स्पेशल रिपोर्ट

...आता नारळावर चढा, बिनधास्त!

मुश्ताक खान, दापोली, रत्नागिरी
नारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, आपले डोळे गरगरतात. उंच आभाळात लटकलेले नारळ काढणारा एखादा माणूस पाहिला की आपल्या काळजाचे ठोके चुकतात. अक्षरश: जीव तळहातावर घेऊन करण्याचंच हे काम. पण माडावर चढण्याचं हे महाकठीण काम आता सोपं झालंय. कोईमतूरच्या कृषी विद्यापीठानं माडावर सुलभ चढण्याचं यंत्रच विकसित केलंय. यामुळं आता माडावर चढणाऱ्यांच्या टंचाईवरही मात करता येणार आहे.
 

  

Coconut 6.pngनारळ जगण्याचा आधार

जागतिक स्तरावर नारळ उत्पादनात इंडोनेशियानंतर भारताचा क्रमांक लागतो. देशात केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसानंतर नारळ उत्पादनात महाराष्ट्राचा सातवा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात १७५ दशलक्ष नारळाचं उत्पादन घेतलं जातं. राज्यात प्रामुख्यानं कोकणातच नारळाची लागवड केली जाते. कारण इथलं हवामान नारळासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कोकणात २०-२५ हजार हेक्टर क्षेत्राखाली नारळाची लागवड करण्यात आली आहे. राज्याचा विचार केला तर सिंधुदुर्गात सर्वात जास्त म्हणजे ५८ टक्के क्षेत्रात नारळाची लागवड होते. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा नंबर लागतो. नारळ हा इथल्या जगण्याचाच आधार आहे. 

 

Coconut 17.pngउंच म्हणूनच अवघड
एक नारळाचं झाड संपूर्ण कुटुंब पोसतं, म्हणून या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. नारळाच्या झाडाला माड म्हणतात. हे नारळाचं झाड सहज १०० फूट वाढतं. सुमारे ३० मीटर उंचीचा हा माड चढण्यास अतिशय कठीण आहे. त्याच्या झावळ्या (पानं) अगदी तीन मीटर्सपर्यंत वाढत असल्या, तरी त्याला फांद्याच नसल्यानं, माडाला आडवा विस्तारच नसतो. बाकीच्या झाडांच्या स्पर्धेतूनही आपल्यालाच जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळावा की काय, म्हणून हा माड ही उंची गाठतो.


नारळाच्या झाडाच्या वरील भागातून, व्यवस्थित चुण्या घातलेलं पान (झावळी) बाहेर येतं आणि ते मोकळ्या जागेत बाहेरच्या बाजूनं पसरतं. नवीन पान आल्यावर सर्वात खालचं पान गळून पडतं. ते गळून पडताना बुंध्यापासून पूर्णपणं विलग तर होतंच, शिवाय खाली पडताना, आणखी एक काम करतं... बुंध्यावर यदाकदाचित एखादं बांडगूळ रुजलेलं असलं तर त्याला ते उपटून टाकतं. या झावळीची रचना बघितल्यास, मध्यभागी एक जाडजूड दांडा आणि त्याच्या दोन्ही बाजूनं समसमान, लांबीला जास्त, पण रुंदीला कमी अशी पानं असतात. या रचनेमुळं ती उभीच्या उभी खाली कोसळते. नारळाच्या झाडाचा बुंधा हा कायम गुळगुळीत आणि बांडगूळविरहित असल्यामुळं याच्यावर चढण्याचं कौशल्य माहीत नसलेल्या सर्वसामान्य माणसास यावर चढणं शक्य होत नाही.

 

Coconut 8.pngयंत्र केवळ चार हजार रुपयांत
गेल्या काही वर्षांपासून नारळ बागायतदारांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. माडावर फवारणी करणं, माड साफ करणं, शहाळी, नारळ काढण्यासाठी कुशल कामगार मिळणं कठीण झालंय. याचं महत्त्व जाणून कोईमतूरच्या कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याचं यंत्र विकसित केलंय. महत्त्वाचं म्हणजे हे यंत्र हाताळायला सोपं आणि सुरक्षित आहे. शिवाय हे यंत्र केवळ चार हजार रुपयांत उपलब्ध आहे. महाराष्ट्रात या यंत्राच्या प्रचाराची आणि प्रसाराची जबाबदारी कोकण कृषी विद्यापीठानं उचलली आहे.

