स्पेशल रिपोर्ट

नेरपिंगळाईत भरलाय डिजिटल वर्ग

प्रवीण मनोहर, अमरावती
सध्याच्या जिल्हा परिषदांच्या शाळांची अवस्था काय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुलांना चांगल्या गुणवत्तेचं शिक्षण मिळावं, यासाठी जागरूक असलेले पालक त्यामुळंच नाईलाजानं खाजगी शाळांची वाट धरतात. पण शिक्षक आणि गावकरी यांनी मनात आणलं तर गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतही डिजिटल वर्ग भरू शकतात. ही अतिशयोक्ती नाही तर मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील प्राथमिक कन्या शाळेनं हे सिद्ध करून दाखवलंय. आता शिक्षकांनी सीबीएससी, आयसीएससी पॅटर्नप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यासाठी कंबर कसलीय.
 

शाळेत एलसीडी प्रोजेक्टर
अलीकडं सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर पैसा ओतला जातोय. तसंच शाळांना संगणक आणि अभ्यासाचं साहित्यही दिलं जातंय. परंतु शाळांना दिलेल्या संगणकांचा उपयोग मात्र योग्य रीतीनं होताना दिसत नाहीये. परंतु अमरावती जिल्ह्यातील नेरपिंगळाई गावातील प्राथमिक कऩ्या शाळेतील शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील नेहमीच्या शिकवणुकीच्या तंत्राला फाटा देत या शाळेत सीबीएससी, आयसीएससी पॅटर्नवर आधारित सुविधा दिल्यात. यासाठी या शाळेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळालेल्या संगणकाला एलसीडी प्रोजेक्टरची जोड देऊन एक डिजिटल क्लास रूम बनवलीय. वेदांता फाऊंडेशननं यासाठी शाळेला ऑडिओ व्हिज्युअल शैक्षणिक साहित्य पुरवलंय.

111डिजिटलमुळं शिक्षण झालं सोपं
या डिजिटल क्लास रूममुळं सर्वसाधारणपणं जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, भूगोल यासारखे क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना समजावून देणं सोपं झालंय. शरीररचनेसारखा गहन विषय शिकवत असताना त्यातील रक्ताभिसरणाची क्रिया समजावून सांगताना ती विदयार्थिनींना कळण्यास अवघड वाटे. पण, आता या डिजिटल क्लासरूममुळं असे विषय शिकवणं अधिक सुलभ झालंय. सूर्यमालेसंदर्भातील घडामोडी समजावून सांगताना आजपर्यंत चंद्र, सूर्य, तारे यांची फक्त कल्पना करून थांबावं लागायचं. पण डिजिटलायझेशनमुळं मुलींना सूर्यमालेतील विविध बारकावे, तसंच ग्रहणं कशी लागतात, हे समजवणं खूपच सोप्पं आणि मनोरंजक झालंय.

 आदर्श बनलीय शाळा

या डिजिटल क्लास रूममध्ये शिकवणारे शिक्षकही विषयांचा आनंद घेत आहेत. आज ही जिल्हा परिषदेची शाळा इतर शाळांसाठी आदर्श ठरलीय. या शाळेत राबवण्यात येणारा हा प्रयोग जर इतर जिल्हा परिषदेच्या शाळांनीही राबवला, तर या शाळांना नको रे बाबा, म्हणण्याची वेळ पालकांवर येणार नाही. उलट खाजगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा बाजी मारणारा दिवस उजाडायला जास्त दिवस लागणार नाहीत. तसंच खाजगी शाळांमध्ये आकारल्या जाणाऱ्या भरमसाट फीवाढीपासूनही पालक मोकळा श्वास घेतील. तर जिल्हा परिषदेच्या शाळाही कात टाकू लागल्या आहेत.

Comments (4)

  • प्रविणजी,धन्यवाद .आपण माझ्या स्टोरीला अँप्रीसिएट केलं मात्र खर तर त्या कंटेट मध्येच दम होता.

  • जिल्हा परिषदेत अशा उत्कृष्ट शाळा आहेत याचा मला अभिमान आहे, पालकांनी आपली मानसिकता बदल्विली पाहिजे आणि आपल्या मुलांना अशा शाळेत प्रवेश दिला पाहिजे सुरवात आपल्यापासूनच करूया . अभिनंदन खेरडे सरांचे आणि त्यांच्या चमूचे

  • प्रथम श्री प्रवीन मनोहर यांचे अभिनन्दन आणि धन्यवाद की त्यानी हा प्रयोग जगासमोर आणला. मज़े मित्र श्री मंगेश खेरदे याना शुभेच्ह्या.

  • जिल्हा परिषद् कन्या शाला nerpinglaine अतिशय सुन्दर अशी मोहिम हाथी घेतलेली आहे.हल्लिचा जिल्हा परिषद् शाला ओस पड़त आहेत त्यानी पण या शालेचे मार्गदर्शन घेउन आपल्या शालेचा दर्ज्या उचावंयाचा प्रय्त्न्ना करावा .

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.