स्पेशल रिपोर्ट

महाबळेश्वर बनलंय मधाचं आगार!

शशिकांत कोरे, सातारा
संघटीत पातळीवर नियोजनबद्ध काम करण्यात जगात मधमाशांचा हात कुणीच धरू शकत नाही. त्यामुळंच व्यवस्थापनाचं उत्तम मॉडेल म्हणूनही मधमाशांकडं पाहिलं जातं. त्यांच्यामुळं जो मध मिळतो तो पूजेपासून औषधापर्यंत सर्वत्र उपयोगी असतो. त्यामुळं मधमाशीपालन हा चांगला उद्योग म्हणून आकाराला येतोय. थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरमधील विपुल वनसंपदेमुळं हा व्यवसाय इथं चांगलाच बहरलाय. आजमितीला राज्यातील एकूण मधउत्पादनापैकी 50 टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वरात होतं. त्यात महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटीचा सिंहाचा वाटा आहे.
 


एकमेव सहकारी संस्था

सह्याद्रीच्या डोगंरद-यातील मधमाशीपाळांना स्वावलंबी बनवण्यासाठी 25 मे 1955 साली महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटी स्थापन करण्यात आली. सोसायटीनं गेल्या 57 वर्षात अनेक संकटांवर मात करीत दुर्गम भागातील 110 गावातील 1700 सभासदांना मधमाशीपालनासाठी मदतीचा हात दिला जातोय. त्यांना मधपेटीसह प्रशिक्षण दिलं जातं. मधमाशा वसाहती दिल्या जातात. एका मधपेटीतून 10 ते 15 किलो मध संकलन होतं. सुरुवातीस एक पौंड मधासाठी सव्वा रुपाया दर दिला जात होता. आता प्रतिकिलो 110 ते 130 रुपये किलो दर सभासदांना दिला जातोय. संस्थेत वार्षिक 50 हजार किलो मध संकलन होऊन सुमारे तीन कोटींची उलाढाल होते, अशी माहिती संस्थेचे चेअरमन धो. ह. जाधव यांनी दिली.
सहकारीतत्वाने काम करीत होतीय. 'बिना सहकार, नही उद्धार' हे सहकाराचं ब्रिदवाक्य या संस्थेन सार्थ ठरवलंल.

 

honeybee 27 प्रकारची मधनिर्मिती
अनेकांनी मध चाखला असेल. पण 'मधुसागर'मध्ये पिसा, जांभूळ, हिरडा, गेळा, आखरा, कार्वी, व्हाटी, अशा सात प्रकारचा मध मिळतो. पिसा, जांभूळ, हिरडा, गेला, या जंगली झाडाच्या फुलांवरील मधमाशा पराग गोळा करतात. असा मध दरवर्षी मिळतो, पण आखर झाडाला 4 वर्षातून एकदा फुले येतात तर कार्वी आणि व्हाटी नावाच्या झाडांना सात वर्षातून एकदाच फुले येतात. त्यामुळं असा मध फार दुर्मिळ बनत चाललांय. विशेष म्हणजे, या संस्थेने आतंरराष्ट्रीय दर्जाची मधकॅंडी तयार केलींय. ती फक्त फक्त मधुसागरमध्येच मिळते. माहितगार ग्राहक महाबळेश्वर आल्यानंतर आवर्जून त्याची लज्जत चाखतो, अशी माहिती व्यवस्थापक महादेव जाधव यांनी 'भारत4 इंडिया'शी बोलताना दिली.

 

मधउत्पादनात महाबळेश्वर आघाडीवर
आजमितीस राज्यातील ४९० गावांमध्ये ४ हजार मधपाळ २७ हजार मधपेट्यांतून दरवर्षी सुमारे ७८.५० लाख रुपये इतके उत्पादन घेत आहेत. त्यामध्ये एकट्या महाबळेश्वरचा वाटा ५० टक्के इतका आहे. महाबळेश्वरची नैसर्गिक रचना पाहिली असता येथील ७० टक्के भाग घनदाट जंगलांनी व्यापला आहे. येथील सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास करून मुंबई खादी ग्रामोद्योग समितीने १९४६ मध्ये राज्यातील पहिले मधुमक्षिका पालन केंद्र सुरू केले. आज महाबळेश्वर तालुक्यामध्ये राज्यात सर्वाधिक सुमारे २ हजार मधपाळ तर मधमाशांच्या १,६०० वसाहती आहेत. येथून दरवर्षी सुमारे २० ते २५ लाख रुपयांपर्यंत मधाचे उत्पादन घेतले जाते.

