स्पेशल रिपोर्ट

घोंगडीला गरज सरकारच्या ऊबेची

विवेक राजूरकर, अंबड, जालना
"काठीनं घोंगडं घेऊन द्या की रं.. मला बी जत्रेला येऊं द्या की," या गाण्यात उल्लेख केलेली ही घोंगडी महाराष्ट्रात प्राचीन काळापासून प्रसिध्द आहे. ग्रामीण भागात या घोंगडीला खूप महत्त्व असलं, तरी शहरी भागातील 'युज एण्ड थ्रो' संस्कृतीत तिचं अस्तित्वच संपुष्टात येताना दिसतंय. शिवाय या व्यवसायातून पुरेसं उत्पन्न मिळत नसल्यानं घोंगडी बनवणारे हात आता दुसऱ्या उद्योगधंद्याकडं वळताहेत. त्यामुळं संतपरंपरेपासून चालत आलेली ही घोंगडी काही वर्षांनंतर दिसेनाशी होईल की काय, अशी शक्यता निर्माण झालीय.
 

 

घोंगडी बनवणाऱ्या या धनगर समाजाचे मुख्यतः दोन प्रवाह आहेत – एक हटकर आणि दुसरा खुटेकर. हटकर म्हणजे शेळ्या-मेंढ्यांचे कळप पाळून भटकणारी जमात. रुमालवाले, टोपीवाले आणि पागोटेवाले या पोषाख पद्धतीवरून हटकरांतील वेगळंपण लक्षात येतं. खुटेकर मात्र एका जागी निवास करून घोंगडी विणण्याचं काम करतात. जमिनीत रोवलेल्या लाकडी खुट्याला बांधलेल्या हातमागावर घोंगडी विणली जाते, म्हणून त्यांना खुटेकर असं म्हणतात. अशा या समस्त धनगर समाजाचं आराध्य दैवत म्हणजे बिरोबा म्हणजेच वीरभद्र.

 

ghogadi photo 6जालन्यातील अंबड तालुक्यातील ताडहदगाव इथलं चाळके कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून हा लाकडी खुट्यावर हातमाग विणण्याचा व्यवसाय पारंपरिक पद्धतीनं करतंय. घोंगडी विणण्याचं काम दत्ता चाळके आणि त्यांचं कुटुंब संयुक्तपणं करतं. संपूर्ण गाव त्यांना घोंगडी कारागीर म्हणूनच ओळखतं. काही वर्षांपूर्वी जालन्यात धनगरांची चार घरं होती. पण सध्या मात्र चाळकेंचं एकच कुटुंब इथं घोंगडी बनवण्याचा व्यवसाय करताना दिसतंय. उर्वरित तिन्ही कुटुंबं इतर व्यवसायांतून आपला उदरनिर्वाह चालवतात, तर काही स्थलांतरितही झालीत.


आतापर्यंत महाराष्ट्रात आणि देशातील अनेक राज्यांत भरवण्यात आलेल्या हस्तकला प्रदर्शनात घोंगडी आणि घोंगडी विणण्याची प्रात्यक्षिकं चांगलीच गाजली आहेत. त्यामुळं त्यांना राज्य शासनाचे अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, असं दत्ता चाळके म्हणतात. लाकडी हातमागावर विणल्या जाणाऱ्या घोंगडीची बांधणी अतिशय मजबूत असते. त्यामुळं ती सहजपणं अनेक वर्षं टिकते. परंतु अंगाला खाज आणणारी आणि खरखरीत असल्याकारणानं एसीमध्ये राहणाऱ्या शहरी संस्कृतीनं या घोंगडीला नेहमीच दूर केलंय. शिवाय घोंगडीत असलेले आरोग्यविषयक गुणधर्म आता अनेक संशोधनांतून सिध्द झाले आहेत. त्यामुळं घोंगडीला शहरातून नव्हे तर विदेशातूनही मोठी मागणी आहे.

 

घोंगडीचे फायदे
पारंपरिक पद्धतीनं हातमागावर बनवलेली घोंगडी ही जवळपास ९ ते १० वर्षं टिकते. ही धुवावी लागत नाही. पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत ही घोंगडी उपयोगात येते, बहुगुणी असलेली ही घोंगडी थंडीच्या दिवसात गरम, तर उन्हाळ्यात थंडावा देते. याबरोबरच घोंगडीचे अनेक फायदे आहेत, असं जनाबाई कुरधणे या घोंगडी व्यावसायिकेनं सांगितलं.

