स्पेशल रिपोर्ट

कपाशीच्या मुलखात द्राक्षांचा मळा!

ब्युरो रिपोर्ट, वाशीम
कापूस आणि धान ही विदर्भातील शेतकऱ्यांची पारंपरिक पिकं. परंतु, इथला शेतकरी आता नवनवीन तंत्र आत्मसात करून पीक पद्धतीत बदल करू पाहतोय. त्यातूनच कपाशीच्या या मुलखात उसानंतर आता द्राक्षांचे मळे फुलू लागलेत. वाशीम जिल्ह्यातल्या अनसिंग गावच्या एका निवृत्त डॉक्टरनं उजाड माळरानावर द्राक्षांची यशस्वी लागवड होऊ शकते, हे सिद्ध केलंय. त्यांची ही द्राक्षशेती पाहण्यासाठी विदर्भातील शेतकरी गर्दी करू लागलेत.  
 
अडीच लाख उत्पन्नाची अपेक्षा
डॉ. सुधाकर गुनाघे यांनी आपल्या सव्वा एकर शेतात ही द्राक्षांची लागवड केलीय. दोन वर्षांत द्राक्षाच्या पिकानं जोम धरलाय. एका झाडापासून त्यांना जवळपास १२ किलो द्राक्षं आणि एकूण तीन लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. यामधून खर्चवजा करता जवळपास अडीच लाखांचं उत्पन्न मिळू शकतं.

 

नगदी पिकांचा ध्यास
सरकार दरबारी तब्बल २५ वर्षं वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. गुनाघे यांची शेतीची ओढ काही केल्या कमी होत नव्हती. सरकारी नोकर असल्यानं त्यांना ही इच्छा पूर्ण करता येत नव्हती. तरीही नोकरीला असताना त्यांनी अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या, तसंच कृषी विद्यापीठ, प्रदर्शनांना आवर्जून भेटी दिल्या. या ठिकाणाहून शेतीतील नवनवीन तंत्र समजून घेतलं. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ शेतीकडं वळण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पिकांना फाटा देत नगदी पिकं घेण्याचा ध्यास घेतला. माळरानावर फुललेला द्राक्षाचा मळा हा त्याचंच फळ आहे.

 

कृषी विद्यापीठाचं सहकार्यdraksha 
द्राक्षाचं पीक प्रामुख्यानं नाशिक आणि सांगली जिल्ह्यात घेतलं जातं. पुण्यात भरणाऱ्या कृषी प्रदर्शनांना डॉ. गुनाघे आवर्जून भेट देत असत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी तीन-चार एकरात सुखी आहे, मग आपणसुद्धा नगदी पीक घेऊन का सुखी होणार नाही, असा प्रश्न त्यांना पडला. त्यातून त्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठातील तज्ञ्जांशी चर्चा केली आणि कामाला सुरुवात केली. ठिंबक सिंचन करून द्राक्षांची लागवड केली. दोन वर्षं झाल्यानंतर आता चांगलीच फळं आलीत. सध्याचा बहर लक्षात घेता अडीच लाखांचं उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे.

 

शेतकऱ्यांनो, नावीन्याचा ध्यास धरा...
डॉ. गुनाघे यांच्याकडं 35 एकर शेती. मात्र, ठिंबक सिंचन करून बागायत झालेल्या या द्राक्ष लागवडीखालील सव्वा एकर शेतीतून जेवढं उत्पन्न मिळणार तेवढं उर्वरित कोरडवाहू शेतीतून मिळणार नाही. त्यामुळं केवळं न राबता नावीन्याचा ध्यास घेऊन शेती करावी. केवळ पारंपरिक पिकं न घेता वेगवेगळे प्रयोग करून नगदी पिकं घ्यावीत. त्यातूनच विदर्भाच्या भाळी लागलेला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक पुसला जाईल, असा विश्वास डॉ. गुनाघेंना वाटतोय.

 

संपर्क : डॉ. सुधाकर गुनाघे - 96 04 240 381

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.