स्पेशल रिपोर्ट

अपंगांचा हक्काचा 'आसरा'!

विवेक राजूरकर, औरंगाबाद
दवाखाना म्हटलं की मध्यमवर्गीयांना घाम फुटतो. डॉक्टरसाठी किती पैसे मोजावे लागणार, याला काही गणितच नसतं. अपघातात आलेलं अपंगत्व, लकवा या आजारांवर उपचारासोबतच त्यासाठी लागणाऱ्या अपंग साहित्याचा खर्चही अमाप येतो. गरिबांना तर या गोष्टी शक्यच होत नाहीत. त्यामुळंच गरिबांना अपंग साहित्यांचं मोफट वाटप करणारं औरंगाबादचं 'आसरा रुग्णसेवा केंद्र' म्हणजे गरीब अपंगांसाठी एक वरदानच ठरलंय.
 

औरंगाबादमधील राजा बाजार इथल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सन्मती ठोले यांनी त्यांची आई आसराबाई यांच्या स्मरणार्थ 2002 मध्ये या केंद्राची स्थापना केली. मागील 12 वर्षांपासून हे केंद्र गरीब आणि गरजू अपंगत्व आलेल्या रुग्णांना अपंग साहित्य पुरवण्याचं काम करतं. तसंच अपंगत्व संपल्यानंतर संबंधित रुग्णाकडून ते साहित्य घेऊन इतर गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचंही काम करतं. दानशूर तसंच सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या अनुदानातून केंद्राचं काम चालतं.

 

ASARA 2गरीब रुग्णांना जास्त मदत होते

अपघात आणि वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेकांना अपंगत्व येतं. अनेकांना उपचारादरम्यान उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी तसंच वेगवेगळ्या शरीराच्या हालचालीसाठी अनेक बाह्य उपकरणांची आवश्यकता असते. यातील काही उपकरणं ही अल्पमुदतीची असतात, तर काही उपकरणं दीर्घ मुदतीसाठी रुग्णांना गरजेची असतात. परंतु, ही उपकरणं घेण्याची अनेकांमध्ये क्षमता नसते. ही गरज ओळखून डॉ. सन्मती ठोले यांनी ही उपकरणं मोफत देण्याचा उपक्रम आसरा केंद्रामार्फत सुरू केला असून त्याचा लाभ आतापर्यंत सुमारे 15 हजार रुग्णांनी घेतलाय.

 

ASARA 4कशी सुचली कल्पना

पूर्वी औरंगाबाद इथं झंवर हॉस्पिटलनं क्रच (क्रच - म्हणजे कुबड्या) बॅंक सुरू केली होती. परंतु काही काळातच ती बंद पडली. त्यावेळी या क्रच बॅंकेचे डॉ. ठोले हे सदस्य होते. ही बॅंक बंद झाल्यानं गरीब रुग्णांचे होणारे हाल पाहून अशाच स्वरूपाचं काम करण्याचं मनाशी निश्चित करून त्यांनी २००१ मध्ये त्यांनी आपल्या आईच्या नावानं आसरा रुग्णसेवा हे केंद्र सुरू केलं. आज त्याचं वटवृक्षात रूपांतर झालंय. त्यांच्याकडं आज अनेक रुग्ण या उपकरणांसाठी प्रतिक्षा यादीत असतात. एखादा रुग्ण ठीक झाला की, त्याच्याकडून हे उपकरण परत घेऊन ते दुसऱ्या गरजू रुग्णाला देण्यात येतं. त्यामुळं त्यांचं हे काम अविरत चालू आहे.

 

ASARA 9अर्ज भरा, सुविधा घ्या

फुकट मिळालं, की त्या वस्तूची किंमत राहात नाही. हाच अनुभव डॉ. ठोलेंनाही आला. त्यानंतर त्यांनी एक नवीन उपाययोजना आखली. ज्या गरजू रुग्णांना उपकरण हवं आहे त्यांच्याकडून ते एक अर्ज भरून घेतात. रुग्णाचं नाव, घरचा पूर्ण पत्ता, उपकरणं किती दिवसांसाठी हवी आहेत, कोणत्या डॉक्टरांकडून या केंद्राची माहिती मिळाली, इत्यादी सर्व माहिती त्या फॉर्मद्वारे भरून घेतली जाते. यानंतर रुग्णास आवश्यक असलेलं उपकरण देताना त्याच्याकडून उपकरणाच्या किमतीएवढी रक्कम डिपॉझिट म्हणून घेतली जाते. घेतलेलं उपकरण परत केल्यावर लगेचच डिपॉझिटची रक्कम त्या रुग्णास परत केली जाते. या सेवेसाठी केंद्राकडून कसलंही शुल्क आकारलं जात नाही. त्याचबरोबर ज्या रुग्णाकडं पैसे नसतील तर त्याच्याकडून एखाद्या व्यक्तीची ओळख घेतली जाते. ओळख दिल्यानंतरच त्या रुग्णास आवश्यक ते उपकरण दिलं जातं.

 


ASARA 12ही उपकरणं दिली जातात

या केंद्रामार्फत अनेक प्रकारची उपकरणं रुग्णांना दिली जातात. यामध्ये बेडपॅन, वॉटर बेड, कमोड खुर्ची, फाऊलर बेड, इन्फोफिल लॅम्प, कुबड्या, वॉकर, ट्रॅक्शन सेट, फोल्डिंग व्हीलचेअर, बॅकरेस्ट, ट्रायपॉड काठी, एअर कुशन आणि ऑक्सिजन सिलिंडर या उपकरणांचा समावेश आहे. तर युरोलॉजिस्ट आणि हाडाच्या रुग्णांना या वैद्यकीय उपकरणाची जास्त आवश्यकता असते. त्यामुळं शहरातील युरोलॉजिस्ट आणि अस्थिरोगतज्ज्ञ त्यांच्याकडं आलेल्या गरजू आणि गरीब रुग्णांना डॉ. ठोले यांच्या 'आसरा' केंद्राकडं पाठवतात.

 

समाजासाठी आदर्श

अशा प्रकारचं काम केल्यामुळं आम्हाला आत्मिक शांती मिळते, असं डॉ. ठोले सांगतात. औरंगाबादचा वाढता विस्तार पाहता ही सेवा अपुरी पडत आहे. याची उपयुक्तता लक्षात राज्यभरात सर्वत्रच अशा उपक्रमांची गरज आहे. त्यासाठी समाजातील सुज्ञ नागरिक आणि संस्थांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन डॉ. ठोले यांनी केलंय.

संपर्क - डॉ. सन्मती ठोले- ९८२२५९७३१०, ०२४०-२३५३०१९

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.