स्पेशल रिपोर्ट

कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी!

मुश्ताक खान, रत्नागिरी
जे न देखे रवी, ते देखे कवी...असं म्हणतात. कविता ही जशी जळजळीत वास्तव मांडणारी असते, तशीच ती भविष्याचा वेध घेणारीही असते. कविमन आणि कविदृष्टी यामुळं समाजाचं भरणपोषणच होत असतं. निसर्गसौंदर्यानं पुरेपूर नटलेल्या कोकणात केशवसुत यांच्यासारखे कविवर्य होऊन गेले. आज तीच कोकणची परंपरा दादा मडकईकर यांच्यासारखे कवी पुढं चालवतायत. प्रत्येकाचा आपला म्हणून थाटमाट आहे. त्यामुळंच कवितांनी कोकणच्या सौंदर्यात मोलाची भर घातलीय, एवढं खरं!

  

dadaअसे आहेत दादा मडकईकर?

मुलगा वाया गेलेला आहे, असा शिक्का मारून ज्याला पाचवीनंतर शाळेतून काढून टाकण्यात आलं... सावंतवाडीच्या अर्बन बँकेत ऐच्छिक निवृत्ती घेईपर्यंत ज्यानं इमानेइतबारे शिपायाची नोकरी केली. ज्यानं मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. ज्यांच्या प्रत्येक कवितेतून कोकणचं दर्शन होतं. अशा या अवलिया, हरहुन्नरी, सतत हसतमुख, विलक्षण हजरजबाबी, निसर्गात रमणारे निसर्गकवी गोविंद मडकईकर ऊर्फ दादा मडकईकर यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

 

कोकण ही निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेली भूमी आहे. इथल्या लाल मातीनं देशाला शेकडो नररत्न दिली. याच मातीतील सावंतवाडीत दादा मडकईकर यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताचीच. दादांचे वडील सोनारकाम करायचे... दादांनी शिक्षण घ्यावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. वडिलांच्या इच्छेखातर दादा सावंतवाडीच्या जीवन शिक्षण शाळा क्रमांक - १ मध्ये जेमतेम पाचवीपर्यंत शिकले. अखेर त्यांना शाळेतून अक्षरश: काढून टाकण्यात आलं. खरं तर दादांचं मन शिक्षणात रमतच नव्हतं. त्यांची दुनिया वेगळीच होती. ती म्हणजे निसर्गाची. फुलं, माती, झरे, पाणी, आकाश याचंच त्यांना आकर्षण वाटे. निसर्गाच्या या ओढीतूनच त्यांच्या कविमनानं आकार घेतला.

 

पहिली कविता 14 व्या वर्षी

दादांना आपण कवी होऊ, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यांच्या घराण्यात कुणीही कवी किंवा साहित्यिक नाही. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांचे वडील वारले. सहा भावंडांची आणि आईची जबाबदारी थोरल्या दादांवर येऊन पडली. परिस्थिती गरिबीची होती, पण त्याचं त्यांनी कधीच भांडवल केलं नाही. संसाराचा गाडा हाकत हाकत, निर्सगाशी त्यांचा मुक्त संवाद सुरू होता. त्यातूनच त्यांनी १९७२ ला पहिली निसर्ग कविता लिहिली...

 

''फाकल्या दिशा उजळली पूर्व
संपला काळोखाचा गर्भ
प्राजक्ताची फुले उधळीत रवी येई गगनात
दवबिंदूचे कण चमकती फुलांच्या कोंदणात''

 

रत्नागिरीत त्या काळात वसंत सावंत वर्षातून एकदा रत्नागिरीत कोजागिरी साहित्य संमेलन भरवत असत. त्यांना दादांबद्दल कुठून तरी माहिती मिळाली. त्यांनी पहिल्यांदा दादांना कविता सादर करण्यासाठी व्यासपीठ दिलं. याच संमेलनाच्या निमित्तानं दादा पहिल्यांदाच सावंतवाडीबाहेर गेले. त्यानंतर मात्र दादांच्या कक्षा अधिकाधिक रुंदावत गेल्या. त्यांची कीर्ती खऱ्या अर्थानं राज्यभरात पोहोचली ती १९९१ मध्ये रत्नागिरीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळं. या संमेलनात राज्यभरातून तीन हजार कविता आल्या होत्या. त्यातल्या फक्त ५० कविताच निवडण्यात आल्या आणि या कवितांमध्ये दादांचा नंबर लागला. त्यानंतर मान्यवर कवींनी ५ जणांची निवड केली आणि त्यातही दादांनी बाजी मारली. त्या आठवणी आजही त्यांना कालपरवा घडल्यासारख्या आठवतात. दादा सांगतात, ''आमच्या काळात आजच्याएवढी वशिलेबाजी नव्हती. मला कोणीही ओळखत नसताना तीन हजार कवितांमधून माझी कविता निवडली गेली. सगळे कवी कविता वाचून दाखवायचे. परंतु मी मात्र कविता गाऊनच म्हणायची, असा निश्चय केला. वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावर, मधु मंगेश कर्णिक या दिग्गजांसह २० हजार प्रेक्षकांसमोर 'खोल खोल दरीत गो चांन्याची फुला’ ही कविता सादर करताच एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. वन्स मोअरही मिळाला... इथूनच कवी म्हणून मला सामाजिक ओळख मिळाली.''

