स्पेशल रिपोर्ट

चारा खा, पाणी प्या, भुर्रर्र उडून जा...

अविनाश पवार, पुणे
चारा खा... पाणी पी... अन् भुर्रर्र उडून जा... अंगणात रांगणाऱ्या बाळासाठी आई अशी चिमण्यांची कित्ती आर्जवं करायची. आता काळ बदलला. माणसांची नियत बदलली. झाडं तुटली. पाखरं दिसेनाशी झाली. अशा काळात 'या चिमण्यांनो परत फिरा...' अशी जिव्हाळ्याची साद घालतोय पुण्याजवळच्या निमसाखर गावातला एक शेतकरी. विश्वास बसणार नाही, पण या शेतकऱ्यानं पाखरांसाठी दुष्काळी परिस्थितीतही भरात आलेलं आपलं ज्वारीचं शेतच राखून ठेवलंय.
 

त्यांचं नाव बाळकृष्ण ननवरे. ते इंदापूर तालुक्यातल्या निमसाखर गावात राहतात. राज्यातल्या अनेक गावांप्रमाणं त्यांच्याही गावाला दुष्काळाच्या झळा बसतायत. अशा काळात जो तो पोराबाळांसाठी पीक पाणी जपून ठेवतोय. पण अशा काळातही 'खातील ते पक्ष्यांचं, शिल्लक राहील ते माझं...' असं म्हणत ननवरे यांनी आपलं एक एकर ज्वारीचं शेत पाखरांसाठी राखून ठेवलंय. यात चिमण्यांसोबतच सारीच पाखरं यावीत म्हणून त्यांनी 'पक्षी थांबे'ही तयार केलेत.

240x135बाळकृष्ण ननवरे तब्बल २० वर्षे मुंबईत राहिले. तीन वर्षांपूर्वी ते निमसाखरला आले. शेती करू लागले. पहिल्यांदा शहरी वातावरणात राहिलेल्या ननवरेंना शेती करणं जरा जमलं नाही. पण शेजारच्या बांधभावाकडून ते हळू हळू शेती नीट करायला शिकले.

ननवरेंकडं फक्त दोनच एकर शेती आहे. त्यांनी एका एकरात ज्वारी तर एका एकरात मका घेतलाय. दुष्काळाचं सावट असल्यानं त्यांना या पिकांसाठी पाणी कमी पडू लागलं. त्यासाठी त्यांना शेजारच्या जगन्नाथ पाटलांनी मदत केली. पाणी मिळालं अन् पिकं डोलू लागली. ज्वारी, मक्याचं पीक भरघोस आलं. ननवरेंच्या मनात आलं, निसर्गानं आपल्याला जे भरभरून दिलंय ते आपण इतरांनाही द्यायलाच हवं... आसपास दुष्काळ हातपाय पसरू लागलाय. माणसा जनावरांचं जगणं कठीण. तिथं पाखरांचा विचार कोण करणार? तो विचार ननवरेंनी केला. त्यांनी पाखरांसाठी ज्वारीचं निम्मं शेत राखून ठेवायंच ठरवलं. ननवरेंच्या कारभारणीनंही या निर्णयाला होकार दिला.

मग काय, जिथं फिरून फिरून पिकांवर येणाऱ्या पाखरांना हुसकावण्यासाठी गोफणगुंड्या्चे हाकारे ऐकू तिथं ' या चिमण्यांनो या गं या...'च्या हाका सुरू झाल्या. ज्वारीचे दाणे भरपेट खाल्यानंतर पाखरांना पाणी नको का? मग ननवरेंनी तीही सोय केली. मडक्यांमध्ये पाणी भरून त्यांनी पाखरांसाठी ती शेतात टांगून ठेवली.

आता ननवरेंच्या शेतात पाखरं थव्या-थव्यांनी उतरतात. दाणे खातात. किलबिल करत बागडतात. ते पाहून ननवरे समाधान पावतात.

Comments (1)

  • खरोखरच माणसातील माणुसकीचे उत्तम उदाहरण! ..... माझा या शेतकऱ्याला सन्मानाचा सलाम......

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.