स्पेशल रिपोर्ट

विजयदुर्ग ढासळतोय...

मुश्ताक खान, सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले विजयदुर्गची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. किल्ल्यातले बुरुज ढासळले आहेत, तर तटबंद्याही कोसळल्या आहेत. एवढंच नाही तर शत्रूचा थरकाप उडवणाऱ्या तोफा आणि हातगोळे उघड्यावर टाकण्यात आले आहेत. या ऐतिहासिक वास्तूची ही अवस्था बघून हळहळ व्यक्त होतेय. पण सरकारला त्याचं काहीही सोयरसुतक नाही हे आणखी गंभीर.
 

देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला महाराष्ट्राचं वैभव आहे, कारण तोरणानंतर विजयदुर्ग हा एकमेव किल्ला आहे, ज्यावर शिवरायांनी स्वत: झेंडा फडकवला आहे. या किल्ल्याचा इतिहास अत्यंत थोर असा म्हणावा लागेल. या किल्ल्याची निर्मिती इ.स. 1195 ते 1205 या दरम्यान राज भोज यांनी केली. त्याचा पराभव करून 1214मध्ये देवगिरीच्या यादवांनी हा किल्ला काबीज केला. असं होत होत 1653 मध्ये आदिलशाहचा पराभव करून शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकला तेव्हा त्याचं क्षेत्रफळ पाच एकरमध्येच होतं. पण या किल्ल्याचं महत्त्व ओळखून शिवरायांनी त्याचा विस्तार केला. या किल्ल्याचं एकूण क्षेत्रफल 17 एकर 19 गुंठे आहे.

vijaydurga imageभारताला इंग्लंड, पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच यांनी भारतात आपलं जाळं विणायला सुरुवात केली होती. आपापल्या भागात सत्ता गाजवणाऱ्या या चारही सत्तांना भारतात स्थिर होऊ द्यायचं नाही हे शिवरायांनी पक्कं केलं आणि आरमाराची स्थापना केली. त्यांचे पहिले आरमार प्रमुख दर्यासारंग दौलत खान होते. त्यानंतर मयनाक भंडारी यांनी ही धुरा सांभाळली. याच दरम्यान त्यांनी बांधलेल्या अधिकच्या तीन तटबंद्या आणि 20 बुरुजांमुळं हा किल्ला मजबूत आणि अभेद्य बनला. 1653 ते 1818पर्यंत या किल्ल्यावर मराठ्यांचं राज्य होतं. नंतरच्या काळात कान्होजी आंग्रे, तुळाजी आंग्रे, संभाजी आंग्रे, आनंदराव धुळप यांसारखे शूर सरदार आरमार प्रमुख मराठ्यांना लाभले.

विजयदुर्ग किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. त्यातला एक भुयारी मार्ग पाण्याखालून २०० मीटरवर असलेल्या धुळप यांच्या घरापर्यंत जातो, असं म्हटलं जातं. जर त्याची दुरुस्ती करून तो खुला करण्यात आला तर पर्यंटनाच्या दृष्टीनंही त्याला चालना मिळू शकते, अशा भावना दुर्गप्रेमींनी व्यक्त केलीय.

शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी त्याकाळी तोफांचा मुख्य अस्त्र म्हणून वापर केला जायचा. जस्त आणि लोखंडाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या गोळ्यांमध्ये दारू भरली जायची. त्यातली वात पेटवून तो शत्रूंवर फेकला जायचा... त्याकाळी युद्धात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि शत्रूंचा थरकाप उडवणाऱ्या या हातगोळ्यांची रस्त्यावर रास लावण्यात आली. ते उघड्यावर टाकण्यात आले आहेत. इथं कुणीही येतं ते कसेही हाताळले जातात. हे वाईट आहे. खरं तर हा ऐतिहासिक ठेवा लोकांना अधिक काळापर्यंत पाहता यावा यासाठी जतन केला पाहिजे, असं सरदार धुळप यांच्या घराण्यातील बाळा धुळप सांगतात.

शेवटी शेवटी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात होता. इंग्रजांनीही यात अनेक बदल यात घडवले. त्यांनी इथे कचेरी बांधली. त्या कचेरीमधून त्यांचा इथला कारभार केला जायला. आरोपींना कैद करण्यासाठी त्यांनी इथं जेलही बांधलं होतं. पण त्या जेलचीही पडझड झालीये. त्याचबरोबर किल्ल्यावर होत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळते. किल्ल्याची साफसफाईही इथं येणाऱे दुर्गप्रेमी करतात. सरकारची यासाठी कोणतीही भूमिका नाही ही शोकांतिका आहे.

हा किल्ला आपला आहे, हा इतिहास आपला आहे असं जोपर्यंत मनातून वाटत नाही तोपर्यंत हे किल्ले आपण वाचवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया कान्होजी आंग्रेंचे 9वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी दिली. इतिहासाकडं दुसऱ्याच्या चष्म्यातून पाहू नये. प्रत्येकानं स्वत: इतिहासाचा अभ्यास करावा त्याचबरोबर आपल्या पुढच्या पिढीलाही त्याचं ज्ञान द्यावं तर संवर्धन शक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला तरी देखील या किल्ल्याकडं सरकारचं दुर्लक्षच आहे. विजयदुर्ग किल्ला केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. या किल्ल्याची काळजी घेण्यासाठी सरकारनं अत्यल्प निधी उपलब्ध केला आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या या किल्ल्याला राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून मागून आपल्या ताब्यात घ्यावं आणि किल्ल्याचं संवर्धन करावं, अशी मागणी आनंदराव धुळप यांचे वंशज रघुनाथराव धुळप यांनी केली.

Comments (3)

  • ग्रेट वर्क सर....... :)

  • Really It is very गुड आर्टिकल...
    You are doing eye opening job for State Govt,Central Govt & Aam Adami.
    I think it is responsibility of each and everybody.(At least who stay in Maharashtra).

    Once again tuze abhinandan for doing gr8 job.

  • सरकारने आता तरी जागे व्हायला पाहिजे!

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.