स्पेशल रिपोर्ट

पाण्याच्या पुनर्वापरानं केली टंचाईवर मात

विवेक राजूरकर, औरंगाबाद
भीषण दुष्काळाची झळ औरंगाबाद शहरालाही बसत असून आठवड्यातून दोनच दिवस पाणीपुरवठा होतोय. सर्वच जण काटकसरीनं पाणी वापरतायत. त्यातच ज्ञानेश्वर बिरारे यांनी घरच्या घरी पाण्याचा पुनर्वापर करणारं तंत्र विकसित केलंय. आंघोळीसाठी, कपडे धुण्यासाठी वापरलेलं पाणी ते पुन्हा वापरात आणतायत. यासाठी त्यांनी घरच्या घरी सहज कुणालाही वापरता येतील अशी साधनं उपयोगात आणलीत. याचं अनुकरण इतरांनीही केल्यास टंचाईत त्यांना दिलासा मिळू शकतो, एवढं नक्की!
 

 

water reuse 4२०० ते ३०० लिटर पाण्याची बचत

औरंगाबादमध्ये हडको टीव्ही सेंटर परिसरात बिरारे कुटुंबीय राहतात. घरच्या घरी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्यांना केवळ दीड हजार रुपये खर्च आलाय. आंघोळ केल्यानंतर, तसंच कपडे धुतल्यानंतरच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करून ते दररोज २०० ते ३०० लिटर पाण्याची बचत करतात.

 

पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टळला
क्रॉम्टन ग्रीव्हज कंपनीत कामाला असणाऱ्या बिरारे यांच्या कुटुंबात एकूण सहा सदस्य आहेत. त्यामुळं पाण्याचा अतिशय काटकसरीनं वापर करूनही त्यांना पाणी कमीच पडत असे. रोजरोजच्या पाण्याच्या समस्येनं वैतागून न जाता बिरारेंनी काहीतरी उपाय काढायला पाहिजे, असं मनाशी पक्क केलं. यासाठी त्यांनी मित्र सुरेशची मदत घेत एक खास तंत्र विकसित केलं. आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी पाण्याचा वापर जास्त होतो, ही बाब लक्षात घेऊन याच पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. या विचारानुसार त्यांनी घरातल्या घरात उपलब्ध साहित्याचा वापर करून पाण्याच्या पुनर्वापराचं तंत्र विकसित केलं. या पाण्याचा फेरवापर घरातील फरशी पुसण्यासाठी, गाडी धुण्यासाठी, तसंच झाडांसाठी केला जाऊ लागला. तसंच एका पाईपद्वारे या पाण्याचा वापर फ्लशसाठीही करता येऊ लागला. त्यामुळं शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अपव्यय थांबला.

 

water reuse image 10काय आहे हे तंत्र?
बाथरूममधील आंघोळीचं आणि कपडे धुण्याचं पाणी जमा करण्यासाठी एक स्वतंत्र पाण्याची बादली तयार करण्यात आली. या बादलीत हे पाणी आणण्यासाठी कुलरमधील मोटर वापरण्यात आली. या मोटरच्या तोंडाशी जाळी लावण्यात आली. या छोट्या बादलीतून नळाच्या तोटीद्वारे पाणी अन्य एका बादलीत सोडलं जातं. यात पहिली बादली उंचावर ठेवल्यामुळं हवेच्या दाबानं हे पाणी एका बादलीतून दुसऱ्या बादलीत नेण्याची प्रकिया होते. या बादलीमधील पाणी स्वच्छ करण्यासाठी प्लॅस्टिकच्या जाळीत वाळू आणि कार्बनचे खडे टाकण्यात आले. त्यामुळं या चाळणीतून हे पाणी स्वच्छ केलं जातं. त्याच बादलीत घरगुती पाण्याची फिल्टरदेखील बसवली आहेत. अशा प्रकारे पाणी फेरवापरासाठी तीन वेळा स्वच्छ केलं जातं. नंतर ते एका मोठ्या ३०० लिटर ड्रममध्ये गोळा केलं जातं आणि शेवटी हे मिळणारं स्वच्छ पाणी फेरवापरासाठी वापरलं जातं. या तंत्राचा वापर कुणालाही आपल्या घरात सहज करता येणं शक्य आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवता येऊ शकतो याचं हे सुंदर उदाहरण आहे.

 

water reuse image 3पुनर्वापर म्हणजे पाण्याची मोठी बचत
"महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळं प्रत्येकानं अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर केल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल,” असा विश्वास ज्ञानेश्वर बिरारे यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना व्यक्त केला.

 

"आमच्याकडे पाच दिवसाआड पाणी येतं. पिण्याच्या पाण्याचीच कमतरता, त्यात कपडे धुणं, आंघोळीसाठी पाणी पुरणं शक्य नव्हतं. पाण्यासाठी पायपीट करावी लागायची. उपाय म्हणून टॅंकर मागवावा लागायचा. त्याचा वेगळा खर्च. तसंच हे पाणी खाली उतरून आणावं लागायचं. आता आम्ही ही यंत्रणा वापरायला लागल्यापासून आंघोळीच्या, धुण्याच्या पाण्याच्या पुनर्वापरामुळं आता आम्हाला पाच दिवस पाणी पुरंत,” असं ज्ञानेश्वर बिरारे यांच्या पत्नी मेघा यांनी सांगितलं.

 

गरज ही शोधाची जननी आहे, असं म्हटलं जातं. बिरारे कुटुंबीयांनी गरजेतूनच हा अभिनव प्रकल्प साकारलाय. त्याची अमलबजावणी करून आपणही पाणी वाचवू शकतो.

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.