स्पेशल रिपोर्ट

कोकणात पिकली गो कलिंगडं!

मुश्ताक खान, दापोली
दापोलीला कृषी विद्यापीठ झाल्यापासून कोकणातील शेतकरी नवनवीन प्रयोग करून पारंपरिक पीक पद्धती बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यातूनच भात, हापूस, फणस, काजू या पारंपरिक पिकांबरोबरच कोकणात चक्क स्ट्रॉबेरी पिकू लागलीय. देगावच्या एका तरुण शेतकऱ्यानं सेंद्रीय पद्धतीनं शेती करून चक्क कलिंगडं पिकवलीत. जोडीला वांगी आणि कोल्हापुरी मिरचीही आहे. मग, बोला... कोकणातलो शेतकरी आता बदलूक लागलो मा!
 

सुशिक्षित तरुणांची शेती
कोकणातला तरुण थोडासा जरी शिकला तरी तो शहराची वाट धरतो. आजही कोकणातील अनेक घरं मनीऑर्डरवरच चालतात. ही संख्या अर्थात कमी झाली आहे, पण प्रथा काही बंद झालेली नाही. हीच बाब देगावच्या संजय भोसले गुरुजींना स्वस्थ बसू देईना. गावातून उच्चशिक्षित झालेल्या तरुणांची गळती थांबवली पाहिजे, असा विचार त्यांचा मनात कायम घोंघावत होता. पण, शेती नफ्याचा व्यवसाय आहे हे कोणी मान्यच करायला तयार नव्हतं, म्हणून भोसले गुरुजींनीच पुढाकार घेत २००२मध्ये स्वत:च शेती करायचं ठरवलं. दिवस-रात्र एक करून त्यांनी 'चिरेबंद' शेती फुलवलीय.

सेंद्रीय खतांचा वापर
TARABUZभोसले गुरुजींनी ८० टक्के सेंद्रीय खत आणि आवश्यकतेनुसार रासायनिक खत अशी आखणीच केलीय. गुरुजींकडं कोकणातल्या गावठी गाई आहेत. त्यांच्या शेणाचा वापर गोबर गॅस प्लाण्टमध्ये करतात आणि त्यामधून निर्माण होणारी स्लरी ते शेतात वापरतात. त्याचबरोबर गावात ज्यांचा गोठा आहे त्यांच्याकडून ते शेणखत खरेदी करून शेतात वापरतात. यंदाची मिरची त्यांनी १०० टक्के सेंद्रीय पद्धतीनं पिकवली आहे. आपल्या मेहनतीनं आणि शिक्षकाची नोकरी सांभाळत त्यांनी यशस्वी शेती करून दाखवलीय. सात एकर जागेवर त्यांनी कलिंगड, वांगी, मिरची, कोबी आदी फळभाज्यांची लागवड करून कमीत कमी रासायनिक खतांचा वापर केला आणि शेतीतून नफा कमावलाय.

कलिंगडातून चांगलं उत्पादन
कलिंगडची एका एकरात पाच हजार झाडं बसतात आणि शेताचं योग्य नियोजन केल्यास एकरी १५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. ९० दिवसात या झाडांना कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त ३० टनांपर्यंत उत्पादन घेता येतं. समजा नियोजनात काही कसूर राहिली आणि उत्पादन १० टनच आलं तरी बाजारभावाप्रमाणं १० रुपये जरी प्रति किलो धरले, तरी एकरी एक लाख रुपये शेतकरी सहज मिळवू शकतो. साधं गणित आहे, पाच हजार रुपयात मुंबई-पुण्यात वर्षभर राबल्यानंतर 60 हजार रुपये मिळतात. पण जर गावात राहून ९० दिवस कष्टानं शेती केली, तर एकरी १-२ लाख रुपये हमखास मिळू शकतात, असं भोसले गुरुजी तळमळीनं सांगतात.

कोकणी माणूस आळशी असतो या संकल्पनेलाच छेद देत भोसले गुरुजींनी आपला मळा फळांनी, भाजींनी फुलवलाय. त्याचबरोबर आपल्या आसपासच्या परिसरातल्या तरुणांना पाणी, वीज आणि बियाणं उपलब्ध करून देऊन त्यांना शेतीत उतरवलं आहे. शेती कशी करायची, काय काय काळजी घ्यायची, हे सर्व गुरुजी हातचं काहीही न राखता. इतर तरुणांना समजावून सांगतात. भोसले गुरूजींसारख्या लोकांमुळंच कोकणातील शेतीचं रूपडं पालटताना दिसतंय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.