स्पेशल रिपोर्ट

तिनं वसवलीय अपंगांची 'स्वप्ननगरी'

मुश्ताक खान, कुडाळ, सिंधुदुर्ग
मोठ्या जिद्दीनं शारीरिक अपंगत्वावर मात करून भरारी घेणाऱ्या व्यक्तींना पाहून धडधाकट माणसांनाही जगण्याचं बळ मिळतं. कबड्डी खेळताना पाठीच्या मणक्याला मार बसला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी तिला कायमचं अपंगत्व आलं. परंतु त्यामुळं खचून न जाता, नव्या उमेदीनं उभारी घेत तिनं स्वत:बरोबर इतराचंही आयुष्य उजळवलं. ही कहाणी आहे जिद्दीची आणि प्रेरणेची. ही कहाणी आहे नसीमा हुरजूक यांची. कोकणातल्या अत्यंत दुर्गम भागात अपंगांसाठी त्यांनी स्वप्ननगरी वसवलीय.
 

 

naseema hujru - kaju factory 31नसीमा हुरजूक 'पॅराप्लेजिक' आजारानं ग्रस्त झाल्यात. या आजारात व्यक्तिच्या कमरेपासून संपू्र्ण खालचा भागातील संवेदना नष्ट होतात. माणूस अधू होतो. साहजिकच त्यांना चाकाची खुर्ची वापरावी लागली. हसत खेळत नृत्य करणारी, खेळात मग्न असणारी नसीमा कायमची खुर्चीला खिळली. आशा प्रतिकूल परिस्थितीत घरच्यांच्या साथीनं तिनं अर्थशास्त्रात बी.ए. केलं. पदवी मिळाल्यानंतर त्या एका बँकेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या खऱ्या, पण त्यांची शारीरिक दुर्बलता पाहून त्या बँकेनं त्यांना नोकरी नाकारली. तरीही त्यांनी आपली उमेद कायम ठेवून सेंट्रल एक्साईजमध्ये नोकरी मिळवली आणि इतरांपेक्षा चांगलं काम करून दाखवलं.

 

इतरांसाठी काहीतरी करण्याची भावना
आपला जन्म केवळ नोकरीसाठी झालेला नाही. राज्यभरात ४५ लाख व्यक्ती अपंग आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना नसीमा यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लंडनमध्ये अपंगांसाठी असलेल्या स्पर्धेत त्यांची निवड झाली. तिथं गेल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं की, इथं येणाऱ्या प्रत्येक अपंगाच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेश नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. असंच तेज त्यांना भारतात असलेल्या लाखो अपंगांच्या चेहऱ्यावर फुलवायचं होतं. हाच ध्यास घेऊन त्यांनी १९८३ मध्ये एन. डी. दिवाण यांच्या प्रेरणेनं आणि काही समविचारी लोकांच्या सहकार्यानं कोल्हापूर इथं 'हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड' नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. त्यांनी अपंग मुलांसाठी शाळा स्थापन केली, वसतिगृहं उभारली, पुनर्वसन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केली, यातून राज्यातल्या अनेक अपंगांचच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडला.

 

सिंधुदुर्गात उभारली स्वप्ननगरी
कोल्हापूरनंतर त्यांनी सिंधुदुर्गात अपंगांसाठी स्वप्ननगरी उभारलीय. त्याला कारणही तसंच ठोस होतं. २००० सालच्या आसपास सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांची संख्या सर्वाधिक होती. साडेतीन हजार अपंगांच्या नावांची यादी नसीमा दीदींच्या हाती आली होती. त्यांनी मग सिंधुदुर्गात शिबिर घ्यायला सुरुवात केली. पण इथं त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचं कारण असं की, इथल्या लोकांमध्ये असलेली प्रचंड अंधश्रद्धा. पूर्वजन्मी काही तरी घोर पाप केल्यानं देवानं यांना शिक्षा दिली, असा गैरसमज त्यांच्या मनात होता. कोकणातल्या या दुर्गम भागातले पालक आपल्या अपंग मुलांचं ऑपरेशन्स करायला तयार नव्हते. त्यामुळं अपंग मुलांच्या पालकांना कोल्हापूर इथल्या वसतिगृहात नेण्यात आलं. तिथल्या अपंग मुलांचं खेळणं, बागडणं, मस्ती करणं पाहून पालकांना विश्वास बसला आणि तिथं ते प्रवेश घेऊ लागले. विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्यानं सिंधुदुर्गातच प्रकल्प सुरू करण्याचं नसीमा दीदींनी ठरवलं. इथं प्रकल्प उभारायचा म्हणजे जागा हवी. त्यांनी या चांगल्या कामासाठी शासनाकडं जागेची मागणी केली, पण त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या. शेवटी सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातल्या एका दुर्गम खेड्यात माणगावकर कुटुंबियांनी १२ एकर जागा दिली. पाच वर्षं नदी ओलांडून इथं यावं लागत होतं. अखेर अनंत अडचणींवर मात करत इथं स्वप्ननगरी साकारली. आज या स्वप्ननगरीत १०० अपंग राहत आहेत, त्यापैकी ६-७ कुटुंबं आहेत, ज्यांचं लग्नही स्वप्ननगरीतच झालंय. या स्वप्ननगरीत दिवसाची सुरुवात आणि शेवट प्रार्थनेनंच होतो.
                                                                इतनी शक्ती हमे दे ना दाता
                                                                मनका विश्वास कमजोर हो ना
                                                                हम चले नेक रस्ते पे हमसे
                                                                भूल कर भी कोई भूल हो ना...

