स्पेशल रिपोर्ट

महिला शिक्षिकांची यशोगाथा

यशवंत यादव, सोलापूर
आईवडिलांच्या मायेचा ओलावा, मार्गदर्शन जर शाळेतही मिळू लागलं तर कुठलं मूल शाळेत जाताना नको रे बाबा शाळा...असं म्हणेल? सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील प्राथमिक शाळेत हाच प्रेमाचा गोडवा तिथल्या शिक्षकांनी दिलाय. म्हणूनच या मुलांना शाळा आणि घर याच्यात फरक वाटत नाही. केवळ यावरच न थांबता विद्यार्थ्यांना योग्य मूल्यशिक्षण दिल्यामुळं त्याचं फळ या मुलांच्या बोलण्यातून जाणवतं. महत्त्वाचं म्हणजे, या शाळेतील सर्व शिक्षक महिला आहेत.
 

या शाळेतील शिक्षिका गावातील मुलांना अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवत आहेत. मुलांना मूल्यशिक्षण दिल्यामुळं आणि या महिला शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचं प्रतिबिंब या मुलांच्या गुणवत्तेतून जाणवतं. आज इथं गुणवत्ताक्षम विद्यार्थी घडवण्याचं काम त्या करीत आहेत. महिला शिक्षिका किती चांगलं काम करू शकतात याचं त्यांनी उदाहरण घालून दिलं आहे. या शिक्षिका मुलांना फार प्रेमानं शिकवतात,

solapur takli`झेडपी` शाळा खासगी शाळांच्याही पुढे
खासगी शाळांच्या स्पर्धेपुढं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा टिकतील का? अशी शंका अनेक जण व्यक्त करतात. परंतु या शाळेला भेट दिल्यावर हो टिकतील आणि पुढेही जातील, अशी खात्री कुणालाही वाटेल. या शाळेचं गुणवान विद्यार्थी पाहून असा उपक्रम राबवणाऱ्या प्राथमिक शाळा खासगी शाळांनाही मागे टाकतील याची खात्री पटते. या चिमुरड्यांमध्ये ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम या महिला शिक्षक अत्यंत उत्साहानं करत आहेत.

शिक्षिकांनी चालवलेली आदर्श शाळा
इथं सर्व महिला शिक्षका आहेत. 132 मुलं, 132 मुली असा मिळून पटसंख्या 264 आहे. या शिक्षिका अतिशय तळमळीनं शिकवतात. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता दिसू लागलीय. सरपंच नंदकुमार वाघमारे यांच्यासह पालकही त्यामुळं कौतुक करतात. शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कविता-गायन स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, खेळ, असे विविध प्रकल्प राबवले जातात. यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. सर्व शिक्षा अभियानाद्वारे या शाळेचा विकास झालाय. शासनाचा शालेय पोषण आहार, उपस्थिती भत्ता, मोफत पाठ्यपुस्तक, सावित्रीबाई फुले दत्तक योजना या योजनांमुळं विद्यार्थ्यांची गळती थांबून हजेरी वाढलीय. नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचे विद्यार्थी राज्यस्तरावर चमकले आहेत. मुख्याध्यापिका- सुवर्णा गवसने, उपशिक्षिका- शोभा पाटील, शोभा खुने, सुलोचना मोरे, पवित्रा शेळके, सारिका फासे, छाया मसलखांब या शाळेचा कार्यभार पाहतात.

तालुक्यातील उपक्रमशील शाळा
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी, बोहाळी, माळवाडी (वाखरी) यादेखील आदर्श, उपक्रमशील आणि प्रेरणादायी शाळा आहेत. महाराष्ट्रभर गावागावांत आणि वस्त्यावस्त्यांवर जिल्हा परिषद शाळांचं मोठं जाळं आहे. मातृभाषेतूनच या जि.प. शाळांत शिक्षण दिलं जातं. जिल्हा परिषद शाळांना खासगी शाळांचं मोठं आव्हान आहे. पटसंख्या टिकवणं आणि वाढवणं याकडंही शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. ज्ञानकेंद्रित समाज निर्माण करण्याचं काम जिल्हा परिषद शाळा करीत आहेत, हे टाकळी शाळेला भेट दिल्यानंतर मनोमनी पटतं.

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.