स्पेशल रिपोर्ट

पंढरपूरची खरातवाडी बनली 'बोर'वाडी!

यशवंत यादव, सोलापूर
दुष्काळामुळं पाण्याअभावी  उभी शेतं सुकू लागलीत, तर फळबागांना कुऱ्हाड लावण्याची वेळ आलीय. अशा परिस्थितीत बोरांची लागवड फलदायी ठरू शकते, हे पंढरपूर तालुक्यातील खरातवाडीनं दाखवून दिलंय. अख्ख्या वाडीनं बोरं लागवड करून गावाचा विकास करून दाखवलाय. अतिशय कमी पाण्यात येणारं हे फळपीक डोंगराळ भागात आणि माळरानावर बहरतं. या बोरीला `डेझर्ट प्लॅण्ट` म्हणूनही ओळखलं जातं. बोरांच्या उत्पादनामुळं खरातवाडीची आता बोरीचीवाडी म्हणून नवी ओळख निर्माण झालीय.
 

 

पंढरपूर जवळच्या दोन हजार लोकसंख्या असलेल्या खरातवाडीची खडकाळ जमीन आणि माळरानावरील हवामान बोरीसाठी पोषक आहे. शिवाय इथल्या चमेली बोरांना चांगली चव आहे. या गावातील जवळजवळ 80 टक्के शेतकऱ्यांनी बोरीची लागवड केल्यामुळं सर्व ठिकाणी बोरीच-बोरी आहेत. या बोरांच्या उत्पादनावर या गावातील शेतकऱ्यांनी मोठी प्रगती केलीय.

 

कमी पाण्यात जास्त उत्पादन
मुळात खरातवाडीत हा दुष्काळग्रस्त प्रदेश असल्यामुळं इथल्या शेतकऱ्यांनी कमी पाण्यात जास्त उत्पादन देणाऱ्या बोरीची लागवड केली. यामुळं या गावात जास्त प्रमाणात बोरीच्या बागा आहेत. एकरी बोराचं 2-4 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवणारे शेतकरी या गावात आहेत.

 

Borachi Wadi 1मार्केट व्यवस्था
बोरीच्या विक्रीसाठी इथल्या उत्पादक शेतकऱ्यांना हैदराबाद, मुंबई, पुणे, पंढरपूर या मार्केटमध्ये विक्रीसाठी जावं लागतं. इथं सध्या किलोला 15-18 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. आता या बोर उत्पादकांना जवळच असलेलं मोडनिंब हे मार्केट उपलब्ध झालंय. इथंही चांगला दर मिळतो. या गावातून बोरं एक्सपोर्टही केली जातात. अलिकडंच एक्सपोर्ट केलेल्या बोरांना किलोला 22 रुपये दर मिळाला.

 

माळरानावर बोरीचा यशस्वी प्रयोग
खरातवाडीची जमीन माळरान असल्यानं या ठिकाणी दुसरी पिकं उत्पादनाच्या दृष्टीनं घेणं शक्य नाही किंवा ती चांगली येत नाहीत. पूर्वी इथल्या लोकांची परिस्थिती फार बिकट होती. पाण्याची कमतरता आणि खडकाळ जमीन यामुळं इथं काही पिकत नव्हतं. नंतर 2-3 जाणकार शेतकऱ्यांनी इथं बोरीचा प्रयोग केला. आता या गावात बोरीच बोरी झाल्या आहेत. आज हे बोर बागायतदार बोरीचं उच्चांकी उत्पादन घेत आहेत. या गावातील लोक पूर्वी छपरात राहत होते, आता त्यांनी चांगल्या इमारती बांधल्या आहेत. गावाला हे साध्य झालं ते बोरीमुळेच. बोर आणि खरातवाडी असं जणू समीकरणच झालंय. आज इथले लोक समाधानानं जीवन जगत आहेत.

 

बोराचा ताजा पैसा
आज या गावातले 80 टक्के शेतकरी बोरीचं उत्पादन घेत आहे. इथं घरच्या घरी बोरीच्या बागेची कामं केली जातात. आज या बोरीमुळं इथल्या घरात रोज ताजा पैसा खेळू लागलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 15-20 रुपये प्रती किलो इतका चांगला दर मिळतोय.

