प्रेरणा आर्वे कुटुंबाची
कासेगावमध्ये द्राक्ष लागवडीचा श्रीगणेशा करून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आर्वे कुटुंबीयाचा मोलाचा वाटा आहे. आज आर्वे कुटुंबाची उच्चशिक्षित तिसरी पिढी द्राक्षबागांचं व्यवस्थापन करत आहे. हे आर्वे कुटुंब मूळचं तासगाव तालुक्यातील बोरगावचं. दिवंगत वसंतराव आर्वे यांनी 1985 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील कासेगावात जमीन घेतली. ही जमीन डोंगराळ होती. त्यांनी ती लॅण्ड डेव्हलपमेंटमध्ये सपाटीकरण करून तिथं द्राक्ष बाग लावली. ही द्राक्ष बाग 60 एकरवर आहे. विशेष म्हणजे आर्वे यांनी हा द्राक्षांचा मळा ठिबक सिंचन पद्धतीनं फुलवला आहे. त्यानंतर या गावातील इतर शेतकऱ्यांनाही त्यांनी द्राक्ष बाग लावण्यासाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केलं.
मजूर बनले बागायतदार
आता या गावात द्राक्षांच्या बागाच बागा झाल्या आहेत. अल्पभूधारक शेतकरी मजूर म्हणून बागेत कामाला जात होते. त्यांनी देखील द्राक्षांच्या बागा केल्या आणि प्रगती केली. आता या गावात 90 टक्के द्राक्ष बागाच आहेत. इथं `एनआरसी` आणि द्राक्ष बागायतदार संघाच्या तज्ज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं जातं. हवामानाच्या अंदाजानुसार रोग-कीड व्यवस्थापनासाठी औषधांची गरजेनुसार फवारणी केली जाते. आर्वे यांनी जवळजवळ 40 द्राक्ष व्हरायटीची जोपासना केलीय. रेड ग्लोब, कृष्णा आणि तास ए गणेश या व्हरायट्यांची त्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड करून ते निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत.
द्राक्ष 'तास ए गणेश'चे जनक
`तास ए गणेश` हा व्हरायटीचे जनक दिवंगत वसंतराव आर्वे आहेत. त्यांनीच ही व्हरायटी शोधून काढली. नाशिक, सांगली, तासगाव, सोलापूर, पुणे, सातारा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात या व्हरायटीची मोठ्या प्रमाणात लागवड होते. ही द्राक्ष गोडीला चांगली आहेत. बरेच दिवस ही द्राक्ष टिकतात. तसंच यांचा रंगही पिवळसर देखणा आहे. ग्राहकांकडून या व्हरायटीला चांगली मागणी आहे.
दर्जेदार बेदाणा निर्मिती
कासेगावमधील द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा निर्मितीकडंही कल आहे. द्राक्ष उत्पादनासोबतच द्राक्ष टिकवणं आणि उपउत्पादन म्हणून इथं बेदाणा निर्मितीही केली जाते. हा बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला जातो. पंढरपूर बाजार समितीमधील बेदाणा मार्केट चांगलं आहे. शिवाय इथलं हवामानही दर्जेदार बेदाणा निर्मितीसाठी चांगलं आहे.
शेततळी फायद्याची
दुष्काळग्रस्त स्थितीतही पाण्याची गरज भागवण्यासाठी आर्वे यांनी शेततळ्याचीही निर्मिती केलीय. या तलावाची पाणी साठवण क्षमता चार कोटी लिटर पाणी राहील एवढी आहे. सध्या या तळ्यातूनच बागेला पाणी दिलं जात आहे.
गावातच मिळाला रोजगार
कुशल मजुरांना मोठ्या प्रमाणात या द्राक्ष गावात कायमचं काम मिळालंय. शेजारच्या गावातूनही कासेगावात मोठ्या संख्येनं मजूर कामाला येतात.
