स्पेशल रिपोर्ट

दुग्धोत्पादनाची यशोगाथा...!

ब्युरो रिपोर्ट, भंडारा
विदर्भातील भंडारा जिल्हात धान शेती मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, निसर्गावर अवलंबून असणारी ही शेती बेभरवशाचीच आहे. त्यासाठी जोडधंदा म्हणून दुग्धोत्पादन हा चांगला पर्याय आहे. साकोली तालुक्यातील बोधरा येथील दिलीप कापगते या तरुण शेतकऱ्यानं कॉलेजला असतानाच एक कालवड घेऊन दुग्धोत्पादनाचा श्रीगणेशा केला. 12 वर्षांनंतर आज त्याच्या आधुनिक गोठ्यात 13 गाई आणि 9 वासरं आहेत. यातून महिन्याला सरासरी 40 हजारांचं उत्पादनही मिळतं.  
 

12कॉलेजला असताना कालवड घेतली
एखाद्या आय. टी. कंपनीतील कर्मचाऱ्याइतका पगार गावात बसून मिळवणारा दिलीप कापगते हा गावकऱ्यांसाठी एक आदर्श बनलाय. दिलीप हा विज्ञान शाखेत पदवीधर आहे. परंतु त्याला नोकरीपेक्षा व्यवसायात आवड असल्यानं आपण व्यवसायच करावा, असं त्याला वाटत होतं. परंतु, मोठं भांडवल त्याच्याकडं नव्हतं. त्यानं एक दीर्घकालीन योजना आखली. विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकत असताना त्यांनं एक कालवड खरेदी केली. चांगलं भरणपोषण केल्यानंतर कालवडीची मोठी गाय झाली. यशावकाश या गाईनं एका एका कालवडीला जन्म दिला. या गाईकडून सुरुवातीला दिलीप यांना प्रतिदिन १४ ते १५ लिटर दूध मिळायचं. वर्षभराच्या दूधविक्रीतून जवळपास २० ते २५ हजारांचा त्यांना नफा झाला आणि नंतर दिलीपनं याच व्यवसायाला मोठं स्वरूप देण्याचं ठरवलं. या एका गाईचं त्यांनी चांगलं संगोपन केलं. एकाचे दोन, दोनचे चार असं करत 12 वर्षात एकट्या लालीनं (गाईचं नाव) १४ वासरांना जन्म दिला. या एकाच लालीच्या संपूर्ण कुटुंबाची संख्या १०० च्या घरात गेली आहे आणि अजूनही ती वेतं घालते आणि बक्कळ दूधही देते.

 

दावणीला 13 गाई आणि 9 वासरं

222आज १२ वर्षांनंतर दिलीपला इतर कोणत्याही व्यवसायाची गरज नाही. त्याचा डेअरी फार्मचा व्यवसाय अगदी नफ्यात सुरू आहे. त्याच्याकडं आता १३ मोठ्या गाई, तसंच ९ वासरं आहेत. दूध व्यवसायाबाबत माहिती देताना दिलीप म्हणाला की, गाईनं ९ व्या किंवा १० व्या महिन्यात वासरू दिल्यानंतर सुरुवातीच्या काळात ती भरपूर दूध देते. सध्या दावणीला १० गाई असून दररोज सरसरी १२५ ते १३० लिटर दूध मिळतं. गर्भधारणा झाल्यानंतर महिन्याकाठी १ ते २ लिटर दूध कमी होत जातं. ७ व्या ते ८ व्या महिन्यात ती सर्वात कमी दूध देते. दुधाला ४.० फॅटनुसार आणि २९ डिग्रीनुसार दर लिटरमागं १८.५० रुपये दर मिळतो. यानुसार दररोज १६०० रुपये उत्पन्न मिळतं. तर यामधून ५० टक्के रक्कम म्हणजेच ८०० रुपये हा खर्चवजा जाता दररोज ८०० रुपयांचा नफा होतो. यानुसार महिन्याला सरासरी २४ हजार रुपये निव्वळ नफा मिळतो. म्हणजेच वर्षाला सुमारे २.५० लाखापर्यंत उत्पन्न मिळतं.

 

 

गाईंची पैदासही फायदेशीर
दुधाबरोबरच वासरांपासूनही चांगलं उत्पन्न मिळतं. १० गाईंपासून वर्षाकाठी ५ पाडं आणि ५ कालवड मिळतात. पाडं ७ ते ८ महिन्यात दूध पिणं सोडतं. त्यानंतर लगेच त्याला आम्ही विकतो. तर कालवड २ वर्षांपर्यंत वाढवून नंतर विक्री करतो. ५ पाडांपासून २० हजार रुपये, तर एका गाईच्या विक्रीतून ४० हजार याप्रमाणं ५ गाईंच्या विक्रीतून जवळपास २ लाख रुपये मिळतात. एकूणच दूधविक्री आणि गाईंची पैदास यातून वर्षाकाठी ४ ते ४.५० लाखांचा नफा मिळतो, असंही ते सांगतात.

 

शास्त्रीय गोठा
मिळालेल्या नफ्यातूनच दिलीप यांनी गाईंसाठी शास्त्रीय पद्धतीनं 'हेड टू हेड' असा गोठा बनवलाय. इथं यांत्रिक पद्धतीनं धारा काढल्या जातात. पशुखाद्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी शेतात बर्सिनची लागवड केली. तसंच कृषी विज्ञान साकोली यांच्याकडून मिळालेली फुलं जयवंतसुद्धा लावली. याशिवाय ज्वारीची लागवड केली. हिरवळीचा चारा आणि पशुखाद्य मिळाल्यानं ५० टक्के खर्च कमी झाला. त्यांनी प्रत्येक गाईचा विमाही काढलाय. गाय दगावल्यास त्यांना महिन्याच्या आत ३० ते ३५ हजार रुपये विमा संरक्षण मिळतं.

Comments (1)

  • कृपया दिलीप कापगतेचा संपर्क क्रमांक द्यावा.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.