स्पेशल रिपोर्ट

बचत गटांनी सावरला दुष्काळाचा डोंगर

शशिकांत कोरे, सातारा
दुष्काळग्रस्त भागात प्यायला पाणी नाही, तर शेतीला कुठं मिळणार? हाताला काम नाही, घरात पैका नाही, म्हणून गडीमाणूस कामाच्या शोधात वणवण फिरतोय. तर दुसरीकडं पोटापाण्याच्या शोधात लोक स्थलांतर करू लागलेत. अशा बिकट परिस्थितीत साताऱ्यातल्या महिलांच्या बचत गटांनी या महिलांना कर्तेपण देऊन त्यांचं घर सावरण्यास मदतच केलीय. यामुळं बचत गटांच्या माध्यमातून त्यांना आपली घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार तर लागलाच आहे, शिवाय दुष्काळाच्या चटक्यांपासून त्यांनी आपलं घरही सावरलंय.
 
 
 

Mahila bachat gat  1साताऱ्यातल्या बचत गटांचा सहभाग
सातारा जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे जिल्हा परिषद मैदान बचत गटांतील महिलांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं. या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 'मानिनी' नावाचं ब्रॅण्ड इमेज तयार करून ही मानिनी जत्रा भरवली आहे. या जत्रेत एकूण 104 बचत गटांनी आपापले स्टॉल उभारले आहेत. इथं पुणे, सांगली, तासगाव, जुन्नर, खान्देश, माळशिरस, माण-खटाव इत्यादी भागांतून अनेक महिलांचे बचत गट दाखल झालेत. या बचत गटांमध्ये दुष्काळी भागातील पाच ते सात गटांचा समावेश आहे. पापड, लोणची, मनुके, बेदाणे आदी विविध प्रकल्पांच्या माध्यमांतून हे बचत गट सक्षम झालेत.


तासगाव कुमठे इथला छत्रपती शिवाजी महाराज बचत गट, सीतामाई महिला गट, मोही ता. माण, एकता महिला बचत गट, बोथे, ता. माण, गिरिजा महिला स्वयंसहायता बचत गट जुन्नर, जि. पुणे या बचत गटातील महिला सदस्यांनी या जत्रेत आपली विविध उत्पादनं विक्रीसाठी आणलीत.

 


आर्थिक परिस्थितीवर मात

महिला बचत गटांच्या माध्यमातून आपापल्या उत्पादनांची विक्री करत या महिला आपला घराचा गाडा व्यवस्थित हाकत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून सुमारे दोन लाखांची उलाढाल होतेय. उत्पादनाच्या झालेल्या विक्रीतून मिळालेल्या नफ्याचं प्रत्येक सदस्याच्या कामानुसार वाटप केलं जातं. यंदा पाऊसपाणी नाही, शेतात पिकं नाहीत, घरात काम नाही अशा बिकट काळातही त्या न डगमगता घरातला कर्ता म्हणून यशस्वीपणं धुरा सांभाळत आहेत. गिरिजा महिला बचत गटाच्या सोळा महिला सदस्यांपैकी दोन महिला मार्केटिंगचं काम पाहतात.

 

Mahila bachat gat 4दुष्काळ जाणवला नाही...
खान्देश, जळगाव इथल्या कलाबाई राजापुरे साताऱ्यात उडीद पापडाची विक्री करण्यासाठी आल्या आहेत. त्यांचा ओम शांती बचत गट दोन क्विंटलचे पापड तयार करतो. दुष्काळात सरकारनं आधार दिला. या बचत गटामुळं दुष्काळ काय आहे हे जाणवलं नाही, असं मत या महिलांनी 'भारत4इंडिया'कडं व्यक्त केलं. साताऱ्यातील माण तालुक्यातील बोथे गावच्या एकता महिला बचत गटानं लस्सी, ताक याचं वितरण करून दहा हजार रुपये कमवलेत. दुष्काळानं मारलं, पण बचत गटांनी तारलं अशी भावना त्यांनी व्यक्त केलं.

 

त्यांना हवाय मदतीचा हात

या ग्रामीण भागांतील बचत गटांना उत्पादनांच्या विक्रीसाठी शहरातली बाजारपेठही उपलब्ध व्हावी, जेणेकरून त्यांना चांगला ग्राहक वर्ग मिळू शकेल. त्याचप्रमाणं शहरातल्या माणसांनी पुढाकार घेत या बचत गटांना मदतीचा हात देणं फार गरजेचं आहे. कारण या बचत गटांद्वारे केली जाणारी उत्पादन विक्री ही केवळ नफ्याचं साधन म्हणून होत नसून, यामुळं दुष्काळात होरपळलेल्या घरांतील महिलांच्या घरांना उभारी देण्यासाठी होते. यासाठी आपला मोलाचा हातभार लागल्यास या महिला आर्थिक परिस्थितीवर मात करत स्वत:च्या पायावर उभ्या राहतील, अशी प्रतिक्रिया या जत्रेच्या आयोजकांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केली.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.