या गावातून थायलंड, मलेशिया, सिंगापूर या देशात द्राक्षांची निर्यात केली जाते. एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्ष येथील बागातदार तयार करतात. त्यासाठी बागेचं वर्षभर योग्य व्यवस्थापन केलं जातं. सध्या द्राक्षांना चांगला दर आहे. निर्यातदार व्यापारी कासेगावातील बागेत येऊन माल खरेदी करताहेत.
सल्ला रोहन आर्वेंचा...
जमिनीचा पोत महत्वाचा
द्राक्ष उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीबाबत बोलताना रोहन आर्वे म्हणाले, की योग्य निचरा असलेली आणि हलकी, मध्यम पोत असलेली असावी. जमिनीचा पीएच 6 ते 7.5 पर्यंत असावा. द्राक्ष पिकासाठी उष्ण आणि कोरडं हवामान अतिशय उपयुक्त आहे. या वातावरणात द्राक्ष पिकाला चांगला बहर येतो. याची लागवड जून-जुलै महिन्यात करावी. द्राक्ष लागवड करताना रोपांच्या वळीतील अंतर 3X1.5 मीटर असणं आवश्यक आहे. थॉमसन सिडलेस, तास-ए-गणेश, सोनाका, माणिक चमन, शरद सीडलेस, फ्लेम सीडलेस, कृष्णा या सुधारित जाती द्राक्ष उत्पादनासाठी उत्तम आहेत. द्राक्ष मण्याची वाढ चांगली होण्यासाठी जिब्रॅलिक अॅसिड या संजीवकाचा वापर करावा. द्राक्षवेलीच्या काडावरील डोळ्यामध्ये सूक्ष्मघडाची निर्मिती होण्यासाठी एप्रिलची छाटणी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणं द्राक्षकाडीमधून घड बाहेर येण्यासाठी ऑक्टोबर छाटणी आवश्यक आहे.
वेल व्यवस्थापन
द्राक्षाचं पीक घेताना वेलीचं योग्य व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे, असं रोहन आर्वे म्हणतात. यासाठी द्राक्षाच्या एका वेलीवरील काड्यांची संख्या 35-40 या प्रमाणात ठेवावी. तसंच वेलीवरील पानांची संख्या एका काडीवर 15-16 पानं या प्रमाणात असावी. याचबरोबर द्राक्ष वेलींची हेक्टरी एकूण संख्या 2,222 असायला हवी, अशी माहिती देताना आर्वे म्हणाले.
द्राक्षाची गुणवत्ता
उत्तम गुणवत्ता हे उत्पादनाचं मूल्य निर्धारित करत असतं. त्यानुसार उत्पादनाला मागणी वाढते. यासाठी द्राक्षाची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी विरळणी, गर्डलिंग याचबरोबर पिकासाठी योग्य वेळी संजीवकाचा योग्य वापर करणं अतिशय महत्त्वाचं असतं. . नत्र, स्पुरद, पालाश खतांची मात्रा पिकाला देताना ती कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणं द्यावी. याशिवाय विद्राव्य खतंही ड्रीपद्वारे दिली गेल्यास उत्तम, असा सल्ला रोहन आर्वे देतात.
द्राक्षांवरील किडी
पिकाच्या उत्पादनाबरोबरच पिकाची काळजी अथवा निगराणी करणं तितकंच आवश्यक आहे. या पिकावर फूल कीड, मिलीबग या जीवाणूंचा प्रादुर्भाव प्रकर्षानं जाणवतो. यासाठी एकात्मिक पध्दतीनं कीड आणि रोगाचं नियंत्रण करावं. हवामानाच्या अंदाजानुसार कीडरोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
यासाठी कृषी विद्यापीठाच्या शिफारशींचा वापर करावा, असं आर्वे पुढं म्हणतात.
संपर्क - रोहन आर्वे, कासेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर
मोबाईल- 090 11 011 861
Comments
- No comments found