 

यंत्राची रचना
कोकणात नारळाच्या झाडावर चढण्यासाठी मजूर मिळाला तरी किंमत अव्वाच्या सव्वा सांगितली जाते. झाडावरून काढलेल्या ५० टक्के शहाळ्यांची मागणी केली जाते किंवा प्रत्येक झाडावर चढण्यासाठी १०० रुपयांपर्यंत मजुरी मागितली जाते. याचाच विचार करून श्रमविज्ञान आणि शेतीतील सुरक्षितता या योजनेअंतर्गत कोईमतूर विद्यापीठानं नारळाच्या झाडावर चढण्याचं यंत्र २००७ मध्ये विकसित केलंय. या यंत्राच्या मदतीनं कोणालाही सहज नारळाच्या झाडावर चढता येतं. त्यामुळं आता मजुरांची वाट बघण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना भासणार नाही. या यंत्राची रचनाही अत्यंत सोपी आहे. यात दोन फ्रेम असून चौरस लोखंडी पाईपापासून त्याची निर्मिती करण्यात आली आहे. खालच्या फ्रेमचा आकार २x१ फूट आहे, तर वरच्या फ्रेमचा आकार ३.५x२ फूट आहे. या दोन्ही फ्रेमना रबर असल्यानं या यंत्राची झाडाला अत्यंत घट्ट अशी पकड बसते. बसण्यासाठी यंत्रावर सायकलची सीट बसवण्यात आलीय. त्याचबरोबर वरच्या फ्रेमच्या इंग्रजी यू आकाराच्या क्लॅपमुळं झाडावर चढताना यंत्र तिरकं होत नाही, अशी माहिती कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ. विजय आवारे यांनी दिली.

 

Coconut 21.pngजीवावरचा धोका टळला 
पारंपरिक पद्धतीपेक्षा अत्यंत सुरक्षित असलेल्या या यंत्रामुळं गेल्या पाच वर्षांत माडावरून पडण्याची संख्या कमी झाली आहे. या यंत्राची किंमतही फक्त चार हजार रुपये एवढी कमी असल्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नारळ काढण्यासाठी या यंत्राचा वापर करावा, असं कोकण कृषी विद्यापीठाचे प्रा. दिलीप महाले यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

 

यंत्राची खासियत
१) पारंपरिक पद्धतीपेक्षा माडावर चढण्यास सुरक्षित
२) प्रशिक्षित मजुरांची आवश्यकता नाही, कोणीही याचा वापर करू शकतो
३) यंत्रावर असलेल्या सायकलीच्या सीटमुळं नारळ काढताना काढणाऱ्यावर ताण येत नाही.
४) हे यंत्र सर्व बाजूनं झाडावर फिरवता येऊ शकतं, त्यामुळं प्रत्येक बाजूनं नारळ, शहाळी काढता येतात
५) या यंत्राच्या साहाय्यानं कामाचा ताण कमी होतो. मजुराला किंवा नारळ काढणाऱ्याला मानेचा आणि पाठीचा त्रास होत नाही.
६) पारंपरिक पद्धतीपेक्षा २०० टक्के जास्त काम या यंत्राच्या सहाय्यानं करू शकतो.
७) या यंत्रामुळं ३८ टक्के वेळेची बचत होते.
८) याशिवाय ४८ टक्के किमतीचीही बचत होते
९) पारंपरिक नारळ काढणीच्या पद्धतीपेक्षा या यंत्रामुळं ६८ टक्के श्रम कमी पडतात

यंत्रासाठी संपर्क – प्रा. दिलीप महाले – ९४२२०५२२६९, डॉ. विजय आवारे - ९४२२६३५२०२

Comments (2)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.