 

Borachi Wadi 2कमी पाणी, खर्चात  चांगलं उत्पादन
दुष्काळी भागात चांगला पैसा देणारं पीक म्हणून बोर पिकाची आज इथं लागवड केली जातेय. या फळपिकाला ठिबक सिंचनद्वारे पाणी दिलं जातं. त्यामुळं पाण्याची बचत तर होतेच आहे, शिवाय पाण्याची कमतरता असलेल्या भागात हे फळपीक घेणं फायदेशीर ठरतं, असं खरातवाडीचे उपसरपंच बबन गोविंद बंडगर म्हणाले. द्राक्ष, डाळिंबाला उत्पादनासाठी खर्च जास्त येतो. याशिवाय त्यावर रोग-किडीचं प्रमाणही जास्त असल्यानं फवारण्याचा खर्चही वाढतो. या तुलनेत बोरीला फारच कमी खर्च येतो. त्यामुळं बोरीचं पीक हे उत्तम फळपीक आहे, फक्त वीस हजार रुपयांच्या खर्चात इथला शेतकरी दोन लाखांपर्यंत एकरी उत्पादन घेत आहेत. इथूनपुढं या गावातील बोरांना आणखी चांगले दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

 

महिलांचाही सहभाग 

खरातवाडीच्या महिला बोरीच्या शेतात यशस्वीपणं कामं करतात. बऱ्याच जणींच्या हाताला त्यामुळं काम मिळालंय. काही महिला तर स्वत: शेती करतात. बोरामुळं ताजा पैसा मिळतो, असं त्या सांगतात. एका महिला बोर उत्पादकानं एकरात तीन लाखांची बोरं झाल्याचं सांगितलं.

 

Borachi Wadi 6हवामान बोरीसाठी पोषक
या गावाच्या चौहोबाजूंनी डोंगर आहेत. यामुळं हे हवामान बोरीसाठी पोषक आहे. सिंचन क्षेत्र वाढल्यानं बोरीचं क्षेत्र वाढून शेतकऱ्यांचा विकास झाला आहे. आज मिळालेल्या बोरीच्या पैशामुळं शेतकऱ्यांनी उजनीवरून पाईपलाईन टाकून पाणी आणलंय. पूर्वी इथं छपरांची घरं होती. पैसा हातात खेळू लागल्यानं शेतकऱ्यांनी आज बंगले बांधले आहेत. बोरीच्या पिकामुळं होणारा फायदा पाहून इतर शेतकरीही बोरीची लागवड करत आहेत.बोराला फारच कमी पाणी लागत असल्यानं सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना बोरीचं पीक वरदान ठरू शकतं, असा विश्वासही येथील शेतकऱ्यांना वाटतोय.

 

कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं लागवड, उत्पादन तंत्र

जमीन - हलकी ते मध्यम
जाती - उमराण, कडाका, चुहारा, मेहरूण
लागवड अंतर - 6 बाय 6 मीटर
खते - शेणखत 50 किलो प्रती झाडास छाटणीनंतर द्यावं. 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फूरद आणि 50 ग्रॅम पालाश प्रती झाड प्रती वर्ष. नत्र दोन हफ्त्यांतून विभागून द्यावं.
उत्पादन - 75 ते 125 किलो प्रती झाड

 

Borachi Wadi 10

बोरांची छाटणी
बोरांची छाटणी60 सें.मी.पर्यंत मुख्य खोड ठेवून ही छाटणी एप्रिल आणि मे महिन्यात करावी. खुंटावरील फूट वेळोवेळी छाटावी.

 

कीड नियंत्रण
बोरीवरील फळं पोखरणाऱ्या अळीच्या बंदोबस्तासाठी फेनव्हलरेट 20 ई.सी. 5 मि.ली. किंवा कार्बारील 50 टक्के 20 ग्रॅम, तर पानं कुरतडणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कार्बारील 20 ग्रॅम या कीटकनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्याच्या प्रमाणानं करावी.

 

रोग नियंत्रण
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी किंवा पाण्यात मिसळणाऱ्या गंधकाची 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

फळगळ टाळण्यासाठी...
फळगळतीचं प्रमाण कमी करण्यासाठी बागेत मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात. 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.