कोकणात वरील प्रकारचे शेतीपूरक व्यवसाय अद्याप रुजलेले नाहीत. व्यावसायिक स्तरावर त्याचा जेवढा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. मर्यादित स्वरूपातच तो वाढला. शेतीच्या जोडीला दुग्ध व्यवसाय, शेळीपालन शेतकऱ्यांनी करावं, असं कायम म्हटलं जातं. पण देसाईंनी या पारंपरिक पद्धतीला छेद देत, पशुपालनाला प्राधान्य देऊन शेतीची त्याला जोड दिलीय. हे पूरक व्यवसाय हेच त्यांचा मुख्य व्यवसाय झालाय.
शेळीपालन – नफा देणारा व्यवसाय
ग्रामलक्ष्मी फार्ममध्ये आल्यावर आपल्याला इथं विविध जातींच्या शेळ्या दिसतात. देसाईंनी इथं उस्मानाबादी आणि आफ्रिकन बोर जातीच्या २५ शेळ्या पाळल्या आहेत. उस्मानाबादी शेळी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागासाठी उत्तम तर आहेच, पण कोकणातही ती चांगल्याप्रकारे तग धरते. उस्मानाबादी शेळीचं मांस चवीला रुचकर असल्यानं त्याला जास्त मागणी आहे. या शेळीच्या वर्षाला दोन वेळा वीण होतात आणि महत्त्वाचं म्हणजे या जातीत जुळ्यांना जन्म देण्याचं प्रमाण अधिक असल्यानं शेतकऱ्यांना याचा दुहेरी फायदा होतो, असं देसाई म्हणतात. त्याचबरोबर दुधासाठीही उस्मानाबादी शेळी चांगली आहे. आफ्रिकन बोर जातीची शेळीचं पालनही व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर आहे. ही वाढीला चांगली आणि हिचंही मांस रुचकर आहे. आफ्रिकन बोरची योग्य काळजी घेतली तर सहा महिन्यात तिची २५ ते २७ किलो वजनापर्यंत वाढ होते.
गावरान कोंबड्यांचं पालन
शेळीबरोबर गावरान कोंबड्यांचा व्यवसायही शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. देसाईंच्या फार्ममध्ये जवळजवळ ५०० कोंबड्या आहेत. गावरान कोंबड्यांना किलोमागे २०० रुपये भाव सहज मिळतो. त्याचबरोबर त्यांच्या अंड्यांनाही चांगली मागणी आहे. बाजारभावापेक्षा कमी दरात देऊनही शेतकऱ्यांना ती परवडू शकतात. इथं जागेवरच एका अंड्याला पाच रुपये किंमत मिळत असून त्याची आधीच बुकिंग झालेली असते, अशी माहिती दीपक देसाई देतात.
ससा पालन
संकरित जातीच्या ३५-४० सशांचं पालन देसाईंनी आपल्या फार्ममध्ये केलंय. वेगवेगळ्या रंगांच्या या सशांना बाजारात चांगलीच मागणी आहे. एका सशाची वर्षातून चार वेळा वीण होऊन एका वेळेस यापासून आठ पिल्लांचा जन्म होतो. त्यामुळं वर्षाला एका सशापासून २५-३० पिल्लं मिळतात. सशाचं सहा महिन्याचं एक पिल्लू २५० – ३०० रुपयांना विकलं जातं.
पूर्वी देसाईंच्या फार्ममध्ये ऑस्ट्रेलियन यॉर्कशायर जातीच्या वराहाचं (डुक्कर) पालन केलं जायचं. त्यांचा हा व्यवसाय तेजीतही होता. त्यांनी २५ माद्या आणि दोन नर पाळले होते. सहा महिन्यात एक मादी १० ते १२ पिल्लांना जन्म द्यायची. सहा महिन्यात त्यांचं वजन ५०-६० किलो भरायचं. एका जिवंत वराहामागं ५०-६० रुपये प्रति किलो दराप्रमाणं 2500 ते 3600 रुपये मिळायचे. या व्यवसायात १०० टक्के नफा होता. पण स्वाईन फ्लूच्या भीतीमुळं हा व्यवसाय त्यांना बंद करणं भाग पडलं.
पशुपालनाबरोबरच देसाई बागायती शेतीही करतात. आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागाही त्यांच्या फार्ममध्ये आहेत. रब्बी हंगामात इथं भाजीपाल्याची लागवडही करण्यात येते. एकूणच काय तर कोकणातल्या इतर प्रयोगशील शेतकऱ्यांनी दीपक देसाईंसारखा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती हा व्यवसाय म्हणून केला, तर तो नक्कीच नफ्याचा ठरू शकतो, असंच या उदाहरणावरून म्हणता येईल.
संपर्क : दीपक देसाई - 9730015720
Comments
- No comments found