स्पेशल रिपोर्ट

दुष्काळातलं माळरान फुललंय बहुपिकानं

यशवंत यादव, सोलापूर
राज्य दुष्काळानं होरपळतंय. दुष्काळग्रस्तांना चारापाणी देण्याचं काम सरकार करतंय, तरीही दुष्काळग्रस्तांच्या हलाखीत दिवसेंदिवस भरच पडतेय. ही वस्तुस्थिती एका बाजूला असताना दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यातील शिवणे येथील सुरेश रामहरी गायकवाड हे मात्र मजेत शेती करण्यात गुंग आहेत. माळरानाच्या ओसाड जमिनीवर त्यांनी द्राक्ष, कलिंगड, खरबूज, झेंडू, केळी आणि उसाचंही पीकही घेतलंय. तुम्ही म्हणालं हे कसं काय बाबा? अहो, त्यांनी माळावर तब्बल तीन हजार कोटी लिटरचं शेततळं उभारून ही जादू घडवलीय. या तळ्यातल्या पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करून गायकवाड बहुपीक पद्दत राबवतायत. हे शेततळं म्हणजे जणू या परिसरातलं ओअॅसिसच ठरलंय.
 

Malran 9बहुपीक पध्दतीचा यशस्वी प्रयोग
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दुष्काळ पाचवीलाच पुजलाय. इथली बहुतांश जमीन ही माळरान वा ओसाड आहे. काटेरी झुडुपं, रणरणतं ऊन, पाण्याचा दुष्काळ, माळावरील कुसळं ही या भागाची ओळख. अशा या ठिकाणचा ओअॅसिस शोधलाय 'भारत4इंडिया'नं. ओसाड माळरानावर शेततळ्याच्या मदतीनं बहुपीक पध्दतीचा प्रयोग यशस्वी झाल्यानं इथ नंदनवन फुललंय. शेततळ्याच्या मदतीनं गायकवाड यांनी बहुपीक पध्दतीचा यशस्वी प्रयोग केलाय. मोनोक्रॉपिंगमध्ये जोखीम जास्त असल्यानं `मल्टिक्रॉपिंग सिस्टिम` शेतकऱ्यांना फायद्याची ठरू शकते, असं ते म्हणतात.


हॉर्टिकल्चर क्रांतीची नांदी
सांगोल्यासारख्या अवर्षणप्रवण भागात त्यांनी शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा वापर करून द्राक्ष, केळी, झेंडू, कलिंगड, खरबूज इत्यादी हॉर्टिकल्चर पिकं यशस्वीपणं घेतल्यानं ही हॉर्टिकल्चर क्रांतीची नांदीच म्हणावी लागेल. त्यांनी केळीयोग्य व्यवस्थापन केलं आहे. द्राक्षाची त्यांची बाग जुनी आहे. द्राक्षापासून उत्तम दर्जाचा बेदाणा ते शेडमध्ये तयार करतात.


भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ
या प्रयोगशील शेतकऱ्यानं आपल्या शेतात मातीचे बंधारे बांधले आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी या बंधाऱ्यांत अडवून साठवलं जातं. जवळच असलेल्या कॅनॉलमधीलही गाळ त्यांनी काढलाय. याशिवाय आपल्या शेतात असलेल्या विहिरींचं आणि बोअरचं पुनर्भरण केल्यामुळं भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते, असं ते गायकवाड म्हणतात.

 

Malran 8मल्टिक्रॉपिंग
माळरानावर त्यांची एकूण 110 एकर शेती आहे. त्यांनी या शेततळ्याच्या पाण्यावर मल्टिक्रॉपिंग सिस्टिम यशस्वी केलीय. एकूण 110 एकर शेतीपैकी 50-55 एकर शेती डेव्हलप करून नऊ एकरवर कलिंगड - खरबूज, 15 एकरवर केळी, 10 एकरवर द्राक्ष, नऊ एकरवर झेंडू आणि थोडंफार उसाचं पीक अशा प्रकारे बहुपीक पद्धत राबवून यशस्वी शेती केलीय. त्यांची ही पिकं आज जोमानं डुलत आहेत.

 

पाण्यात बचत
कलिंगड, खरबूज, झेंडूची लागवड बेडवर करून त्यावर पॉलिथिनचं आच्छादन केलं आहे. यामुळं 80 टक्के पाण्याची बचत होते. या सर्व बहुपीक पध्दतीसाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केलाय.

