सोलापूर जिल्ह्यातील कासेगावच्या (ता. पंढरपूर) राजीव नामदेव माने यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाला चांगलंच यश मिळालंय. द्राक्षांची जुनी बाग काढून त्यातच डाळिंबाची लागवड करून मांडवाचा वापर त्यांनी आधार देण्यासाठी केलाय. सध्या मांडव पध्दतीनं केलेली ही डाळिंबाची बाग फुलांनी बहरलीय. या पध्दतीमुळं झाडांच्या संख्येत वाढ होऊन उत्पादनातही प्रचलित पध्दतीपेक्षा जबरदस्त वाढ झालीय.
मांडव उभारणी
डाळिंबासाठी मांडव उभारण्यासाठी एकरी 50 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. ही सुरुवातीची गुंतवणूक असते. यानंतर वर्षानुवर्षं आपल्याला डाळिंबाचं उत्पादन घेता येतं. नवीन पध्दतीनं द्राक्षाप्रमाणं मांडवावर केलेल्या या डाळिंब प्रयोगाला चांगलंच यश मिळालं. या झाडांना माल भरपूर लागला. इतर डाळिंब उत्पादकांनाही हा प्रयोग दिशा देण्याचं काम करीत आहे. उत्पादन खर्च कमी करून झाडांची संख्या वाढवण्याचा सल्ला माने इतर शेतकऱ्यांना देतात.
उत्पादन वाढलं
मांडव पध्दतीनं डाळिंब लागवडीचे फायदे अनेक आहेत. मांडवावर तारांना डाळिंबाच्या फांद्या वेलीसारख्या बांधता येतात. यामुळं फांदीला आणि फळांना चांगला आधार मिळतो. झाडाची फांदी मोडत नाही. जास्त फळं फांदीला राखता येतात. फळांची संख्या वाढल्यानं उत्पादनात वाढ होते. फळांचा आकार आणि एकूणच गुणवत्ता यामध्ये समानता राहते. मांडव पध्दतीत एकरी 1500 झाडांचं योग्य व्यवस्थापन शक्य होतं. या पध्दतीत सेंद्रीय औषध फवारणीही सोपी जाते. सर्व फांद्या आणि फळांवर स्प्रे चांगला बसतो. झाडांची तसंच फळांची संख्या वाढल्यानं उत्पादनात प्रचलित पध्दतीपेक्षा तिपटीनं वाढ होते.
रासायनिक खतांना सुट्टी
कीड आणि रोग नियंत्रणासाठी जैविक कीडनाशकाचा वापर केला. रासायनिक खतांना फाटा देऊन तंबाखू अर्क, गोमूत्र, दशपर्णी अर्क, मोड आलेली कडधान्यं, नीम ऑईल यांचा वापर केला. यामुळं तेल्या आणि मर रोगापासून बाग मुक्त झालीय. गांडुळांमुळं जमिनीची मशागत 8 फुटांपर्यंत झाली. प्रचंड संख्येनं प्लॉटमध्ये गांडुळं असल्यानं जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून राहिला आहे. शिवाय फळं दिसायला आणि चवीलाही उत्तम आहेत. पाहताक्षणी हा फरक लक्षात येतो. येथील दर्जेदार भगवा डाळिंब खरेदीसाठी राज्यातून तसंच राज्याबाहेरील व्यापारीही थेट त्यांच्या शेतावर पोहोचले आहेत.
कारभारणीची साथ
मजुरांच्या बरोबरीनं त्यांच्या पत्नी प्रेमा काम करतात. सर्व कामाचं नियोजन आणि देखभाल यात त्या जातीनं लक्ष देतात. या नावीन्यपूर्ण डाळिंब शेतीमध्ये त्यांना कारभारणीची मोलाची साथ मिळत असल्याचं ते आवर्जून सांगतात. सध्या त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येतात. या यशस्वी प्रयोगानंतर आता झिगझॅग पध्दतीनं डाळिंब लागवडीचा प्लॅन त्यांनी आखलाय.
तर तुम्हाला बघायचाय हा नावीन्यपूर्ण प्रयोग
संपर्क - राजीव नामदेव माने, प्रयोगशील शेतकरी, कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
मोबाईल नं. 09766280509
लागवड, उत्पादन व मार्केटिंग तंत्र
- एकरी 1500 झाडं
- झाडातील अंतर- 5X6 फुटाचं अंतर
- व्हरायटी- भगवा डाळिंब
- सेंद्रीय पध्दतीचा वापर
- एकही रसायन वापरलं नाही
- तणांचा आच्छादन म्हणून वापर केला
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढली
- आच्छादनामुळं 50 टक्के पाण्याची बचत
असा आहे फळांचा बहार
- फुलकळी भरपूर लागली
- मादी कळ्यांची संख्या जास्त
- खर्च फक्त एकरी 10 ते 15 हजार रुपये
- एका फळाचं वजन सरासरी 250 ग्रॅमपर्यंत
- दर्जेदार चकचकीत फळं
- एका झाडाला लगडली 70-80 फळं
- एका झाडाला जवळजवळ 20 किलोचा माल
- एकरी 1500 झाडांपासून मिळाले 30 टनाचं उत्पादन
- किलोला जागेवर 75-80 रुपयांचा दर
डाळिंब रोपांची नर्सरी
- भगवा व्हरायटी
- सेंद्रीय पध्दतीनं तयार केलेली रोपं
- सध्या 1 लाख रोपं उपलब्ध
- मर आणि तेल्या रोगमुक्त रोपं
- महिला मजुरांना रोजगार
Comments
- No comments found