स्पेशल रिपोर्ट

कोण म्हणतं, तरुणाई शेतात राबत नाही?

शशिकांत कोरे, सातारा
कोण म्हणतं, आजच्या तरुणाईला शेतात राबायला आवडतं नाही? आधुनिक शेती करण्यासाठी लोकांचं पाठबळ मिळत असेल तर तरूणाई डोकं वापरुन राबते आणि सोनं पिकवते. आजच्या धूमच्या जमान्यात कॉलेज शिकत असताना पाटण जवळच्या मल्हारपेठ इथल्या रोहित रावजी पाटील या 21 वर्षाच्या तरुणानं ग्रीन हाऊस साकारलं. त्यात जरबेरा फुलांचं उत्पादनं घेतलं. सुमारे 16 लाख रुपये भांडवली गुंतवणूक करुन केलेल्या आधुनिक शेतीतून आज त्याला दर महिना सुमारे 80 हजारांचं उत्पादन मिळतं. पाच वर्षाचा बहार लक्षात घेता 48 लाखांपर्यत उत्पन्न मिळू शकतं. काही नाही तर कर्ज काढून केलेली भांडवली गुंतवणूक तर नक्कीच निघू शकते, याचा आत्मविश्वास त्याला आलाय. त्यातूनच आधुनिक शेतकरी बनायचं, हेच करियर त्यानं निश्चित केलंय.
 


उसापलिकडं धाव

कराड – पाटण मार्गावरचं मल्हारपेठ हे शहरवजा खेडंगावं. सुपिक कोयनेच्या खोऱ्यातील हा परिसर. रोहित तसा खात्यापित्या घरातला. त्याच्या वडिलांकडं 15 एकर पाणस्थळ जमीन आहे. परंतु, त्यांनी पारंपरिक शेतीचं केली. हमखास नगदी पीक म्हणजे ऊस. उसापलिकडं त्यांची धाव काही गेली नाही. पण कोणी नवीन काही करीत असेल तर ते त्याला प्रोत्साहन देतात. पाटण तालुक्यातीलच कुसरुंड या गावातील रोहितच्या नातेवाईकांनी ग्रीन हाऊस उभारलंय. ते पाहिल्यानंतर त्याला आपणही असं करावं, असं वाटलं. वडिलांना त्याला परवानगी देताच संपूर्ण माहिती घेतली आणि तो कामाला लागला. जिल्हा बँकेनं कर्जाची पुर्तता केल्यानंतर सर्व गोष्टी त्यानंच उभारल्या. आज त्याच्या ग्रीन हाऊस रंगीबेरंगी जरबेरा फुलांनी फुलून गेलंय.

 

jarbera 5

जरबेरानं केलं मालामाल

त्याचं हे ग्रीन हाऊस 10 गुंठे क्षेत्रात उभं आहे. त्यानं मिरज इथून ग्रीन हाऊसचं स्ट्रक्चर आणलं. जून महिन्यात जमिनीचं सपाटीकरण केलं. माती आणि पाणी परिक्षण केलं. बेडसाठी सुमारे 150 ट्रॉली लाल माती वापरली. हे सर्व पावसाळ्यातचं करावं लागल्यानं त्याला अनंत अडचणींशी तोंड द्यावं लागलं. त्यामुळं इतरांनी पावसाळा टाळून ग्रीन हाऊसची उभारणी करावी, असं तो सांगतो.


सात हजार रोपांची लागवड
कृषी तज्ज्ञांच्या सहकार्यानं बेड तयार करताना खते वापरत बेड शुध्दीकरण केलं. के. एम. बायोटेकस इथून सुमारे सात हजार जरबेरा रोपं आणली. एक रोप 43 रुपये याप्रमाणं रोपासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च केले. याशिवाय ठिंबक, फ्रागर सिस्टीम बसवली. डोळ्यात तेल घालून निगराणी केली. आता अडीच महिन्यांनी उत्पादनास सुरुवात झालीय. एक दिवसा आड सुमारे दोन हजार फुलांची तोड होतेय. हमखास पाणी मिळावं, म्हणून बोअर मारलं. दररोज सकाळी, दुपारी, सायंकाळी दहा मिनिटे पाणी दिलं जातं. तापमान राखण्यासाठी साईड कंपाऊंड दररोज सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत खुलं ठेवलं जाते. त्यामुळं ग्रीन हाऊसमध्ये हवा खेळती राहते. त्यामुळं बुरशीचा प्रार्दुभावही कमी होतो.


