सरकारी योजनांचा लाभ निव्वळ अनुदानाकरता न घेता आर्थिक परस्थिती सुधारण्याकरता घेता येतो हे अरुण बळी या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव इथल्या या शेतकऱ्यानं ही प्रगती बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून साधलीय. त्यांनी बायोगॅस प्रकल्पाचा वापर करत पूरक जोडधंदा म्हणून हॉटेल व्यवसाय सुरू केला. इंधन बचतीमुळं त्यांची दररोज २ हजार रुपयांची बचत होत आहे. आणि निव्वळ खर्चवजा जाता त्यांना २ लाख ५० हजारचा निव्वळ नफा झालाय.

अरुण बळी यांच्या बायोगॅस प्रकल्पामधून शेतीच्या सिंचनाकरता एका जनरेटरच्या माध्यमातून वीजनिर्मिती होत आहे. या वीजनिर्मितीचा फायदा भारनियमनाच्या काळातही त्यांना हॉटेल व्यवसायाकरता होत आहे. याशिवाय जनावरांपासून मिळणाऱ्या दुधापासून ३० हजार रुपयांचं उत्पन्न मिळतंय. या प्रकल्पामुळं सेंद्रीय खतही उपलब्ध होत असल्यामुळं आतापर्यंत रासायनिक खतावर होणारा खर्च शून्य झालाय.
अरुण बळी यांना वडिलोपार्जित असलेल्या १२ एकर शेतीमध्ये तीन भावांच्या कुटुंबाचा प्रपंच चालवणं कठीण झालं होतं. म्हणून त्यांनी नागपूर-मुंबई जलद महामार्गालगत असलेल्या आपल्या शेतामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू केला. हॉटेलकरिता लागणारं इंधन आणि वीज यांची गरज अधिक होती. त्याकरता त्यांनी पंचायत समिती मालेगावमधून महाराष्ट्र आर्थिक ऊर्जा विकास या योजनेअंतर्गत १० हजाराच्या अनुदानावर ४० घनमीटर बायोगॅस सुरू केला. बायोगॅसकरता त्यांना २ लाख ४० हजार इतका खर्च आला आला. तर जनावरांचा गोठा आणि इतर साहित्याकरिता २ लाखांचा खर्च आला.
२५ जनावरांनी टाकलेलं शेण, हॉटेलमधील उस्टावळ आणि चार शौचालय यापासून दररोज जवळपास १५ किलो गॅसनिर्मिती होऊ लागली.
संपर्क : अरुण बळी - 8381088031
Comments
- No comments found