 

ghogadi photo 8चाळके कुटुंबानं तर घोंगडी आरोग्यदायी कशी आहे आणि तिचे विविध उपयोगांची माहिती दिली ती पुढीलप्रमाणं :-

1) कंबरदुखी, मणकेदुखी, संधिवात आणि सांधेदुखीवर गुणकारी
2) रक्तवाहिन्या सुरळीत चालतात
3) पित्त, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीपासून मुक्तता
4) थंड फरशी आणि संगमरवरी फरशीवर आंथरल्यानं थंडीपासून बचाव
5) साप, विंचू, मुंगी, मधमाश्या, ढेकूण जवळ येत नाही.
6) डास, मच्छर चावत नाहीत, म्हणजेच मलेरियापासून संरक्षण.
7) पावसापासून संरक्षण करण्यासाठी घोंगता म्हणून वापर
8) अर्धांगवायूचा धोका टळतो तर डायबेटिजही कमी होतो

 

अशी बनते घोंगडी
एक घोंगडी बनवण्यासाठी साधारणपणं दोन व्यक्तींना १० ते १२ दिवस लागतात. सर्वप्रथम सगळ्या मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं, यानंतर त्यांचे केस कातरले जातात. नंतर हे कातरलेले केस पिंजले जातात. पिंजलेल्या केसांपासून लोकर तयार केली जाते. यातील काळी-पांढरी लोकर वेगळी करण्यात येते. यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. हे तयार सूत दोन्ही बाजूंनी ताणून घेतलं जातं. नंतर या सुताला चांगला पीळ यावा, मजबुती यावी आणि घोंगडी विणणं सुलभ व्हावं म्हणून रात्रभर भिजवलेले चिंचुके बारीक कुटून त्यापासून बनवलेली खळ लावली जाते. साधारणपणं ही घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात, असं दत्ता चाळके यांनी घोंगडी कशी जन्म घेते याची कहाणी सविस्तर सांगितली.

 

ghogadi photo 44घोंगडी व्यवसायातून बचत गटाची निर्मिती
या घोंगडीला चाळके कुटुंबानं आधुनिकतेचा साज देऊन, लोकरीपासून गादी, उशी, लोड, आसनपट्टी, गालिचा, कानटोपी, हातमोजे असे नानाविध प्रकार निर्माण करून बचत गटामार्फत प्रसार आणि प्रचार केलाय. यामुळं अनेक महिलांना रोजगारही मिळवून देता आला.

 

घोंगडी व्यवसायाला घरघर
आधुनिक काळात हातमागावरील घोंगडी लोप पावत चाललीय. मुळात घोंगडीची निर्मिती करणाऱ्या कारागिरांना मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागतात. एक घोंगडी बनण्यास लागणारा वेळही खूप लागतो. त्या तुलनेत म्हणावी तशी किंमत मिळत नाही. त्यामुळं तरुण पिढी या व्यवसायाकडं दुर्लक्ष करीत आहे. परंतु या सर्वांवर मात करत चाळके कुटुंबातील सदस्य या लुप्त होत चाललेल्या कलेचा वारसा पुढं नेण्यास धडपडत आहेत. दिवसेंदिवस नष्ट होत असलेल्या गायरान जमिनी, शेतात मेढ्यांना चरायला असलेली बंदी आणि मेंढ्यांची रोडावलेली संख्या यामुळं लोकरीचं प्रमाण कमी होऊ लागलंय. या सर्व अडचणी आज या व्यवसायास मारक ठरत आहेत. त्यामुळं चाळके कुटुंब, तसंच इतर व्यावसायिक घोंगडीसाठी लागणारी लोकर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून आयात करतात.

 

सरकारी राजाश्रयाची गरज
चाळके कुटुंबीयाच्या घोंगडीला विदेशात मागणी आहेच, त्याचबरोबर तिथल्या हस्तकला प्रदर्शनासाठी त्यांना अनेक वेळा आमंत्रितही केलं गेलंय. ही खूपच गौरवास्पद बाब आहे.


महाराष्ट्रात बिरोबा, विरचा म्हसोबा, बिदाल मलवडी, रुईचा, बाबरीबुवा इथल्या यात्रांमध्ये या घोंगडीला मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. यामध्ये सर्वाधिक उलाढाल बाबरीबुवा (इंदापूर) इथल्या यात्रेमध्ये होत असते. यात हातमागावर तयार केलेली घोंगडी, सुतीपटी, जेन आणि देवासाठी आसनपटी यांची मोठी विक्री होते, तर या घोंगडीचा दर ५०० रुपयांपासून २००० मिळतो, असं चाळके म्हणाले.

 

या व्यवसायावर कोल्हापूरमधील शेनगाव, मुरगड, वडगाव कापशी सेनापती, सांगली जिल्ह्यातील आळसुंद, देवराष्ट्र, सोलापूरमधील चिखलठाण साडे, कोंडीत, टाकळी, टेंभुर्णी, पुण्यातील घोरपडवाडी, आळेफटा, बोरी या गावांतील हजारो कुटुंबं अवलंबून आहेत. पण तरीही सरकारकडून या व्यवसायाला राजाश्रय मिळालेला नाही. त्यामुळं या व्यावसायिकांना घोंगडीची विक्री हस्तकला प्रदर्शनामार्फत किंवा गावोगावी फिरून करावी लागते. सरकारनं घोंगडीला खादी उद्योगाप्रमाणंच दर्जा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी घोंगडी व्यावसायिक करत आहेत. सरकारनं जर याबाबत वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर लवकरच हा व्यवसाय लुप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

 

Comments (3)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.