 

खोल खोल दरीत गो...चांन्याची फुला...

रत्नागिरीत झालेल्या साहित्य संमेलनानंतर बरोबर २२ वर्षांनी कोकणात चिपळूण इथं यंदा झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दादा मडकईकर निमंत्रित कवी होते. इतकी वर्षं लोटल्यावरही दादांच्या त्या कवितेची जादू अजूनही रसिकांच्या मनातून पुसलेली नव्हती. या वेळीही आयोजकांनी त्यांच्याकडून २२ वर्षांपूर्वी म्हटलेली तीच कविता पुन्हा म्हणण्याचा आग्रह धरला. दादांच्या कवितेची जादू यावरूनच आपल्या लक्षात येऊन जाते...

 

खोल खोल दरीत गो...चांन्याची फुला...
हरिया काळ्या डोगरार चांना गो ईला...
धुक्याचेच डोंगर झाले, रस्ते सागळे चांन्यात न्हाले...
पाना पानात चांन्ना फुटला चांन्याचाच वारा सुटला..
झाड प्याड आज गो चांदीचा झाला...

 

कविता पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

 

दोन दशकांच्या फरकानं सादर झालेली तरीही आजचीच वाटणारी ही कविता सुचली कुठं, यावर दादा सांगतात... ''आम्ही मित्रमंडळी आंबोलीला गेलो होतो. पावसाचा काळ होता. पौर्णिमेची रात्र होती. वातावरण अत्यंत आल्हाददायक होतं. क्षणात धुकं येत होतं. डोंगर नाहीसे होत होते. याच जादुई वातावरणात ही कविता सुचली.''

 

मालवणीचा प्रसार

दादांनी कवितेची सुरुवात जरी मराठीत केली असली तरी मालवणीला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर त्यांनीच केलंय. मालवणी भाषेला वेगळी गोडी आहे. कोणी बोलत असेल तर ती थांबून ऐकाविशी वाटते. दादा एरवी मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या माणसांना भेटल्यानंतर त्यांच्याशीही मालवणीतच बोलतात.

 

तारया मामा, तारया मामा...
असे हे दादा मडकईकर... निसर्ग कवितेबरोबरच व्याकूळ आईची कविताही ते तेवढ्याच ताकदीनं लिहितात...


''तारया मामा, तारया मामा, होडी हाड रे
बेगीन पोचय माका पैलाडी रे
पाळण्यात माझो झिल निजलो हा
बापूस तेचो कट्यार गेलो हा''

 

कविता पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 

 

सध्या वसंत हंगाम जोरात आहे. पळस, सावर, साळुंखी, उक्क्षी, नागचाफा फुलले आहेत. हा निसर्ग कवी मग गप्प कसा बसेल...

 

''पळस फुललो रानात, पळस फुललो मनात
फांदीये फांदीयेर सावर फुलली, सगळ्या रानात उक्क्षी फुलली
नागचाफ्याची फुला दडली, हिरव्या हिरव्या पानात
आबोली फुलली, ओवळा फुलली, ढवळी पिवळी शेवती फुलली
हर तरेची फुला फुलली होळीयेच्या सणात...''

 

कविता पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

 

आपण लिहिलेली कविता जमली आहे किंवा नाही, हे ठरवण्याचा मापदंड दादांकडे जबरदस्त आहे. ''मी मुद्दामहून बायकोसमोर माझी कविता दिवसभर म्हणत असतो. तेव्हा तर ती म्हणतेच की छान झाली आहे. पण जर तिनं जेवण करताना नकळत आपली कविता गुणगुणली, की समजायचं कविता हिट आहे,'' दादा आनंदानं सांगून जातात.

