर्सरीत केली जाते. त्यांनी तयार केलेल्या रोपांना बाजारात विशेष मागणी आहे. त्याचप्रमाणं लिंबू, आवळा या पिकांमुळंही त्यांना बऱ्यापैकी पैसा मिळतोय.
सेंद्रीय खतांचा वापर
लता या शेतीत कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर करत नाहीत. त्याउलट त्या शेण, गोमूत्र, गूळ यांपासून नैसर्गिक खत तयार करतात. त्यामुळं येणारं फळ उत्पादन अत्यंत उत्तम प्रकारचं असतं. शिवाय या खतामुळं फळझाडांची वाढही चांगली होते. पती रमेश पाटील यांनी लावलेल्या या फळबागेला आज सहा वर्षांनंतरही लता यांनी फक्त जगवलंच नाही, तर या बागेला एका आदर्श बागेचं स्वरूप दिलंय. त्यांचे हे प्रयत्न जिल्ह्यातील तसंच राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी एक आदर्श उदाहरण बनलंय.
संपर्क : लता पाटील - 9822363402
Comments
- No comments found