ऑटिझम म्हणजे काय?
ऑटिझम म्हणजे स्वमग्नता. बाकी कशाचंचही भान न ठेवता स्वतःच्याच विश्वात मग्न असणं. ऑटिझम मुलांमध्ये जाणवणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची देवाणघेवाण. म्हणूनच ही मुलं अवतीभोवतीच्या परिसराशी अनोळखी वातावरण असल्यासारखी, अपरिचित असल्यासारखी वागतात. आपलं बोलणं त्यांना ऐकू जात आणि खूपदा ती त्याप्रमाणं वागतातही. त्यांचे डोळेही आपल्याला प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्याकडून शाब्दिक प्रतिसाद हा क्वचितच मिळतो. अनेकदा या मुलांवर मतिमंदपणाचा शिक्का मारला जातो. पण ती मतिमंद नसतात. स्वमग्नता या दोषामुळं मेंदूला मिळणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करणं अवघड होतं. त्यामुळं अशा व्यक्तीला जे काही ऐकू येतं, दिसतं किंवा इतर ज्ञानेंद्रियांपासून ज्या गोष्टी कळतात त्या योग्य प्रकारे समजून घेता येणं शक्य नसतं. त्यामुळं त्यांचे सामाजिक नातेसंबंध, संवाद आणि वागणूक यात खूप अडचणी येतात.
सर्वकाही मुलासाठी...
आपल्या मुलानंही सामान्य जीवन जगावं यासाठी या दाम्पत्यानं या आजारासंबंधी विविध माहिती जमा करण्यास सुरुवात केली. त्याच्यासाठी वेगवेगळ्या उपचारांबाबत, या आजाराबाबतचा विशेष अभ्यास सुरू केला. पती बाळासाहेब भारतीय नेव्हीमध्ये ऑफिसर होते. विशेष म्हणजे अंबिकाताई यासुद्धा एका आय.टी. कंपनीत चांगल्या पदावर होत्या. आपल्या मुलाच्या संगोपनासाठी त्या दाई ठेवू शकल्या असत्या. पण आईप्रमाणं कुणीही योग्य सांभाळ करू शकत नाही याची जाणीव असल्यामुळं चांगल्या पगाराची नोकरी सोडून मुलासाठी पूर्ण वेळ देण्याचं त्यांनी निश्तिच केलं. आपल्या ऑटिझम (स्वमग्न) मुलासाठी त्यांनी स्वतः याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. हे करत असताना आपल्या मुलाप्रमाणं समाजात इतरही अनेक मुलं आहेत, या मुलांनाही योग्य उपचारांची आवश्यकता आहे, त्यांनाही योग्य शिक्षण, सुसंवाद मिळाला तर तीही सामान्य जीवन जगू शकतील हे त्यांना स्वानुभवातून जाणवलं. असा विचार करून या 'ऑटिझम'ग्रस्त मुलांसाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला.
पतीचीही साथ...
अंबिकाताईंच्या निर्धाराला खंबीर साथ मिळाली पती बाळासाहेब टाकळकर यांची. स्वतः बाळासाहेब यांनी नेव्हीमधून व्हीआरएस घेऊन औरंगाबादला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि इथंच 'आरंभ' या मराठवाड्यातील पहिल्या ऑटिझमग्रस्त आणि मतिमंद मुलांसाठीच्या शाळेचं मुहूर्तमेढ रोवली गेली. आंबिकाताई मुंबईला राहात असताना तिथल्या मतिमंद मुलांच्या शाळेत त्यांचा मुलगा श्रीहरी जात असे. मात्र औरंगाबाद इथं आल्यानंतर त्यांची खरी पंचाईत सुरू झाली. तरीही अंबिकाताईंनी हार न मानता ऑटिझम या विषयावरील विशेष अभ्यासक्रमासाठी हैदराबाद इथल्या ठाकूर हरिप्रसाद संस्थेत दोन वर्षांचा डी.ए.ड्चा विशेष कोर्स पूर्ण केला. बाळासाहेब यांनीही पत्नीला सहकार्य करत तिला यासाठी प्रोत्साहित केलं. अंबिकाताई पुढं या विषयासंबंधीच्या पुढील अभ्यासासाठी चेन्नई, पुणे, दिल्ली या ठिकाणीही गेल्या. यातून त्यांच्या लक्षात आलं की, ऑटिझमग्रस्त मुलांना हाताळणं हे खरंच आव्हानात्मक आहे.
इतर मुलांवरही उपचार
आपल्या या ज्ञानाचा आपल्या मुलाप्रमाणंच इतर मुलांनाही फायदा झाला पाहिजे, या विचारांनी आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य याच स्वमग्न मुलांसाठी खर्च करायचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच 'आरंभ ऑटिझम' सेंटर सुरू करण्याचा विचार पुढे आला. अंबिकाताईंची ओळख औरंगाबादच्या योगिता पाटील यांच्याशी झाली. योगिता पाटील यांचंही मूल ऑटिझमग्रस्त होतं. मग अंबिकाताईंना या मैत्रिणीचीही खंबीर साथ मिळाली आणि 'आरंभ'चा श्रीगणेशा झाला.
