स्पेशल रिपोर्ट

भोपळ्यानं केलं मालामाल

शशिकांत कोरे, सातारा
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ इथल्या महेश कदम या युवा शेतकऱ्यानं बाजारपेठेचा अभ्यास करून व्यावसायिक शेती करण्याचा निर्धार केला. सुरुवातीलाच हटके दुधी भोपळा केला. आकारानं एकसारखं दिसणारं आणि हमखास दर देणारं दिव्या जातीचं वाण निवडलं. 20 गुंठे जमिनीत 5 टन भोपळा पिकवला आणि बक्कळ पैसा कमावला.
 

दिव्याची जादू

 बारीक, लांबसडक भोपळे बाजारात अनेकांनी घेतले असतील. पण दिव्या जातीचे भोपळे दिसायला दिमाखदार, चवदार आकारानं एकसारखे दिसतात. या त्यांच्या वैशिष्ट्यामुळं या भोपळ्यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. डोंगरकपारीत असलेल्या भागातील आपल्या 20 गुंठे क्षेत्रात त्यांनी भोपळ्याचं पीक घेतलं. यासाठी मेमध्ये रोटरच्या साह्यानं जमिनीची मशागत करून घेतली. नांगरट करून रान चांगलं तापवलं. या भोपळ्याला भरपूर पाणी लागतं. या पिकाला जास्त पाणी दिलं तर पीकही जोमानं येतं. कदम यांची स्वतःची विहीर आहे. पाटपध्दतीनं पाणी देऊन त्यांनी हे पीक घेतलं.

 

टोकनी आणि काढनी

 जूनच्या सुरुवातीस दिव्या जातीचं भोपळा बियाणं यासाठी आणलं. दहा गुंठ्यास एक पुडी याप्रमाणं दोन पुड्या लागणीपूर्वी भिजत ठेवल्या. त्यानंतर बियांची टोकणी केली. मंडप उभारला. चार-पाच दिवसात कोंब येण्यास सुरुवात झाली. त्यासाठी दोन सरीतील अंतर 6 फूट ठेवलं. परिणामी हवा खेळती राहिली. तीन फुटावर एक याप्रमाणं डांब रोवले. तारा ओढून घेतल्या, त्यावर वेल चढवले. पिकाला जोम धरायला 10.26.26 आणि 0.52.34 या खतांचा डोस दिला. पावसाळी मोसमात या पिकावर भुरी, करपा, नागआळी आदी रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून त्यासाठी कारबाटोप या कीटकनाशकाची फवारणी 15 दिवसांतून एकदा केली.

 

बेरजेचं अर्थकारण

 मशागत करण्यासाठी रोटर पद्धत अवलंबली. यासाठी झालेला खर्च एक हजार रुपये, तारा सुतळींसाठी 500 रुपये, भांगलण आदी मजुरीचा खर्च एक हजार रुपये, औषधं फवारणीसाठी चार हजार; तसंच चिपळूण बाजारपेठेचा खर्च एक हजार, असा सर्वसाधारण 7 ते 8 हजार रुपये खर्चवजा जाता 30 ते 40 हजार रुपये शिल्लक राहिली. आतापर्यंत पाच टन भोपळ्याची तोडणी झालीय. आणखी चार टन भोपळ्याचं पीक मेपर्यंत अपेक्षित आहे. या दुधी भोपळ्याच्या पिकापासून सरासरी एक लाख वीस हजारापर्यंत या युवा शेतकऱ्याला निश्चित फायदा होणार आहे.

Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.