 

असं चालतं मधमाशांचं काम
मधमाशा समुहानं राहतात. एका समुहामध्ये १० ते ३० हजार मधमाशा असतात. त्यामध्ये एक राणीमाशी, कामकरी आणि नरमाशांचा समावेश असतो. या तिन्ही माश्या वसाहतीतील प्रमुख घटक आहेत. राणीमाशीचा नराबरोबर हवेत संयोग होतो आणि शुक्रबीज हे राणी माशीच्या पोटात असलेल्या एका विशिष्ट पिशवीत साठवलं जातं. त्याचा उपयोग राणीमाशी अंडी घालण्यासाठी करते. संयोग झाल्यानंतर राणीमाशी २४ तासानंतर अंडी देण्यास सुरूवात करते. यामधून कामकरी व नरमाशांचा जन्म होतो. कामकरी व नरमाशा फुलातील पराग व मकरंद गोळा करण्याबरोबरच मधाचं पोळं स्वच्छ करणं, मोठ्या अळ्यांना खाद्यपुरवठा करणं, आदी कामं सातत्यानं करत असतात.
मधमाशा फुलातून मकरंद गोळा करतात. पुढे शरीरातील पाचक रस त्यात मिसळून व मकरंदातील पाण्याचं प्रमाण कमी करून शुध्द मध पोळ्यात साठवितात. कामकरी मधमाशांच्या डोक्यात असणाऱ्या फॅरिजियल ग्रंथीमधून रॉयल जेली हा पदार्थ स्रवतो. कामकरी व राणी माशांच्या अळ्यांची संपूर्ण वाढ होईपर्यंत हा पदार्थ त्यांना भरविला जातो.

 

honeybee 6

मधाचे फायदे-
सर्दी, खोकला, थंडी, मधुमेह, अपचन, अस्थमा, कॅल्शीयम, गुल्कोजची कमतरता आदी रोगांवर मध गुणकारी आहे. मेणबत्ती, मेण पत्रा, दारूगोळा, शाई, चिकट टेप, वंगण, रंग, वॉर्निश, छपाईची शाई, बूट, औषधे, डोळे व त्वचाविकार आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे परागकण हे भूक वाढविणे व रक्तदाब कमी करणाऱ्या औषधांमध्ये वापरले जातात. यामध्ये ३५ टक्के पिष्टमय पदार्थ, २० टक्के प्रथिनं तर १५ टक्के पाणी व क्षार असतात. एक किलो मधापासून ३ हजार कॅलरीज उष्मांक मिळतो. एक चमचा मधापासून १०० कॅलरीज मिळतात. मधात क्षार, आम्ले, प्रथिने, जीवनसत्वे, प्रथिने आदी मुबलक प्रमाणात असल्यानं शरीरातील या घटकांची कमतरता भरून निघते.


मधमाशा पालनाचे फायदे
मध हे अत्यंत शक्तिदायी असं पौष्टिक अन्न व औषध आहे. मधापासून मेन तयार केलं जातं. तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये मधाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. मधमाशांपासून मिळणारे राजान्ने (रॉयल जेली), देश, विष (व्हेमन), पराग (पोलन), रोंगण (प्रोपॉलिन्स) ही सर्व उच्च प्रतीची औषधे आहेत. मधमाशांपासून होणाऱ्या परागीभवनामुळे शेती व फळबागांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत मिळते. तसेच मधमाशांचे संरक्षण व संवर्धन होण्यास मदत मिळते. पर्यावरण समतोल राखून नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी मधमाशा पालन व्यवसाय महत्वाचा आहे.


खादी ग्रामोद्योगच्या योजना
मधमाशा पालन एक नमुनेदार ग्रामोद्योग आहे. यासाठी जागा, इमारत, वीज आदींसाठी खर्च येत नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञान असून अल्प खर्च व रोजगार निर्मिती करून देणारा हा उद्योग आहे.
मध उद्योगाच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग समितीने विविध योजना राबविल्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पश्चिम घाट विकास कार्यक्रम योजना, पीक उत्पादन वाढीसाठी मधमाशीपालन योजना, मानव विकास मिशन, आत्मा अदिवासी विकास योजना, राष्ट्रीय समविकास योजना यांद्वारे शासन कमी व्याजदरात अर्थसहाय्य उपलब्ध करून देतं. तसंच मधपेट्या, मधयंत्र व लाभार्थींना एक महिन्याचं प्रशिक्षण व विद्यावेतन देखील दिलं जातं.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.