कोकणातल्या कोणत्याही जत्रेला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई दिसतील. आंगणेवाडीच्या जत्रेत खास आकर्षण असतं ते मालवणी खाजांचं. गुळाच्या पाकात तयार करण्यात आलेल्या खाजाची खरेदी करण्यासाठी भाविक एकच गर्दी करतात. त्याला कारणही आहे, भराडीदेवीचा प्रसाद म्हणूनच मालवणी खाजाकडं भाविक पाहत असतो. त्यामुळं काहीही झालं तरी भाविक मोठ्या श्रद्धेनं गावाकडं आपल्या मित्रमंडळींना, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना देण्यासाठी पाच-दहा किलो खाजा घेऊन जात असतो.
असा तयार होतो मालवणी खाजा
पहिल्यांदा चणा बेसन घ्यायचं. बेसनमध्ये वाटाण्याचं पीठ नसून चण्याचंच बेसन आहे, याची खात्री करून घ्यायची आणि भिजवून त्याची तेलात कांडी तळून घ्यावी. त्यानंतर गुळाचा पाक तयार करायचा. गूळ बारीक करून कढईमध्ये टाकायचा. त्यानंतर त्यात आलं टाकायचं. आता यात आल्याचं प्रमाणही निश्चित आहे, पाच किलो गुळात 600 किंवा 700 ग्रॅम आलं टाकायचं. गूळ आणि आल्याचा पाक तयार होत आल्यावर त्यात थोडीशी वेलची टाकायची. पाक तयार झाल्यावर त्यात कांडी टाकून परतायची, ती सुकत आल्यावर त्यावर पांढरा तीळ भुरभुरावयाचा. बस्स, झाला खाजा तयार. खाजा हा चवदार असतोच, पण त्यात गूळ असल्यामुळं आरोग्यासाठीही लाभदायक असतो, असं इथले ग्रामस्थ सांगतात.
बारमाही मागणी
मालवणी खाजाला एरवीही प्रचंड मागणी असते. पण, आंगणेवाडीच्या जत्रेत त्याच्या विक्रीचा उच्चांक बघायला मिळतो. 10-15 लाख भाविक देशभरातून या जत्रेत येतात. खाजाची किंमत आपण पाहिली तर 120-140 रुपये प्रती किलो असते. 10 लाख लोक जरी आपण गृहीत धरले आणि प्रत्येकानं एक किलो खाजा खरेदी केला तरीही 10 कोटींवर ही उलाढाल पोहोचते. हे आकडे आपण कमीत कमी धरले आहेत. यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता, की तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेमुळं स्थानिकांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे.
मालवण तालुका निसर्गरम्य तर आहेच. त्या ठिकाणी स्कूबा डायबिंग, स्नॉर्कलिंगही आहे. पण मालवणचं नाव काढलं की पहिल्यांदा आठवण होते मालवणी खाजाची. कोणीही आपल्या ओळखीची व्यक्ती मालवणात जायची असेल, तर आपण त्यांना मालवणी खाजा आवर्जून आणायला सांगतो. त्यामुळं या खाजानं मालवणला विशेष ओळख दिली आहे, असं सांगायला काहीच हरकत नाही.
आंगणेवाडीच्या जत्रेत येणारा प्रत्येक जण इथली गर्दी, इथला उत्साह, आल्हाददायक वातावरण पाहून बेभान होऊन जातो. भराडीदेवीच्या कौतुकाबरोबरच खाजा म्हणजे जीव की प्राण, असे बोल इथं सर्रास ऐकायला मिळतात.
Comments
- No comments found