स्पेशल रिपोर्ट

गोड गोड जामचा 'मधुसागर'

शशिकांत कोरे, महाबळेश्वर, सातारा
'बाळा जेवून घे' आईचा मुलामागचा हा नेहमीचा धोशा. त्यावर मला नाय खायचं म्हणून मुलांचंही वाक्य ठरलेलं... मग जाम ब्रेड, जाम पोळीचं नाव काढलं की बाळ जेवायला लगेच तयार, असंच चित्र प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतं. चिमुरड्यांना आकर्षित करणारा हा जाम बनतो कसा, याचं औत्सुक्य सर्वांनाच असतं. तर चला मग आमच्याबरोबर महाबळेश्वरला. इथला मधुसागर हा सहकारी तत्वावरचा राज्यातल्या पहिला फळप्रक्रिया उद्योग आहे. 1971 मध्ये स्थापन झालेल्या हा फळप्रक्रिया उद्योग काळाप्रमाण बदलत आता चांगलाच भरारी घेतोय.
 

स्ट्रॉबेरी आणि फळांची फळप्रकिया

शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी, संस्थांनी फळप्रकिया उद्योग सुरू करावेत, असं कायम सांगण्यात येतं. राज्याचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या काळात फळप्रक्रिया उद्योगाची सुरुवात झाली. यशवंतरावांच्याच प्रेरणेनं राज्यातला पहिला फळप्रक्रिया उद्योग महाबळेश्वर इथं सुरू झाला आणि 'मधुसागर' ही संस्था राज्यातली पहिली सहकारी तत्त्वावर काम करणारी संस्था ठरली.

 


Strowberry Food Process 1राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी १९९० पासून महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेतून १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. महाराष्ट्र राज्य आज फलोत्पादनातील अग्रेसर राज्य म्हणून विकासाची फळं चाखत आहे. फळबागांच्या क्षेत्र विस्ताराबरोबर राज्यात फलोद्यान पिकांची दर्जेदार उत्पादन विक्री आणि प्रक्रिया व्यवस्था उभी करणं महत्त्वाचं होतं आणि याच उद्देशानं राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचा जन्म झाला. उत्पादकांपासून उपभोक्त्यांपर्यंत फलोत्पादन पिकाच्या मालाची योग्य साखळी निर्माण करणं आणि यामध्ये उत्पादक शेतकरी, काढणीनंतरचं व्यवस्थापन करणारी यंत्रणा, प्रक्रिया उद्योजक, विक्री व्यवस्था यांच्या विकासासाठी या अभियानात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून वैयक्तिक शेतकऱ्यांच्या विकास संकल्पनेपेक्षा सामुदायिक शेतकऱ्यांच्या गटाची स्थापना करून त्याच्यात विकास घडवून आणण्यावर भर दिला आहे.

 


राज्यातील पहिली फळप्रकिया सहकारी संस्था

महाबळेश्वर इथं 1971मध्ये 'मधुसागर' या सहकारी संस्थेची सुरुवात झाली. संस्थेच्या 1693 सभासदांकडून छोट्या-छोट्या संख्येत उत्पादित केलेली स्ट्रॉबेरी, जांभूळ, कोकम, आंबा इत्यादी फळं संस्थेमार्फत खरेदी केली जातात. त्यापासून जाम, सिरप, कॅण्डी इत्यादी उत्पादनं तयार केली जातात. या उद्योगामुळं नाशवंत मालाला खात्रीशीरपणं गिऱ्हाईक मिळतं आणि शेतकऱ्यांना त्यासाठी चांगला दरही मिळतो.

 

 

Strowberry Food Process 2असा बनतो 'जाम'

बाजारात उपलब्ध होणारी स्ट्रॉबेरी केवळ दोन दिवस टिकते. त्यामुळं विक्रीसाठी स्ट्रॉबेरी ए-वन ग्रेडची असते. छोटी फळं जाम तयार करण्यासाठी वापरतात. ही फळं जास्त टिकावी म्हणून त्यावर सल्फ्युरिक अॅसिड आणि मेटाबायसल्फेट या केमिकल्सचा वापर केला जातो. केमिकल लावलेली ही फळं सात ते आठ महिने जतन केली जातात. जेव्हा जाम, सिरप आणि कॅण्डी बनवायची असते तेव्हा या फळांचा वापर केला जातो. मग बॉयलरमधून वाफ सोडली जाते. मोठ्या कढईमध्ये 45 टक्के साखर आणि 55 टक्के पल्प म्हणजेच फळांचा गर असं प्रमाण ठेवलं जातं. हे द्रावण एकसारखं 65 डीग्री तपमानात एकसारखं ढवळलं जातं. हे मिश्रण थंड झालं की, वेगवेगळं उत्पादन आणि त्याच्या वजनानुसार बरणीत पॅक केलं जातं. अशा प्रकारं जाम तयार होतो. तयार झालेल्या जामचं पॅकिंग करून तो बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होतो.

 

 

तीन कोटींची उलाढाल

महाबळेश्वर इथं इतर खाजगी कंपन्यांनीही अद्यावत प्रकल्प उभारले आहेत. पण सामान्य शेतकऱ्यांना मदत करणारी 'मधुसागर' ही संस्था सुमारे 70-80टन फळप्रकिया करते. यात 30 हजार किलो स्ट्रॉबेरी, 20 हजार किलो जांभूळ , 20 हजार किलो आंबे आणि 15 हजार किलो अननसाचा उत्पादनासाठी वापर केला जातो. नैसर्गिक हवामानानुसार कच्च्या मालावर परिणाम झाल्यास उत्पादनात पाच ते दहा टक्के फरक पडतो.

 

 

Strowberry Food Process 5गिरिस्थानावरील फळप्रकिया उद्योग

मध उत्पादनात यशस्वी झाल्यानंतर डोंगरी भागातील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळावा यासाठी फळप्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला. त्यावेळी मधमाश्यांवर थायिसॅक ब्रुड नावाचा रोग आल्यामुळं नैसर्गिक संकटही उभं राहिलं. त्यामुळं आर्थिक संकटावर मात करत हा फळप्रकिया उद्योग उभारी घेऊ लागला आणि सुरुवातीला छोट्या पातळीवर म्हणजेच पाच टन उत्पादन करणारा हा उद्योग आता जवळपास 80 टन फळप्रकिया करतो.
एकूणच काय तर पारंपरिक पिकांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना हा आदर्श निश्चितच घेण्यासारखा आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.