स्पेशल रिपोर्ट

शहरं - बुडणारं 'टायटॅनिक', खेड्याकडे चला!

यशवंत यादव, अंकोली, सोलापूर
शहरं ही 'टायटॅनिक' आहेत. ती कधी बुडतील ते सांगता येत नाही. काही दिवसांनी शहरात खाण्यापिण्याचीसुद्धा मारामार होईल. त्यासाठी आताच ते बुडणारं जहाज सोडा आणि शाश्वत जगायला खेड्यात या. हे विचार कुणाला पटोत न पटोत. सोलापुरातल्या अंकोलीचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अरुण देशपांडे पोटतिडकीनं आणि सातत्यानं हे विचार मांडतायत. तुमच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा वापर गावांचा विकास करण्यासाठी करा, असं आवाहन ते तरुणांना करतायत.  
 

 

गेल्या तीन दशकांपासून अंकोली (जि. सोलापूर) इथं लोकांना डॉ. अरुण देशपांडे शाश्वत विकासाचे धडे अगदी प्रॅक्टिकलसहित देत आहेत. 'पहिले केले मग सांगितले' या म्हणीप्रमाणे अमेरिकेतलं सुखाचं आयुष्य सोडून ते अंकोलीच्या माळावरच्या आपल्या शेतीवर आले. ते या शेताला इकोफार्म म्हणतात. निसर्गाशी मैत्री करत वेगवेगळे प्रयोग करून सोपेपणानं आणि सुखी जगण्याचं एक मॉडेलच त्यांनी इथं उभारलंय. शहरी आणि ग्रामीण जीवनाचा मिलाफ घडवलंय. त्याला ते 'रुरबन' (रुरल + अर्बन) असं म्हणतात. या 'रुरबन'मध्ये ते विज्ञान जत्रा भरवतात. त्यातील विज्ञानाचे प्रयोग पाहायला पर्यटक गर्दी करतात. निसर्गाचं संस्कृतीमध्ये रूपांतर माणूस करतो. मुद्दामहून लावलं की ते कल्चर होतं, असं ते सांगतात. गेल्या 26 वर्षांपासून ते इथं अखंडपणं संशोधन आणि प्रचाराचं काम करतायत.

 

vlcsnap-2013-03-02-14h36m27s229.pngशेतीशी संबंधित अनेक प्रयोग त्यांनी इथं केलेत. सामान्य शेतकऱ्यांना रोजच्या कामात उपयोगी पडतील अशी स्वस्तातली आणि प्रभावी औजारं बनवलीत. इथं ते तरुणांना नैसर्गिक शेतीचं आणि एकूणच ग्रामीण विकासाच्या त्यांच्या संकल्पनेचे धडे देतात. त्यासाठी कार्यशाळा भरवतात. त्यात परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मुलांपासून ते इंजिनीयरिंगचे विद्यार्थी, शहरी माणसं, परदेशी पर्यटकांपर्यंत सारेच सहभागी होतात.


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा `खेड्याकडे चला` हा संदेश डॉ. देशपांडे या कार्यशाळेतून पोचवतात, पण काहीशा आक्रमकपणं. ते विचार असे आहेत...

 

गावाकडं चला...
शहरं ही टायटॅनिक आहेत. कधी बुडतील सांगता येत नाही. काही दिवसांनी शहरात खायलासुद्धा मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला गावकडंच यावं लागेल. तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा वापर गावाकडंच करायचा आहे.

 

अफाट सौर ऊर्जा
शेतकरी सूर्यप्रकाशाच्या मदतीनं पिकं पिकवतात, धान्य मिळतं आणि भाकरी तयार होते. आपल्याकडं रानोमाळ पसरलेला अफाट सूर्यप्रकाश आहे. याच सूर्यप्रकाशाच्या मदतीनं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात. आपण ते खातो. म्हणून आपण या विपुल सूर्यप्रकाशाचा योग्य तो वापर करायला हवा. हा सूर्यप्रकाश म्हणजे आपली खरीखुरी संपत्ती आहे. कारण युरोपातल्या अनेक पुढारलेल्या देशांमध्ये याच सूर्यप्रकाशाचा दुष्काळ आहे.

 

waterbank 10झाडं लावा...
मोकळ्या जागेत जमेल तेवढी झाडं लावा. आम्ही इथं भरपूर झाडं लावल्यामुळं या ठिकाणी जमिनीचा एक स्पंज तयार झाला आहे. त्यात पाण्याचा थेंब न् थेंब अडवला जातो, मुरवला जातो. पालापाचोळ्यामुळं जमीन सुपीक होते. यामुळं आमच्या विहिरीसह आजूबाजूच्या दहा विहिरींचं पाणी वाढलं आहे.

 

वॉटर बॅंक...
पाणीटंचाई दूर करण्यासाठी इथल्या माळावर वॉटर बँक उभारण्यात आली आहे. आपल्याकडं जशा पैसे जपणाऱ्या बँका असतात, त्यातून आपल्याला हवे तसे, हवे तेवढे पैसे काढता येतात, त्याच संकल्पनेवर या वॉटर बँकेतलं पाणी लोकांना दिलं जातं. या बँकेची पाणी साठवण क्षमता आहे, 5 कोटी लिटर्सची. या गोलाकार बँकेच्या काठावर 50 घरं आणि 50 गुहा बांधण्यात येणार आहेत.

