20 दिवसांनंतर मासे बाजारात
आंदोलनानंतर दोन पावलं मागं घेत मच्छीमारांनी आपली जाळी समुद्रात फेकली खरी, पण आलेल्या वादळामुळं मासेमारीला गेलेल्या या बोटींना जाळ्यात गावलेल्या अल्पशा मासळीवर परत फिरावं लागलंय.
मच्छीमार बांधवांना पापलेट, मांदिली, कोळंबी थोड्या प्रमाणात मिळाली होती. त्यामुळं तब्बल तीन आठवड्यांनंतर बाजारात विक्रीस आलेले मासे खरेदी करण्यासाठी खवय्यांची एकच झुंबड उडाली होती. अत्यंत कमी प्रमाणात आवक झाल्यानं माशांचे दरही गगनाला भिडले आहेत. पण त्यामुळं हर्णे बंदरातील अनेक मच्छीमारांना आज पहिल्यांदाच मासे चाखायला मिळाले. ही परिस्थिती बदलायची असेल तर सरकारला वेगानं हालचाली कराव्या लागतील, अशी प्रतिक्रिया मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी व्यक्त केली.
दरवाढीबाबत मच्छीमार संभ्रमात
सरकारनं मच्छीमारांना घाऊक वर्गामधून वगळून किरकोळ वर्गामध्ये टाकलंय. त्यात डिझेल दरवाढ कमी होईल, अशी आशा निश्चितच निर्माण झालीय. डिझेल प्रती लिटरमागे ७ रुपयानं कमी झालं आहे, की ९ रुपयांनी याबाबत प्रसिद्धिमाध्यमांमध्ये चर्चा आहे, तर मच्छीमारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सरकारनं किंवा ऑईल कंपन्यांनी मच्छीमार संस्थांना कोणत्याही प्रकारचं लेखी पत्र यासंदर्भात दिलं नसल्याची माहिती श्रीराम मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश चोगले यांनी दिली.
तोडगा निघाल्यावरच मासेमारी
ऊन, वारा आणि वादळ छातीवर झेलत दर्याचा राजा मासेमारी करत असतो. राजकीय नेत्यांच्या आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या चर्चा झ़डत आहेत, पण तोडगा काही निघत नाहीये. येणाऱ्या दोन दिवसात जर आमच्या बाजूनं निर्णय झाला... करमुक्त डिझेलचा जर पुरवठा झाला तर आम्ही मासेमारीला सुरुवात करू, अशी भूमिका मच्छीमार नेत्यांना घेतलीय. पण डिझेलबाबत जर योग्य निर्णय झाला नाही, तर या सरकारला बुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मच्छीमार नेते आनंद पाटील यांनी दिलाय.
मच्छीमारांनी मासेमारी बंद आंदोलन केलं, आपल्या मागण्यांसाठी हा समाज रस्त्यावर उतरला, पण सरकारला त्याचं काहीच सोयरसूतक नाही. त्यामुळं आमची एवढी हेटाळणी का? आम्ही भारताचे नागरिक नाही का? असा प्रक्षुब्ध सवाल विचारला जातोय.
मच्छीमारांवरील परिणाम :-
- महाराष्ट्रात 8 हजार 300 बोटी बंद
- बंदचा 3 लाख मच्छीमारांना फटका
- त्यावर अवलंबून असलेल्या 8 लाखांना फटका
- मासेमारी बंदच्या काळात 100 कोटींचं नुकसान
- या नुकसानभरपाईबाबत कोणतीच चर्चा नाही
- रत्नागिरीत 3 वर्षात 2 लाख मेट्रिक टन मासेमारी घटली
- मच्छीमार संस्था 100 टक्के वाढल्या, पण मासेमारी घटल्यामुळं गेल्या 15 वर्षांत 8 टक्के रोजगार घटला.
Comments
- No comments found