 

दादांनी स्वत:ची कविता लिहीपर्यंत दुसऱ्या कोणाचीही कविता वाचलेली किंवा ऐकलेली नव्हती. त्यामुळं माझ्या कवितेवर कोणाचीही छाप नाही, हे ते आवर्जून सांगतात. पण नंतर त्यांनी वाचनास सुरुवात केली. अनेक कवींच्या रचना वाचल्या. त्यांना सर्वाधिक भावलेले कवी म्हणजे बा. भ. बोरकर.


''त्या दिसा, वडाकडील गडद तिंसना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा...''

 

दादांचे मुंबई, गोवा, रत्नागिरी, कर्नाटक, बेळगाव, रायगड, आंबेजोगाई, शिरूर आदी ठिकाणी कवितांचे कार्यक्रम झालेत. आपल्या  दीड तासांच्या कार्यक्रमात दादा शाळेच्या पुस्तकात असलेल्या कविता आसपासच्या शाळेत जाऊन मुलांसाठी मोफत गायचे. इथं त्यांना तबल्यावर साथ त्यांचा मुलगा द्यायचा. दादांची आतापर्यंत चांन्याची फुला, हिरवेगार कोकण आणि आबोलेचो वळेसार अशी तीन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यात चान्ह्याची फुला हा मालवणी काव्यसंग्रह कवी नारायण सुर्वे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. मालवणी म्हणी आणि 'सुरंगीचो वळेसार' हा त्यांचा काव्यसंग्रह येऊ घातलाय. दादांची शब्दकोषाची कॅसेट उपलब्ध आहे. तर 'मिरगाचो पावस' या कॅसेटची निर्मिती साईनाथ जळवी यांनी दादांच्या प्रेमापोटी केलीय.

 

दादा चांगले कवी आहेतच. शिवाय माणूस म्हणूनही ते उत्तम आहेत. सावंतवाडीत कधी गेलात तर या दिलदार कवीला नक्कीच भेटा. पहिल्या भेटीतच आपली यांची ओळख अनेक दशकांची आहे, अशी भावना तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही.

 संपर्क- दादा मडकईकर- ९४२३३०४७९५

sunil kadamसुनील कदम
कोकणातल्या याच मातीत सुनील कदम नावाचा अष्टपैलू कवीही जन्माला आलाय. कमी बोलणारा, लोकांमध्ये पटकन न मिसळणारा. कोकणातल्या (पाजपंढरी) या छोट्याशा खेड्यात राहणारा सुनील संवेदनशील कवी आहे. याशिवाय लेखक, दिग्दर्शक, पत्रकार, गाईड, अभिनेता म्हणूनही त्याची ओळख आहे.

 

छत्रपती शिवराय हे त्याचे दैवत. त्यांच्यावरील 'राजे' ही त्याची कविता ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रचंड गाजली.

 

''हल्ली मलाच प्रश्न मी नेमका कोण
गो-ब्राह्मण प्रतिपालक की कुलवाडी भूषण
इथेच आम्ही वादाचे ठरतो
कधी कुणाकडून नाही, पण या बुद्धीवाद्यांकडून आम्ही हारलो''

 

कविता पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

 

गांधीजींनी सांगितलंय खेड्याकडं चला, पण आता खेडी पूर्वीसारखी राहिली नाहीत, असं म्हणणारा सुनील कदम गावखेड्यांचं बदललेलं वास्तव अचूक शब्दात मांडतो....

 

''दत्त्यामामा काय चुत्यासारखी सनई वाजवतोस
आता आम्हाला डीजे हवाय डीजे...
पूर्वी तू सनई साफसूफ करायला लागलास की आम्हाला चाहूल लागायची
सण जवळ आल्याची
आता नाक्यावर मोठमोठे फलक लागले की आम्हाला कळतं सण जवळ आल्याचं''

 

कविता पाहण्यासाठी इथं क्लिक करा...

 

आपल्या अवतीभवतीच्या वास्तवाकडं तसंच बदलांकडं कवींचं किती बारीक लक्ष असतं, याचीच ही साक्ष. जे न देखे रवी, ते देखे कवी...असं उगीच म्हणत नाहीत.

संपर्क- सुनील कदम - ९२२६९३६५८६


Comments (2)

  • मुश्तक़ खान तुमचा हा उपक्रम खूप सुंदर आहे. तुमचही अभिनंदन.

  • दत्त्या मामा हि कविता खूप सुंदर आहे २ पिड्यानमधल अंतर दाखवणारी कविता आहे,अजून १ विनंती आहे कि सुनील कदम ची एखादी प्रेम कविता ऐकयला खूप आवडेल.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.