 

डाळिंबाकडून बहुपिकाकडं...
या पद्धतीनं शेती करण्याअगोदरआधी त्यांची 85 एकरवर डाळिंबांची बाग होती. दुष्काळामुळं आणि तेल्या-मर रोगामुळं या बागेचं प्रचंड नुकसान झालं. मग त्यांनी ही डाळिंबाची बाग काढली आणि ते या बहुपीक पद्धतीकडं वळले. एकाच पिकाच्या मागे शेतकऱ्यांनी जाऊ नये, असा सल्ला सुरेश गायकवाड देतात. आपण जर एकावेळी अधिक पिकं घेतली तर त्याचा फायदा होतो. एका पिकावर अवलंबून असल्यावर धोका जास्त असतो. आणि हा धोका जास्त पिकं घेतल्यावर कमी होतो, असा सल्ला गायकवाड देतात. शेततळ्यामुळं आणि ड्रीपमुळं या सर्व पिकांची चांगली जोपासना करणं त्यांनी शक्य झालं.

 

कलिंगड-खरबूज परवडतंय
दर दोन-तीन महिन्याला पैसे मिळत असल्यानं कलिंगड-खरबूज लागवड परवडते. कीड रोगाचं नियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी फवारणी केली जाते. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी या पिकाकडं वळावं, असा सल्ला त्यांनी दिलाय.

 

इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा
आधुनिक पध्दतीनं माळरानावर केलेली सुरेश गायकवाड यांची नावीन्यपूर्ण शेती पाहण्यासाठी अनेक भागांतून शेतकरी इथं येत आहेत. कमी पाण्यावर घेतलेली ही शेती पाहून इतर शेतकरी भारावून जाताहेत.

 

Malran 1कृषी विभागाचं साहाय्य
गायकवाड यांनी उबारलेल्या शेततळ्यासाठी त्यांना कृषी विभागाचं चांगलं सहकार्य मिळालंय. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत त्यांना शासनाचं अनुदान मिळालंय. तीन हजार कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा पिकासाठी वापर करून त्यांनी माळरानावरची शेती विकसित केलीय.

 

माळरानावर नवचैतन्य
त्यांनी घेतलेल्या झेंडूच्या फुलशेतीचं व्यवस्थापन चांगलं केलंय. हे पीक चांगलं येण्यासाठी त्यांनी झेंडूला ड्रीप, मल्चिंग केलं आहे. सध्या ही झेंडूची फुलं फुलली तर आहेतच, शिवाय ती जोमानं डौलतही आहेत. या बहरलेल्या झेंडूच्या फुलांमुळं माळरानाला शोभा आलीय.

 

बहुपीक पध्दत, काळाची गरज
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा काटेकोर वापर करून बहुपीक पध्दतीचा अवलंब करणं, ही आता काळाची गरज बनलीय. याचा फायदा इतर शेतकऱ्यांनीही घ्यावा, असं मार्गदर्शन गायकवाड इतर शतकऱ्यांनी देतात.

 

आपल्यालाही पाहायचंय हे ओअॅसिस?...
संपर्क : सुरेश रामहरी गायकवाड, मु.पो. शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापूर
मोबाईल नं. 09011348699


पूरक माहिती
सांगोला (जि. सोलापूर)
दुष्काळी तालुका
रब्बी ज्वारीचं पीक
पाण्याअभावी आणि तेल्या रोगामुळं डाळिंबाच्या बागा अडचणीत

 

शेततळं
230 x 180 x 36 फूट
कृषी विभागाचं सहकार्य

 

Malran 12शेतीची सुरुवात
खडकाळ माळावर 2003 पासून शेतीची सुरुवात
सुरुवातीला 10 एकर द्राक्ष लागवड

 

झेंडू
सध्या नऊ एकर क्षेत्र
पहिला तोडयात एक टन फुलांचं उत्पादन
रोग आणि नागअळी नियंत्रणासाठी वेळोवेळी फवारण्या

 

कलिंगड आणि खरबूज
उन्हाळ्यामध्ये कलिंगड आणि खरबुजाला चांगली मागणी
मल्चिंगचा वापर
मातीत ओलावा टिकून राहतो
पाण्याची बचत होते

 

बंधारे बांधले...

मातीचे पाच बंधारे बांधले
बंधाऱ्यातील हे पाणी शेततळ्यात घेतलं
संपूर्ण क्षेत्रात ठिबक सिंचन पद्धत
सध्या बेदाणा निर्मिती सुरू

 

केळीला वाशी मार्केटमध्ये आठशे रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला
20-25 टन केळीची विक्री
झेंडूचा दर 25-50 रुपये प्रती किलो
कलिंगड आणि खरबुजाची वाढ जोमाने सुरू

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.