स्पेशल रिपोर्ट

मेळघाटातील आदिवासीही करतोय स्थलांतर

प्रवीण मनोहर, अमरावती
अमरावती - मेळघाटात रोजगाराच्या योजना सुरू आहेत. परंतु आदिवासींना पुरेसा रोजगार देण्यात त्या अपयशी ठरल्यात. दररोज आणि पुरेशी मजुरी न मिळणं, कामं मिळण्यात येणाऱ्या अडचणी, सरकारी अधिकाऱ्यांकडून कामं देण्यात होणारा पक्षपात, आदींमुळं जास्त मजुरी देणाऱ्या शेतीच्या कामाकडं हा आदिवासी वळू लागलाय. इथं रोजच्या रोज मिळणाऱ्या पैशांमुळं आदिवासी सरकारी कामावर थांबण्यापेक्षा मजुरीच्या शोधात शहराकडं स्थलांतर करू लागलाय. त्याला रोखण्यासाठी गरज आहे ती सकारात्मक धोरणाची.
 

 

कुपोषीत मेळघाट


मेळघाट, विदर्भाच्या भाळी असलेलं एक सुंदर गोंदण. सातपुड्याच्या कुशीतल्या मेळघाटात कोरकू, बलई, गवळी आदिवासी जमातीचे लोक प्रामुख्यानं राहतात. त्यांचं जीवन म्हणजे एक समृद्ध संस्कृती. त्यांचा पेहराव, खाद्य पद्धती, आवास योजना हे सगळं सगळं निसर्गाशी जवळीक साधणारं. मात्र, अलीकडच्या काळात इथला आदिवासी चर्चेत आलाय तो कुपोषणामुळं. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यानं त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालाय. कोवळी लेकरं कुपोषणाच्या विळख्यात सापडलेली. रस्ते आरोग्य शिक्षण आणि रोजगार यामुळं आदिवासी मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. आजही शेतीवरची कामं संपली की, गावात हाताला काम नसल्यानं हे आदिवासी स्थलांतरित होत असल्याचं चित्र निदर्शनात येतंय.

 

रोजगारासाठी भटकंतीMelghat stalantar 5 intro image


अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण-शहरी भागात मेळघाटातील हा आदिवासी रोजगारासाठी भटकतोय. लहानथोर लेकरांसह हाताला काम मिळवण्यासाठी वणवण भटकतोय. अमरावती परतवाडा मार्गावर असलेल्या वलगाव इथं माळरानावर आदिवासी विसावलेले दिसतात. काटकुंभ, जरिदा, डोमा चुर्णी भागातील हे आदिवासी शेतीची कामं करतायत. डिसेंबर संपला की, जसं वर्ष सरतं तशी मेळघाटातील आदिवासींच्या हातची कामंही संपतात. मात्र त्याच वेळी डोंगराखाली शेतावर तूर-हरभऱ्याच्या काढणीची कामं असतात, तेव्हा गावातील जथ्थेच्या जथ्थे कामं शोधायला मेळघाट उतरतात.

आदिवासी युवक सांगत होता, "आम्ही समूहानं काम करतो. 1400 रुपयेप्रमाणं तूर कापणीची कामं करतो. प्रत्येकाच्या वाट्याला 200 ते 350 पर्यंत मजुरी येते. सोबत मळणीचं कामही करतो. 200 रुपये पोत्याप्रमाणं पैसे मिळतात. होळीपर्यंत कामं असतात. हाताशी बऱ्यापैकी पैसा आलेला असतो, तेव्हा होळीसाठी पुन्हा मेळघाटात परतणार.”

 

Melghat stalantar 8रोहयोतील अनागोंदी


ग्रामीण भागातील मजुरांना हमखास काम मिळावं यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत. मात्र त्या योजना या आदिवासींचं स्थलांतर थांबवू शकत नाहीत. डोमा गावातील निळकंठ म्हणाला, "गावात सरकारी काम नाही. काम आलं तर सरपंच, सचिव आपल्या मर्जीतल्या लोकांना कामं देतात. ज्यांना कुणाचा आधार नाही त्यांना मात्र असं गाव सोडून फिरावं लागतं. कधी काम मिळतं तर कधी काम मिळत नाही. मग रोजगारासाठी वाट पाहावी लागते.”

 

सरकार आकडेवारीच्या जंजाळातच


जिल्हा रोजगार हमी अधिकारी गजेंद्र नांदने मात्र आदिवासींचं स्थलांतर रोखण्यात बऱ्यापैकी यश आल्याचं सांगताहेत. "सध्या जिल्ह्यात 30 हजार 203, तर एकट्या मेळघाटात नऊ हजार 228 मजूर काम करताहेत. धारणी तालुक्यात सात हजार 744, तर चिखलदरा तालुक्यात 14 हजार 684 मजूर काम करताहेत. मार्च महिन्यात ही परिस्थिती सुधारेल.”

 

गरज सकारात्मक धोरणाची


मेळघाटात रोजगाराच्या योजना सुरू आहेत. पण त्या आदिवासींना पुरेसा रोजगार देत नाहीत. सरकारकडून त्यांना पूर्ण दिवस काम देण्याच्या मर्यादा आहेत. सोबत दररोज मजुरी देण्याबाबत काही तांत्रिक मर्यादा आहेत, त्या दूर झाल्या तर या आदिवासींना मजुरीसाठी स्थलांतर करण्याची पाळी येणार नाही. यामुळं त्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होणार नाही. मात्र त्यासाठी गरज आहे ती सकारत्मक धोरणाची.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.