केल्याने होत आहे रे.... आधी केलेच पाहिजे
प्रयत्न केले तर अनेक अडचणींवर मात करून हवं ते यश मिळवता येतं. हे जालन्याच्या संजीवनी जाधव यांनी दाखवून दिलंय. एक गृहिणी ते उद्योजिका हा प्रवास त्यांनी पती अशोक जाधव यांच्या साथीनं यशस्वीपणं केलाय. बुलडाण्याच्या संजीवनीताई लग्नानंतर जालन्याला आल्या आणि खाजगी कंपनीत काम करणारे आपले पती अशोक जाधव यांच्यासोबत संसार करू लागल्या. पण पुढं तुटपुंज्या पगारात तीन मुलं पदरी असलेल्या संजीवनीताईंना आर्थिक चणचण भासू लागली आणि त्यांच्यातली उद्योजिका जागी झाली.
छोट्या उद्योगांपासून सुरुवात
सुरुवातीला घरातूनच छोटा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय संजीवनीताईंनी घेतला आणि सोलापूरच्या चादरी, भवानी सतरंजी यांसारख्या वस्तू ठोक भावात आणून त्या विकण्याचं काम सुरू केलं. परंतु या व्यवसायातूनही पाहिजे तसं उत्पन्न मिळत नव्हतं. यापेक्षा अजून वेगळं काही करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. मग त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून मशरूम बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि घरातच त्याचं उत्पादनही घेण्यास सुरुवात केली. परंतु हे करत असताना त्यात एक अडचण जाणवली. हे मशरूम फ्रेश किंवा ताजे असतानाच विकले जायचे. त्यामुळं उरलेला सर्व माल खराब व्हायचा, तो नंतर फेकून द्यावा लागायचा. यामुळं संजीवनीताईंना बरंच आर्थिक नुकसानही सोसावं लागायचं. त्यामुळं त्यांनी हेही काम बंद केलं. परंतु कुटुंबासाठी काहीतरी वेगळं करण्याची त्यांची जिद्द अजूनही कायम होतीच. अशातच संजीवनी यांना त्यांच्या पतीकडून बचत गटाची माहिती मिळाली.
अखेर बचत गटाची सुरुवात
बचत गट सुरू करण्याचा विचार मनाशी पक्का केल्यावर जाधव दाम्पत्यानं अनेक बचत गटांच्या प्रदर्शनांना भेटी दिल्या आणि बचत गटांविषयीची सखोल माहिती मिळवली. अखेर २००८ मध्ये संजीवनीताईंनी अॅक्टिव्ह महिला बचत गटाची स्थापना केली. बचत गटाची स्थापना केल्यानंतर त्यांनी खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात आवळा कॅण्डी बनवण्याचं प्रशिक्षण घेतलं. सुरुवातीच्या काळात याच कृषी विज्ञान केंद्रानं तयार केलेल्या आवळा कॅण्डी विकण्यास त्यांनी सुरुवात केली. या आवळा कॅण्डीच्या विक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहून संजीवनी यांनी हे उत्पादन घरीच तयार करण्याचा निर्णय घेतला. या आवळा कॅण्डीच्या मार्केटिंगची सर्व जबाबदारी त्यांचे पती अशोक यांनी उचलली.
२००८ मध्ये आपला उद्योग उभारणीसाठी चाळीस हजारांचं कर्ज घेऊन पाच क्विंटल आवळ्यांच्या कॅण्डी बनवण्यास या बचत गटानं सुरुवात केली. या उत्पादनांची विक्री लगेच झाल्यामुळं त्यांना आपल्या कामाचं महत्त्व कळलं. यानंतर 10 , 15 , 25 क्विंटल आवळ्यांपासून कॅण्डी बनवण्यास सुरुवात केली. यंदा हा बचत गट १०० क्विंटल आवळ्याचं उत्पादन घेतोय. संजीवनीताई एवढ्यावरच न थांबता त्यांनी यामध्ये विविध प्रयोगही केलेत. आवळा नमकीन कॅण्डी, आवळा सुपारी, आवळा पावडर, आवळा मोरावळा, मुरब्बा इत्यादी आवळ्यापासून बनवलेले विविध पदार्थांना मार्केटही मिळवून दिलं. उत्पादनाची विक्री आणि संजीवनीताईंचं कार्य पाहून आज अनेक महिला अॅक्टिव्ह बचत गटात सामील झाल्यात. काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चार महिलांच्या या 'अॅक्टिव्ह' बचत गटात आज १७ महिलांचा सहभाग आहे, त्याचबरोबर मार्केटमध्ये या बचत गटाचा 'अॅक्टिव्ह ब्रँण्ड' अल्पावधीत लोकप्रियही झालाय.
