स्पेशल रिपोर्ट

कोकणच्या सौंदर्याला सोलर पार्कचं कोंदण

मुश्ताक खान, दापोली
कोकणाला निसर्गसौंदर्याचं माहेरघर म्हटलं जातं. इथले विशाल समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडं, नागमोडी रस्ते पर्यटकांना आकर्षित करत आलेत. यातच आता भर पडलीय ती दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं उभारलेल्या सोलर पार्कची. हे पार्क म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा उद्यान आज सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र बनलंय. इथं येणारे पर्यटक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचं ठिकाण झालंय.
 
 पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती

राज्याला सध्या विजेचं संकट चांगलंच भेडसावतंय. सरकारनं विजेच्या योग्य नियोजनाबाबत अनेक यंत्रणा आणि उपाययोजना करूनही पाहिजे तसं समाधान अद्याप मिळालेलं नाही. 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त करी, अशी सरकारकडून घोषणा देखील झाली होती. पण तरीही संपूर्ण लोडशेडिंगमुक्त महाराष्ट्र करण्यास सरकार अपयशी ठरलंय. विजेची गरज आज प्रत्येकाला आहे. परंतु त्याचबरोबर पर्यावरणाचं नुकसान न करता ऊर्जा मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेची निर्मिती करायची असेल तर सौरऊर्जा, तसंच पवन ऊर्जा हे उत्तम उपाय आहेत. याचाच अंदाज घेऊन कोकण कृषी विद्यापीठानं या एनर्जी पार्कची उभारणी केलीय.

केंद्र सरकारचं आर्थिक पाठबळ 

vlcsnap-2013-02-07-12h09m51s224या अपारंपरिक ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता केंद्र सरकारच्या नवीन नित्यनूतनशील ऊर्जा विभागानं या एनर्जी पार्कला आर्थिक साहाय्य केलंय. सध्याच्या परिस्थितीत कायमस्वरूपी वीजनिर्मितीचा आणि प्रदूषणविरहित ऊर्जा देणारा एकमेव स्रोत म्हणून सौरऊर्जेकडे पाहिलं जातंय. यासाठी घराघरात सौरऊर्जेचा वापर करावा हाच प्रयत्न सर्व स्तरातून होताना दिसून येतो.
कोकण कृषी विद्यापीठानं उभारलेल्या या एनर्जी पार्कात विविध कामांसाठी उपयुक्त ठरणारी संयंत्र पाहायला मिळतात. इथल्या काही प्रयोगांची तर राष्ट्रीय स्तरावरही दखल घेण्यात आलीय.

 सौर सुटकेस

बाहेर आऊटिंगसाठी जायचं असेल तर सौर सुटकेस स्वयंपाक करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तीन भांड्यांचं असणारी ही सुटकेस हाताळायला सोपी तर आहेच, त्याचबरोबर १०० ते ११० डिग्री सेल्शिअस तपमानाची यात निर्मिती होते. यामध्ये तीन जाणांचं अन्न शिजू शकतं. शिवाय हीची किंमतही अत्यंत कमी आहे. 

vlcsnap-2013-02-07-12h12m34s53सौर छत्री कुकर 
छत्रीचा उपयोग आपण पावसापासून रक्षण करण्यासाठी करतो. परंतु या सौर छत्रीचं काम आपल्याला उन्हाळ्यात लागणार आहे. पावसाळी छत्री उलटी करून सौर किरणं केंद्रित करून याचा उपयोग जेवण बनवण्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीनं करता येतो.

 सौर पॅराबोलिक कुकर

चाळीस मिनिटांत ५-७ जणांचं जेवण गॅसचा वापर न करता शिजलं तर किती आनंद होईल. हे काम साधण्यासाठी सौर पॅराबोलिक कुकर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या पॅराबोलिक कुकरमध्ये २३० डिग्री सेल्शिअसपर्यंत तपमान गाठता येतं. त्याचबरोबर या कुकरमध्ये जेवण तयार केल्यानं पर्यावरणाचाही समतोल राखता येतो. एवढंच नाही तर काजूच्या टरफलांचं तेल काढण्यासाठीही याचा उयोग होतो. 

vlcsnap-2013-02-07-12h13m06s132सौर वाळवणी यंत्र
कोकणचा भाग खाद्य संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. मासे तर इथल्या लोकांचा जीव की प्राण. इथली सुकट मासळीही चविष्ट असते. ती अनेकांना प्रचंड आवडते. पण खडकावर सुकवलेले मासे हायजिनिक नाहीत म्हणून अनेक जण आपल्या मोहाला आवर घालतात. अशा लोकांना खूश करण्यासाठी या वाळवणी यंत्राचा चांगलाच उपयोग होतो. यामध्ये ४५-५० डिग्रीपर्यंत तपमान गाठता येतं, तर दीड ते दोन दिवसात १०० किलो मासे सहज सुकवता येतात.

 डिस्टिलेशन प्लाण्ट

विज्ञान प्रयोगशाळेत डिस्टिल्ड वॉटरचा उपयोग नेहमीच होतो. पण त्याच्या निर्मितीसाठी हजारो लिटर पाणी आणि वीज वायाही जाते. अशा प्रयोगशाळांसाठी विद्यापीठानं एक उत्तम पर्याय सुचवला आहे. हा पर्याय म्हणजे डिस्टिलेशन प्लाण्टचा. इथं पाणी वाया न घालवता सौरऊर्जेच्या साहाय्यानं बाष्पीभवनाच्या सूत्रावर आधारित डिस्टिल्ड वॉटर निर्माण करता येऊ शकतं.

 सौर कंदील

ग्रामीण भागात रस्त्यांवर दिव्यांची किंवा अत्यंत दुर्गम भागात विजेची समस्या भेडसावत असेल तर सौर कंदील हा एकदम मस्त पर्याय आहे. या प्रकारची सौर उपकरणं त्याचबरोबर इतरही अनेक गोष्टी इथं पाहायला मिळतात. त्यात सौर हिटर, सौर पंप, सौर चूल, सौर पथदीप, बायोगॅस संयंत्र यांचाही समावेश होतो. या सर्वांची माहिती तुम्ही घेऊ शकता. यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्रा. ए. जी मोहोड (९४२३८७४२६०), डॉ. एस.एच.संगर (९४२१२२८५५८) किंवा डॉ. वाय. पी. खंदेतोड (९४२०१५६६९३) यांच्याशी संपर्क साधा.

Comments (3)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.