स्पेशल रिपोर्ट

कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा!

मुश्ताक खान, रत्नागिरी
विकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, काजू आणि सागाच्या हजारो हेक्टर बागा खाक झाल्यात. सरकार दरबारी मात्र वणवे मानवनिर्मित असल्याचं कारण पुढं करून नुकसानभरपाई दिली जात नाही. वणवे लागतायत, बागा खाक होतायत, भरपाई काही मिळत नाही... अशा कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांचा आता संयम सुटत चालला असून, वणव्यांमुळं नुकसान होणाऱ्या फळबागांना भरपाई द्या, असा नारा इथं घुमू लागलाय.
 

 

वणव्याचं वाढत चाललंय प्रमाण
चिपळूण, गुहागर, खेड, दापोली या विभागात वणव्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढताना दिसतंय. वन विभाग तर वणव्याच्या ठिकाणी पोहोचतही नाही इतकं हे सवयीचं झालं आहे. गरिबीनं आधीच पिचलेला शेतकरी अधिकच तळागाळात रुतत चालला आहे. चिपळूण, गुहागरमध्ये तर वणवा ही अलीकडच्या काळात नित्याची गोष्ट होत चालली आहे. रामपूर, मार्गताम्हाणे, गिमवी, देवघर, झोंबडी, चिखली या भागाचाच जर आपण विचार केला, तर इथंच जवळपास हजार हेक्टरपर्यंत हा वणवा पोहोचतो आहे. यात काजूची फळं धरलेली बाग पूर्णपणं नष्ट झालेली दृष्यं इथं थोड्या थोड्या अंतरावर दृष्टिपथात पडतात. या भागातल्या प्रत्येक बागायतदाराची किमान 150-200 झाडं जळून गेल्याची माहिती ते देत आहेत.

 

Vanava Photo 16वणवा लागण्याची विविध कारणं
चैत्र, वैशाखात संध्याकाळी सुटणाऱ्या वाऱ्यामुळं झाडांचं एकावर एक घर्षण होऊन ठिणगी निर्माण होते आणि या ठिणगीचा वणवा व्हायला वेळ लागत नाही किंवा झाडावर वीज कोसळूनही आगीचा भडका उडतो. ही वणव्याची दोन नैसर्गिक कारणं असली तरी ढोबळमानानं कुणी त्यावर विश्वास ठेवत नाही. वणवा हा मानवनिर्मित आहे, असंच सर्व जण गृहीत धरतात. सरकारी यंत्रणेनं तर त्यावर शिक्कामोर्तबच केलंय. कोकणात प्रवाशांकडून सिगारेट आणि विडी सुलगवल्यानंतर पेटती काडी न विझवता तशीच टाकून दिल्यानं सहज वणवा पेटत जातो. त्याचबरोबर वीजवाहक तारांमध्ये स्पार्क झाल्यानंही वणवे लागतात. चिपळूणमार्गे गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. इथं आलेले पर्यटक बऱ्याच वेळा दगडाच्या चुली मांडून जेवण करतात. त्यामुळं त्यांच्या ठिणग्या इतस्तत: जाऊन वणवा लागतो. त्याचा नाहक फटका मात्र शेतकऱ्यांना बसतो.

 

Vanava Photo 6सरकारी उपाययोजना आवश्यक
'झाडं लावा झाडं जगवा,' अशी घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे. पण आपल्याच घोषणेचा सरकारला विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या बागांबरोबरच या वणव्यामुळं हजारो जंगली झाडंही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. याचा पर्यावरणाला मोठा फटका बसला आहे. फक्त झाडांचा विचार करून इथं चालणार नाही, तर या जंगलात विचरण करणारे छोटे छोटे वन्यजीव असतील किंवा कीटक असतील, या सगळ्यांना जीव गमवावा लागत आहे. आधीच वृक्षतोडीमुळं बोडके दिसणारे डोंगर या वणव्यामुळं अधिकच भयानक भासत आहेत. निसर्गरम्य कोकणाचं सौंदर्य वाचवण्यासाठी, तसंच हे वणवे न लागण्यासाठी सरकारनं उपाययोजना आखणं गरजेचं झालंय.

 

Vanava Photo 10लागणारे वणवे मानवनिर्मित
दरम्यान, वणव्यामुळं बागायती नष्ट होण्याला शेतकरीच जबाबदार आहे, असं सरकारी अधिकारी सांगत आहेत. बागायतदारांनी आपल्या बागेतील गवतांची कापणी जर गवत ओलं असताना केली, तसंच बागांमधून काडीकचरा वेळच्या वेळी साफ करून नष्ट केला, तर त्यांची बाग वणव्यापासून नक्कीच वाचू शकेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

 

गवत काढणीसाठी निधीची मागणी
वणव्यात जळालेल्या शेतीचा पंचनामाही होत नाही. पंचनामा झाला तर नक्की किती नुकसान झालं आहे याचा अंदाज तरी बांधता येईल. पण तसं काहीच इथं होताना दिसत नाही. जिल्ह्यात फळझाड लागवडीसाठी सरकार पैसे पुरवतं, खतं आणि औषधांसाठीही निधी दिला जातो. मग ज्या गवतामुळं वणवा पसरत जातो त्याच्या स्वच्छतेसाठी सरकार निधी उपलब्ध करून का देत नाही, असा सवालही शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. सरकार या वणव्यामुळं खचलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचा प्रयत्न का करत नाहीये, याचंही उत्तर मिळत नाहीये.

 

रत्नागिरी हा फळ बागायतीचा जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळं इथल्या फळबागा नष्ट होणार नाहीत, इथला शेतकरी जास्तीत जास्त फळबागांकडे कसा वळेल याकडं सरकारनं लक्ष पुरवणं आवश्यक आहे. पण जे शेतकरी बागायतींकडं वळत आहेत त्यांच्या बागांना अलीकडच्या काळात वणवा लागण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा शेतकऱ्यांचं मनोबल खचणार नाही, याची खबरदारी सरकारला घ्यावी लागेल अन्यथा रत्नागिरी हा फळबाग जिल्हा म्हणून फक्त कागदावरच राहील.


Comments (1)

  • मुश्ताकभाई , ऐसेंही लगे रहो, हम आपके साथ है ...........

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.