चिकाटी आणि जिद्दीमुळं संकल्प पूर्ण
अंबिकाताईंनी नेव्हीच्या संकल्प या मतिमंद शाळेत स्वेच्छेनं पाच वर्षं शिक्षिका म्हणून काम केलं. आपला मुलगा ऑटिझमचा शिकार झालेला असतानाही याबाबत नकारात्मक विचार न करता त्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीनं आपल्या मुलासोबत समाजातील इतर स्वमग्न मुलांसाठी काय करता येईल याचाच ध्यास घेतला. ही मुलं कुठंही कमी पडत नाहीत, कमी पडतो ते आपण. आपण जर आपल्यातील गुण विकसित करून त्यांना शिक्षण दिलं तर ही मुलं अगदी योग्य प्रकारे विकसित होऊ शकतात. अंबिकाताई यांचं कार्य खरंच समाजोपयोगी आणि समाजात एक आदर्श नि्र्माण करणारं असंच आहे. त्यामुळं त्यांनी सुरू केलेल्या या कार्यावर प्रभावित होऊन त्यांना योगिता पाटील, शुभांगी कुलकर्णी, डॉ. कल्याणी पाटील, डॉ. शुभांगी हिसवणकर, सुचिता संधीकर, अर्चना धर्माधिकारी, जयश्री हर्षे, मंजिरी कुलकर्णी यांचीही मोलाची साथ लाभलीय. त्यामुळं त्यांच्या या आरंभ ऑटिझमद्वारे या ऑटिझमग्रस्त मुलांना समाजातील मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू असतात.
'स्वमग्न' मुलांची प्रगती आश्चर्यकारक
या शाळेत मुलांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देतात. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या प्रशिक्षणांमध्ये स्वकर्तृत्वावर कसं उभं राहायचं हे शिकवलं जातं. संगीत थेरपी, पेंटिंग्ज, डान्स, अभ्यास, वाचन, लिहिणं, खेळ, कथा असे प्रकार शिकवले जातात. संगीत थेरपीचा या ऑटिझम किंवा ऑक्टिसटिक किंवा स्वमग्न मुलांना फार फायदा होतो. बोलण्यापेक्षा गाण्याला ही मुलं चांगला प्रतिसाद देतात. यातून भावना विकसित होतात. यातूनच बौद्धिक, भावनिक, मानसिक कौशल्य विकसित करता येतं. या मुलांनी सामान्य मुलांसारखं स्वावलंबी झालं पाहिजे, असा मुख्य उद्देश आहे. या स्वमग्न शाळेतील मुलांची प्रगती आश्चर्यकारक आहे. इथली मुलं सुंदर पेंटिंग्ज काढतात, लिफाफे तयार करतात, ग्रीटिंग्ज बनवतात, गाणं गातात आणि स्वतःची कामं स्वतः करण्याचा प्रयत्न करतात. या मुलांचे पालकही आपल्या मुलांची प्रगती पाहून आनंदित होतात.
मराठवाड्यातील पहिलीच शाळा
मराठवाड्यातील ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एकही शाळा नव्हती. अनेकांना पुणे आणि मुंबई वा इतर ठिकाणी जाणं शक्य होत नाही. यामुळं अंबिकाताईंच्या रूपानं या आजारानं ग्रस्त मुलांना जीवनाचा आरंभबिंदूच मिळालाय. मतिमंद मुलांसाठी अनेक शाळा असतील, पण विशेष करून या स्वमग्न मुलांसाठी असलेली ही मराठवाड्यातील पहिलीच शाळा होय. अंबिका टाकळकर यांना भारतातील सर्व स्वमग्न मुलांना चांगलं शिक्षण देऊन समाजातील मूळ प्रवाहात आणायचं स्वप्न आहे. सर्वसाधारण समाज ऑटिझमग्रस्त मुलांना स्वीकारत नाही किंवा सर्वसामान्य मुलांमध्ये मिसळू देत नाही. या मुलांमध्येही चांगली क्षमता असते. पण या क्षमतांचा विकास करून त्यांना सर्वसामान्य जीवन जगण्याची संधी प्राप्त व्हावी अशी अंबिकाताईंची इच्छा आहे. या स्वमग्नांसाठी सहकार्याची, प्रेमाच्या उबदार पंखांची गरज आहे. त्यांना सहानुभूती नको. यासाठी सर्व स्तरातील पालक वर्गानं आणि दानशूर व्यक्तींनी सहकार्य करण्याची गरज आहे. आज जागतिक मातृदिनानिमित्त अंबिका टाकळकर या महिलेच्या कर्तृत्वाला, तिच्या चिकाटीला, तिच्या जिद्दीला 'भारत4इंडिया'चा सलाम.
संपर्क - अंबिका टाकळकर - ८२७५२८४१७८, ९१४५३८१२२८
Comments
- No comments found