स्पेशल रिपोर्ट

गोंदियाची कलिंगडं चालली फॉरीनला

ब्युरो रिपोर्ट, चिचटोला, गोंदिया
उन्हाळ्याच्या काहिलीत तहान भागवायची म्हटलं तर मस्त थंडगार लालचुटूक कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. याच कलिंगडांनी केवळ तहान न भागवता सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोला गावातील टिकाराम गहाणे या प्रयोगशील शेतकऱ्याला धनवानही बनवलंय.  त्यांची ही कलिंगडाची शेती फळाला येऊन भरघोस उत्पन्नही देऊ लागलीय. त्यांचा आदर्श घेत तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनीही २५० हेक्टरवर कलिंगडाची लागवड केलीय. राज्यभरातून या कलिंगडांना चांगली मागणी तर आहेच, याशिवाय गोंदियाची ही कलिंगडं आता परदेशाचीही तहान भागवण्यास रवाना झाली आहेत.
 


 

६० हजार वेलींची लागवड
गहाणे यांनी यंदा आपल्या १० एकरावर ही कलिंगडाची लागवड केली आहे. त्यांनी आपल्या शेतीत तब्बल ६० हजार कलिंगडाच्या वेलींची लागवड केलीय. मागील वर्षी त्यांनी केवळ तीन एकरांवर लागवड केली होती.  यासाठी त्यांनी जानेवारीत या वेलींची लागवड केली. गहाणे यांनी कलिंगडाच्या तीन प्रजातींच्या वेली लावल्या आहेत.  लागवड करण्याच्या अगोदर त्यांनी नागर्ती केली. प्रती एकरी एक ट्रॉली शेणखत, ५० किलो पोट्याश तर २५ किलो डीएपी टाकलं. या कलिंगडाच्या लागवडीकरता त्यांना एकरी केवळ २५ हजारांचा खर्च आला. मुळात हे कलिंगडाचं पीक तीन ते सव्वातीन महिन्यांचं आहे.

 

Kalingad finalठिबक सिंचनाचा अधिकाधिक वापर
आपल्या या कलिंगडाच्या लागवडीसाठी त्यांनी पाण्याचं योग्य नियोजन करत ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त अवलंब केला आहे. जवळजवळ सहा एकरवरील लागवडीसाठी त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केलाय. तर उर्वरित प्लाण्टमध्ये पाटपाण्याचा वापर केलाय. गोंदिया जिल्ह्यात पाणी मुबलक आहे. गहाणे आपल्या शेतात दर तीन दिवसांनी पाणी देतात. तसंच दर तीन दिवसांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून १२०६१ हे खत देतात.

 

तीन प्रजातींची लागवड
कलिंगडाचं हे पीक घेण्यासाठी त्यांनी अगस्ता, सुगरकेन आणि अंदमान या तीन प्रजातींची लागवड केलीय. त्यातील आठ एकरावर अगस्ता, तर उर्वरित दोन एकरांवर त्यांनी अंदमान आणि सुगरकेन या प्रजातींची लागवड केली आहे.

 

Kalingad 2 bharat4india.comएकरी २२ टन उत्पादन
गहाणे यांनी कलिंगडाच्या वेलींची लागवड संपूर्णपणं झिकझ्याक पद्धतीनं केली आहे.  गहाणे यांना यंदा आपल्या या कलिंगडाच्या शेतीतून एकरी २२ टन उत्पादन अपेक्षित आहे. बाजारात ते सहा ते साडेसहा रुपये प्रती किलोच्या हिशेबानं कलिंगडाची विक्री करतात. गहाणे यांना आपण केलेल्या या कलिंगडाच्या लागवडीतून एकरी दोन लाखांचा नफा अपेक्षित आहे. आपल्या उत्पादनात अधिकाधिक भर पडावी यासाठी ते कृषी विभागाकडून वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन घेत असतात. कलिंगडाच्या पिकावर नागअळी, लष्कर अळी इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं होतो. या रोगांपासून पिकाचं रक्षण करण्याकरता गहाणे रिजेंत डी-६ याची फवारणी करतात. यासाठी त्यांना स्थानिक कृषी अधिकाऱ्यांकडून नेहमी याबाबत मार्गदर्शन मिळतं.

 

Kalingad 4 bharat4india.comएकरी ९६ हजारांचा नफा
गहाणे यांना आता शेतीव्यवसायात त्यांच्या चिरंजीवांचीही साथ मिळाल्यानं त्यांना एक हक्काचा हातही मिळालाय. गहाणे बाहेरील व्यापाऱ्यांना टनाच्या हिशेबानं विक्री करतात. यंदा त्यांना प्रती टन साडेचार हजार रुपयांप्रमाणं भाव मिळण्याची अपेक्षा आहे. एकरी २५ हजार रुपयांचा लागवडीचा खर्च वगळता त्यांना तब्बल एकरी ९६ हजारांचा नफा मिळतो. म्हणजे या हिशेबानं दहा एकरातून तब्बल नऊ लाख पासष्ठ हजारांचा निव्वळ नफा त्यांना मिळतो तेही केवळ साडेतीन महिन्यांत.

 

Kalingad 6 bharat4india.com

दुबई आणि अमेरिकेतही निर्यात
भंडारा येथील एक व्यापारी गहाणे यांच्याकडून कलिंगडाचं पीक विकत घेतो.  शिवाय या व्यापाऱ्याच्या  माध्यमाद्वारे ते आपली कलिंगडं देशातील इतर राज्यात विक्रीकरता पाठवतात.  त्याचबरोबर या माध्यमातून त्यांची कलिंगडं दुबई आणि अमेरिकेतही निर्यात केली जात आहेत. गहाणे यांची कलिंगडाच्या शेतीतील प्रगती पाहून तालुक्यातील बरेच शेतकरी आता त्यांचं मार्गदर्शन घेऊ लागलेत. आणि पारंपरिक पीक पद्धतीपेक्षा कलिंगडाची शेती करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. आपल्या प्रयोगशीलतेमुळं गहाणे हे परिसरातील इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करत आहेत.

 

 

 

 

 

Kalingad 1 bharat4india.comKalingad 3 bharat4india.comKalingad 5 bharat4india.com


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.