jarbera 1अर्थकारण जरबेराचं
मशागतीस दोन लाख, रोपास अडीच लाख, खतास दीड लाख असा खर्च झालाय. तर वर्षभरात सुमारे साडेतीन लाख फुलांची त्यानं विक्री केलीय. तीन ते सहा रुपये दर मिळाला. या दरामुळं तीन रुपये प्रमाणे सरासरी आठ लाखांचं उत्पादन मिळालंय. भागातील व्यापारी अमोल निकम यांच्यामार्फत नवी मुबंई इथं तो जरबेरा फुलं पाठवतो. सध्या देशातील इतर बाजारपेठातील दरांकडंही त्याचं लक्ष असतं.


आधुनिक शेती करायचीयं
रोहित सध्या कराडच्या सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये बी. ए. च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. त्याला पदवी पूर्ण करायची आहे. पण उगीच कुठतरी कारकुनकीची नोकरी पकडून आयुष्य जगायचं नाही. शेतीमध्ये करियर करायचंय. नवनवीन उपक्रम राबवून यशस्वी आधुनिक शेतकरी व्हायचंय. तसा आत्मविश्वासही त्यानं 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केला.

 


इतर शेतकऱ्यांना मिळतेय प्रेरणा
कोयनेच्या खोऱ्यात मुळातचं ग्रीन हाऊस शेती फारशी कोणी केलेली नाही. त्यातही जरबेरा फुलांचं उत्पादन प्रामुख्यानं पंचगंगेच्या खोऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यात होतं. रोहितची ही शेती बघायला नाविन्याची आस असलेले शेतकरी येतात. माहिती घेतात. त्यामुळं भविष्यात हळूहळू इथंही ग्रीन हाऊसेस पहायला मिळतील, असा विश्वास रोहितला वाटतोय.

मी सध्या देशातीलचं नव्हे तर जगभरातील जरबेरा फुलांच्या बाजारपेठांची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यानं सांगितलं. त्यामुळंच आम्ही त्याच्यासारख्या इतर शेतकऱ्यासाठी जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या फुलबाजारांची संक्षिप्त माहिती इथं देतोय.

 

जागतिक फुल बाजार
जागतिक पातळीवर नेदरलॅंड, दुबई आणि सिंगापूरमधील फुलांचे बाजार महत्त्वाचे आहेत. आपल्याला या बाजारपेठेत चांगली संधी मिळू शकते, असं तज्ज्ञ मंडळी सांगतात.

 

नेदरलॅंड -
नेदरलॅंडमधून प्रामुख्याने दर्जेदार फुलांची जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, इटली, बेल्जियम, अमेरिका, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, रशिया या देशांत निर्यात केली जाते. नेदरलॅंडमध्ये अल्समीर आणि इतर तीन ठिकाणच्या फुले लिलाव सेंटरमधून गुलाब फुलांचा सर्वांत जास्त व्यवहार होतो. त्याखालोखाल क्रिसॅन्थीमम, ट्युलीप, लिलीयम, जरबेरा, सिम्बिडियम, फ्रेशिया, ऍन्थुरियम, ऍल्स्ट्रोमेरी या फुलांचा व्यापार होतो. कॅरिओफिस आणि ड्रेसिनाच्या कुंड्यांचा सर्वांत जास्त व्यापार होतो. जरबेरामध्ये प्रामुख्याने लाल, पिवळ्या जातींना मागणी असते. जरबेरामध्ये दोन प्रकार आहेत. त्यामध्ये डिस्क लहान व डिस्क मोठी असलेला जरबेरा. जगातील सर्वांत मोठा फुले आणि शोभेच्या झाडांचा व्यापार अल्समीर मार्केटमध्ये होतो. या ठिकाणी फुलांचा लिलाव होण्यापूर्वी फुलांच्या दर्जाची प्राथमिक तपासणी व चाचणी घेऊन त्याची गुणवत्ता ठरवली जाते.