गुणवत्ता हीच ठरली खरी ओळख
उत्पादनाची दर्जेदार गुणवत्ता, मालाचं पॅकिंग आणि उत्कृष्ट सेवा यामुळं अॅक्टिव्ह गटाच्या उत्पादनाला जालना, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड, बीड, पुणे इथं विशेष मागणी असते. विशेषतः संजीवनी यांच्या नमकीन आवळा कॅण्डीला सर्वात जास्त मागणी आहे. संजीवनी यांनी ग्राहकांना काय भावतं, किंवा ग्राहकांना नवीन काहीतरी हवं असतं म्हणून आवळ्यासोबत आता आले पावडर आणि आल्यापासून बनवलेले अनेक पदार्थ बाजारात आणायला सुरुवात केलीय. त्यांचं हे उत्पादनसुद्धा बाजारात चांगलंच पसंतीस उतरलं आहे.
अनेक अडचणींवर केली मात
सुरुवातीला संजीवनी यांना अनेक अडचणी आल्या, महिला सदस्यांची संख्या फार कमी होती. त्यात अनेक महिला टीकाच करत, कसं जमेल? पैसे मिळतील का? नुकसान कोण भरून देईल? असे प्रश्न विचारीत. मात्र नफा मिळू लागल्यानंतर सगळ्यांकडून पाठिंबा मिळाला. तसंच सुरुवातीला माल खराब होणं, नुकसान होणं, अशा अनेक समस्यांना तोंडही द्यावं लागलं. परंतु या सर्वांवर त्यांनी मात केली. माल विकला जावा यासाठी त्यांनी अनेक प्रदर्शनांतून स्टॉल लावले. यामुळं लोकांना त्यांच्या मालाची गुणवत्ता समजली, परिणामी विक्री वाढली, मालाला मागणी वाढली, आपण कोठे कमी पडतो याचं ज्ञानही संजीवनी यांना झालं. त्यावर त्यांनी प्रयत्न करून समस्यांवर मात केली. गेल्या वर्षी त्यांची उलाढाल पाच लाखांपर्यंत होती. आता संजीवनी यांना ती दहा लाखांवर जाण्याची अपेक्षा आहे. आज त्यांच्याकडं मार्केटिंगसाठी चार माणसं कामाला आहेत.
इतरही अनेक स्तुत्य उपक्रम
होळी आणि रंगपंचमीला बाजारात अनेक रंग विक्रीला येतात. त्यात अनेक रंग हे रसायनमिश्रित असल्यामुळं त्यापासून शरीराला, त्वचेला दुखापत, तसंच इजा होण्याची शक्यता जास्त असते. याचं सामाजिक भान ठेवून संजीवनी यांनी पुढाकार घेतला आणि नैसर्गिक पद्धतीनं रंग बनवण्याचं प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राकडून घेतलं. त्यात प्रामुख्यानं पळसाची पानं, निलगिरीची साल, बीट, मेहंदी, कंदमुळं पावडर (अॅशे रूट), अशा अनेक नैसर्गिक साधन संपत्तीपासून नैसर्गिक रंग बनवले जाताहेत. रंगपंचमी आणि होळीला नैसर्गिक रंगांची उधळण करूया, असं त्या म्हणतात. या अनुषंगानं समाजात इकोफ्रेंडली होळीचा संदेशही या गटानं दिलाय. याशिवाय रंगीत शेवया, केळा वेफर्स, आंब्यांचे विविध लोणची बनवणाऱ्या एक ना अनेक उद्योगांना मदत करण्यासाठीही संजीवनी तत्पर असतात.
अनेक पुरस्कार प्राप्त
शेती क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक महिलांपैकी एक असणाऱ्या आणि फळ प्रक्रिया उद्योगात चांगलं स्थान मिळवणाऱ्या संजीवनी जाधव यांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेत. त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे राजर्षी शाहू महाराज अॅग्रीकल्चर रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सोसायटीतर्फे 'कृषी गौरव पुरस्कार', कृषी विज्ञान केंद्रातर्फे 'कृषिभूषण पुरस्कार', तसंच केंद्रीय कृषिमंत्री यांच्या मातोश्री कै. शारदाबाई गोंविदराव पवार यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं 'अॅग्रोवनतर्फे सत्कार आणि पुरस्कार' असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. या पुरस्कारांमुळं काम करण्यासाठी नवी उभारी मिळते, तसंच माझा आणि माझ्या गटाचा आत्मविश्वास वाढला, असं संजीवनी जाधव म्हणतात. भविष्यात अनेक महिलांना या बचत गटामार्फत स्वयंपूर्ण, आर्थिक सुबत्तेकडं वाटचाल करून देण्याची इच्छा असलेल्या, तसंच अनेक महिलांच्या जीवनाला नवसंजीवनी देणाऱ्या संजीवनी जाधव यांना 'भारत4इंडिया'चा सलाम.
संपर्क - संजीवनी जाधव, मोबाईल - 9421474298 / 9158502131
Comments (2)
-
-
खूप खूप अभिनंदन! तुमच्या सहसा बद्दल आणि वाटचालीबद्दल शुभेच्छा! एक नवी दिशा तुम्ही महिल्लाना दाखवून दिली आहे.