 

अपगांना स्वावलंबी बनवलं

अपंगांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीनं इथं अनेक प्रयोग होताना दिसतात. त्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे इथं असलेलं लाजवाब काजू प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र. त्याची स्थापना मार्च २००४ मध्ये झाली. ग्रामीण भागातील अपंग व्यक्तींना आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या या काजूला राज्यभरातून प्रचंड मागणी आहे. त्यामुळं दरवर्षी इथं काम करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सध्या इथं काम करण्यासाठी ७३ अपंग स्त्री आणि पुरुष कर्मचाऱ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आलं आहे. पहिल्या वर्षी म्हणजेच २००४ मध्ये ११ टन काजूंवर प्रक्रिया करण्यात आली, तर यंदा २५० टन काजूवर प्रक्रिया करण्याचा नसीमा दीदींचा मानस आहे. स्वप्ननगरीत शेती करून झाली, शाळाही सुरू होती, बागायती आहे, भाजीपाला पिकवला जातो. पण गेल्या १३ वर्षांच्या अनुभवानंतर दीदींच्या असं लक्षात आलं की, अपंगांसाठी काजू प्रक्रिया केंद्रच उत्तम मार्ग आहे. त्यांनी ते उभारलं. आज जवळजवळ अडीच कोटी रुपयांची उलाढाल या काजू प्रकल्पात होतेय.

 

naseema hujru - kaju factory 16'चाकाची खुर्ची' 
नसीमा हुरजूक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं आजपर्यंत १६ हजारांहून अधिक अपंगांना गेल्या तीन दशकात ६-७ कोटी रुपयांचं सेवासहाय्य मिळालंय. नसीमा दीदींच्या ‘चाकाची खुर्ची’ या पुस्तकानं देशभरातल्या अनेक अपंगांना उभारी दिलीय. या पुस्तकाचे इंग्रजी, गुजराथी, तेलगू, उर्दू या भाषेत अनुवादही झाले आहेत. पण सरकारनं यातून काही धडा घेतलेला दिसत नाहीये.

 

त्यांना हवीय सरकारची मदत
काजू प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यानंतर सरकारनं सेल्स टॅक्स माफ करावा, अशी मागणी संस्थेतर्फे केली गेली. पण शासनानं त्याकडंही पूर्णपणं दुर्लक्ष केलं. त्यानंतर वॅट पद्धती लागू झाली. दर तीन महिन्यांनी वॅटचे पैसे भरावे लागत असत. यातली ८५ टक्के रक्कम परत मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. पण तेही या निगरगट्ट सरकारनं गेल्या तीन वर्षांपासून परत केलेली नाही. त्यासाठी नसीमा दीदींना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागली, पण फायदा काहीच नाही. चेक तयार आहे, असं अधिकारी म्हणतात. पण तो देणार कधी, असा सवाल नसीमा दीदी उपस्थित करत आहे. अशा अनेक अडचणींना तोंड देत त्यांचं काम सुरूच आहे.

सरकारी मदतीशिवाय अपंगांनी अपंगांसाठी उभारलेल्या या स्वप्ननगरीत एकदा तरी भेट द्यायला हवी. नसीमा दीदींनी 'अपंग नव्हे अभंग आम्ही' हे त्यांच्या कार्यातून सिद्ध केलंय. त्यांच्या या अभूतपूर्व अशा कामाला भारत4इंडिया'चा सलाम.  

Comments (4)

 • खूप छान मुस्ताख सर

 • चांगली आहे स्टोरी मुश्ताक सर ....

 • नसीमा हुरजूक.. यांना माजा सलाम ..... इतनी शक्ती हमे दे ना दाता
  मनका विश्वास कमजोर हो ना
  हम चले नेक रस्ते पे हमसे
  भूल कर भी कोई भूल हो ना...

 • खूपच चांगली स्टोरी आहे.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.