jarbera 6सिंगापूर -
सिंगापूरमधील बाजारपेठेत दक्षिण आफ्रिका, हॉलंड, चीन, मलेशिया, भारत, थायलंड, स्पेन, न्यूझीलंड या देशांतून सुमारे 100 वेगवेगळ्या फुलांची आयात होते. यामध्ये प्रामुख्याने गुलाब, ऍन्थुरियम, कार्नेशन, जरबेरा, जिप्सोफिला, लिली, कॅलेन्डुला, सिलोसिया, डेलिया, डायऍन्थस, ग्लॅडिओलस, लिलीयम, बर्ड ऑफ पॅराडाईज या फुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरीनं मॉन्स्टेरा, पॅनकिम, सिटारिया व इतर काही फिलर्सची आयात केली जाते. येथील आयातदारांनी फुलांच्या साठवणुकीसाठी शीतगृहे उभारली आहेत. या ठिकाणी आयात केलेली फुले पाच अंश सेल्सिअस तापमानात ठेवली जातात. या बाजारपेठेत कार्नेशन आणि जरबेरा फुलांच्या दांड्याची लांबी 45 ते 50 सें.मी. असली तरी पुरेशी असते; मात्र दांड्याचा व्यास जास्त असणं आवश्‍यक आहे. व्यास जास्त असल्यानं कळीचा आकार मोठा होतो, तसंच फुलांचा टिकाऊपणा वाढतो. फुलांचा गुच्छ आकर्षक दिसण्यासाठी फुलांच्या बरोबरीनं वेगवेगळ्या झाडांच्या पानांची, दांड्यांची भरणी केली जाते. या फिलरमध्ये मॉन्स्टेरा, गोल्डन रॉड, लिमोनियम, शुजा व इतर जंगली झाडांच्या पानांचा वापर केला जातो. सिंगापूरमध्ये फिलर्सचाही मोठ्या प्रमाणात व्यापार होतो.


dubai flowers centerदुबई
दुबईत सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक फ्लॉवर सेंटर आहे. या सेंटरमध्ये परदेशातून येणाऱ्या फुलांची कृषी तज्ज्ञांमार्फत प्राथमिक तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये फुलांचा दर्जा, रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव, परदेशातून आलेल्या बॉक्‍सची संख्या याची नोंद घेतली जाते. तपासणी झाल्यानंतर ज्या व्यापाऱ्याच्या नावानं फुलं आली आहेत, त्याच्या ताब्यात दिली जातात. त्यानंतर हे व्यापारी फुलांची स्थानिक ठिकाणी विक्री करतात किंवा मागणीप्रमाणे फुलांची निर्यात करतात. फुलांच्या विक्रीसाठी विविध देशांच्या फुले निर्यातदारांना 20 कार्यालये दिलेली आहेत. या ठिकाणी हॉलंड, केनिया, इस्राईल, जर्मनी, साऊथ आफ्रिका तसेच भारतातील निर्यातदारांनी कार्यालये सुरू केली आहेत. फुलांमध्ये प्रामुख्याने अँथुरियम, आर्किड, जरबेरा, कार्नेशन, गुलाब, शेवंती व ग्लॅडिओलस तसेच सुशोभीकरणासाठी लागणारी पाने, (फिलर्स), जिप्सोफिलाची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते.


ओमान
ओमानमध्ये हॉलंड, थायलंड या देशांत ऑर्किड, ऍन्थुरियम, जरबेरा, कार्नेशन, ट्युलीप व लिलीयम या फुलांची आयात केली जाते. मात्र कोणत्या हंगामात कोणती उत्पादनं आयात केली जातात आणि आपला माल केव्हा कसा पाठवावयाचा, याचा विचार करणं गरजेचं आहे.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.