 

पाणी तापवण्यासाठी वीज वापरणं हा गुन्हा
इलेक्ट्रिक मोटरनं पाणी काढणं हे अकार्यक्षम आहे. आपल्या मोटेनं पाणी काढणं हे कार्यक्षम आहे. त्याचं प्रात्यक्षिकच इथं दाखवलं जातं. पाणी तापवण्यासाठी वीज वापरणं ही गुन्हेगारीच आहे. त्याचे गुन्हेगार आहेत, सर्व इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनीयर्स.

 

दुष्काळ मानवनिर्मित
सध्या राज्यात पडलेला दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. याबाबत ते 'दुष्काळ आवडे सर्वांना' या ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार पी. साईनाथ यांच्या पुस्तकाचा हवाला देतात.

 

Waterbank 9.pngराजकारणी शेतकऱ्यांचे लुटारू
राजकारणाचे अनेक रंग आहेत. पांढरा रंग अनेक रंगांचं मिश्रण आहे. इलेक्शन आलं की, हा रंग दिसायला लागतो. प्रत्येकाचे झेंडे वेगवेगळे. हे सगळेच पांढरपेशी आहेत. ते शेतकऱ्यांना लुटतात. म्हणून ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. सर्व पक्ष शेतकऱ्यांसाठी एका माळेचेच मणी आहेत. एकही पार्टी शेतकऱ्यांची बाजू घेत नाही.

 

आम्हाला सुतक...
20 वर्षांपूर्वीची घटना. दहशत निर्माण करण्यासाठी आमच्या इथं एका शेतकऱ्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्या. शेतकऱ्यांवर लाठीहल्ला झाला. तेव्हापासून आम्हाला सुतक आहे. आम्ही दिवाळी साजरी केली नाही. गोडधोडही खाल्लं नाही.

 

आपलं टायटॅनिक - 'मुंठापुराना'
'मुंठापुराना' अर्थात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक ही शहरं मिळून आपलं एक अवाढव्य टायटॅनिक बनत आहे. ते कधी बुडेल सांगता येत नाही. त्यामुळं आता लवकर गावाकडं परतायला हवं. शिकलेली, शहरात राहणारी माणसं शेतकऱ्यांची वैरी होतात. इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये मिळवून द्यायचे सोडून इंजिनीयरिंग कॉलेजेस् लाखो रुपयांच्या देणग्या घेतात. आयआयटी म्हणजे तर 'Inherent Insufficient Technology' आहे, असंच म्हणावं लागेल.

 

waterbank 6हात काळे करा, शेण उचला...
आपल्या युवकांना मानसिकदृष्ट्या अपंगत्व आलंय. ते झटकून टाका. आपल्या ज्ञानाच्या आणि स्कीलच्या जोरावर उभं राहा. कोणतंही काम करायला लाजू नका. हात काळे करा, शेण उचला... प्रगतीसाठी टेक्नॉलॉजीची मदत घ्या. युवकांनो स्वावलंबी व्हा.

 

शेतकरी नवरा पाहिजे?
आपल्याकडं अनेक मासिकं, पेपरांमध्ये 'वर पाहिजे' अशा जाहिराती येतात. त्यात नवरा मुलगा कसा असावा, त्याला नोकरी कोणती असावी, अशी अपेक्षा नोंदवलेली असते. त्यात डॉक्टर हवा, इंजिनीयर हवा अशाच अपेक्षा वाचायला मिळतात. विशेष म्हणजे गेल्या 40 वर्षांत 'शेतकरी नवरा चालेल' अशी अपेक्षा काही मी वाचलेली नाही.

 

एक तोळ्यासाठी 12-13 टन ऊस

  • आपल्याकडं शेतमाल कायम कवडीमोलानं विकला जातो. दिवसेंदिवस ते वाढतच चाललं आहे.
  • काही दिवसांपूर्वी एक टन उसातून एक तोळा सोनं येत होतं. आता एका तोळ्यासाठी 12-13 टन ऊस लागतो.
  • ठिबक सिंचन एक बकवास
  • ठिबक सिंचननं पाणी वाचतं हा बकवास आहे. ठिबक सिंचनला पाणी जास्त लागतं, कारण त्यासाठी इलेक्ट्रिक मोटर वापरावी लागते. एक युनिट इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी दहा हजार लिटर पाणी लागतं.

 

Waterbank 15.pngएक एकर शेती = 2500 एअर कंडिशनर
शेतकरी एका एकरातील पिकामधून 40 टन ऑक्सिजन तयार करतो. पिकं 30 टन कार्बन डायऑक्साईड शोषतात. त्यामुळं एक एकर शेती = 2500 एअर कंडिशनर, असं म्हणता येईल. यामुळं वातावरणातील हवा थंड राहते.

युवकांना आवाहन ...

  • शहरातून माघारी या, जग तुमच्या मागे येईल
  • हात बिनधास्तपणे मातीत घाला, प्रतिष्ठा गेली खड्ड्यात
  • शेती आपली हक्काची. ती सोडून पळत्याच्या पाठीमागं लागू नका
  • आपल्याला अनेक इकोव्हिलेजेस् आणि सायन्स व्हिलेजेस् निर्माण करायची आहेत.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.