स्पेशल रिपोर्ट

'कमवा-शिका'ला हवं पाठबळ

विवेक राजूरकर, औरंगाबाद
'स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद' हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदवाक्य. 'रयत'चे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वप्रथम 'कमवा आणि शिका' हा मूलमंत्र दिला. त्यानंतर ग्रामीण भागातील तळागाळात शिक्षणाचा प्रसार झाला. अनुभवातून साकार झालेली 'कमवा आणि शिका' ही योजना आज जगात सर्वत्रच राबवली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठही त्याला अपवाद नाही. गेल्या ३५ वर्षांपासून विद्यापीठात हा उपक्रम राबवला जातो. आजमितीस या योजनेचा लाभ जवळपास सात हजार विद्यार्थांना मिळाला असून त्यातील बहुतांश जण समाजात मोठ्या हुद्द्यांवर काम करत आहेत. अशा या गरीब विद्यार्थ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या योजनेला सरकारनंही पाठबळ द्यावं, अशी हाक आता शिक्षणक्षेत्रातून उठत आहे.
 

 

परिस्थितीमुळं अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागतं. शिकण्याच्या वयात अनेकांना कुटुंबासाठी पैसा मिळवावा लागतो. बऱ्याच वेळा राहत्या वाडीवस्तीवर शाळा नसते. आई-वडिलांनी दुसरीकडं पाठवायचं ठरवलं तर राहण्याचा, जेवणाचा, शिक्षणाचा खर्च कोण करील? यासारखे एक ना अनेक प्रश्न अशा कुटुंबासमोर आ वासून उभे असतात. त्यातूनही शिक्षण घेणाऱ्यांना उच्च शिक्षणाचा टप्पा गाठता येतोच असंही नाही. त्यामुळं अनेकांची शिक्षणाची गाडी हुकते.

 

earn and learn 2.pngशिकायला पाहिजे होतं, असं ज्यावेळी लक्षात येतं, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन ही "कमवा आणि शिका" योजना आकाराला आलीय.

 

 

ग्रामीण भागातील विद्यार्थी केंद्रबिंदू
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठानं या योजनेची आखणी केलीय. रोज सकाळी ७ ते ९ प्रती दिन दोन तास विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसर स्वच्छ करणं, परिसरातील बागांना, झाडंझुडपांना पाणी घालणं, परिसराची निगा राखणं, झाडं लावणं, त्यांची काळजी घेणं, माळीकाम करणं, बंधारे बांधणं, विद्यापीठातील कार्यालयीन काम करणं, आदी कामांचा त्यात समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पुढं जाऊन विद्यार्थी स्वावलंबी बनावेत, त्यांनी एखादा व्यवसाय करावा, या दृष्टीनंही या योजनेत व्यावसायिक कामं दिली जातात. कागदी लिफाफे, फाईल्स बनवणं, गांडूळ खत निर्मिती, स्क्रीन प्रिंटिंगद्वारे छपाई, खडू, मेणबत्ती, फिनेल बनवणं, विद्यापीठ परिसरात झेरॉक्स सेंटर, रसवंतीगृह, झुणका-भाकर केंद्र, पी.सी.ओ.बूथ चालवणं, तसंच विद्यापीठ परिसर आणि परिसराबाहेर स्टेशनरी साहित्याची, गांडूळ खताची 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर विक्री करणं यांचा समावेश आहे. यामुळं अनेक विद्यार्थांचा आज छोटामोठा व्यवसायही उभा आहे.

 

 

earn and learn 1.pngमोबदल्याचं सूत्र
इथं पदव्युत्तर विद्यार्थांना प्रती महिना हजार रुपये, तर पी.एच.डी आणि एम. फीलसारखं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना १३०० रुपये मोबदला म्हणून मिळतो. स्व. वसंतराव काळे यांच्या पुढाकारानं विद्यापीठात ही योजना १९७४ मध्ये सुरू झाली. खऱ्या अर्थानं १९७९-८० ला त्याची अमलबजावणी सुरू झाली. त्यामुळं या योजनेचं नाव आता 'स्व. वसंतराव काळे कमवा आणि शिका स्वाभिमान शिक्षण योजना' असं करण्यात आलंय.

 

 

'कमवा आणि शिका'चं योगदान
विद्यापीठाचा परिसर हा आधीच गर्द वनराईनं सुशोभित आहे. मात्र 'कमवा आणि शिका' या योजनेतील विद्यार्थ्यांच्या कामामुळं हा परिसर अधिकच प्रेक्षणीय झालाय. विद्यापीठाकडं आज बाहेर निर्यात करण्याजोगे आंबा, पपई, चिंच, नारळ, गुलाब, फुलझाडं, साग, सोयाबीन, केळी, मका, भाजीपाला, वनौषधींचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांत योजनेत सहभागी झालेले विद्यार्थी काम करतात. आज विद्यापीठाला या योजनेतून कमीत कमी पाच लाखांचं उत्पन्न मिळतं. यंदा त्यात ४३५ मुलामुलींचा सहभाग आहे. योजनेसाठी विद्यापीठ अनुदानात ४० लाखांची तरतूद करण्यात आली.

 

गरीब विद्यार्थांना संजीवनी ठरणाऱ्या या योजनेकडं सरकारनं लक्ष दिलेलं नाही. विद्यापीठातील संचालक, विद्यार्थी विभाग, वाल्मीक सरवदे आणि कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी वेळोवेळी सरकारकडं अनुदानाची मागणी केली. तसंच 'श्रमप्रतिष्ठा'सारखी शिष्यवृत्ती सुरू करा, रोजगार हमी योजनेत ही योजना समाविष्ट करा, अशा मागण्या केल्या. मात्र त्याकडं लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांना अजून तरी वेळ मिळालेला नाही.


earn and learn 10.pngदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी दिलासा
मराठवाड्यात दुष्काळामुळं परिस्थिती गंभीर बनत चाललीय. अनेकांना रोजगारही उपलब्ध होत नाहीये. सध्या विद्यापीठात परीक्षा सुरू आहेत, तसंच अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताहेत. या सर्वांची गैरसोय होऊ नये म्हणून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत बंद राहणारी 'कमवा आणि शिका' योजना यंदा मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय विद्यापीठानं घेतलाय.


सरकारनं किंवा यु.जी.सी.नं ५० टक्के जरी अनुदान दिलं, तर या योजनेचा श्रीगणेशा महाराष्ट्रातील इतर विद्यापीठात होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी व्यक्त केलाय.

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.