स्पेशल रिपोर्ट

आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई!

मुश्ताक खान, गुहागर, रत्नागिरी
कोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क पपईची लागवड केलीय. आपल्या चार एकर शेतीत पपईचं आंतरपीक घेण्याचा प्रयोग यशस्वी करून त्यांनी चांगला नफाही कमावलाय. ही त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी अवघ्या कोकणातून शेतकरी येतात आणि आपणही असा प्रयोग करून बघू, असा संकल्प करूनच इथून निघतात. त्यामुळं नजीकच्या काळात कोकणात पपईचं भरघोस उत्पादन होण्याचीच ही नांदी म्हणावी लागेल.
 

पपई या फळाचा वापर अनेक प्रकारानं केला जातो. केक, जाम, जेली, बिअर, च्युईंगममध्ये पपईचा वापर तर होतोच, शिवाय व्हिटॅमिन 'ए'नं परिपूर्ण असलेली पपई पित्तशामक म्हणूनही अतिशय उपयुक्त आहे. अशाच या पपईचं आता कोकणातही उत्पादन घेतलं जातंय. गुहागरचे बागायतदार गजानन पवार हे गेल्या तीन वर्षांपासून आपल्या बागेत पपईचं पीक घेतायत. आंबा आणि काजू यांच्यातलं आंतरपीक म्हणून ते हे पपईचं पीक घेतायत.

 

Papaya 17.pngकोकणात पपईला पोषक वातावरण
पपईच्या पिकासाठी पोषक वातावरण म्हणजे उष्णकटिबंध प्रदेश, उष्ण हवामानात पपईची वाढ चांगली होते. त्यामुळं कोकणासारख्या प्रदेशात जिथं तपमान ३५ डिग्रीपर्यंत असतं, तिथं पपईचं पीक चांगलं होऊ शकतं. पपईच्या एका रोपाची किंमत १६ रुपये आहे आणि ही झाडं शंभर टक्के रुजणारी आहेत, म्हणूनच आपण पपईचं पीक घेण्याचा प्रयत्न केला असल्याचं बागायतदार गजानन पवार म्हणतात. मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पपईची रोपं तयार होत नसल्यानं ती पुण्यातून मागवावी लागत असल्याचंही पवार सांगतात.

 

ठिबक सिंचनाचा वापर फायदेशीरच
ज्याप्रमाणं शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. त्याचप्रमाणं आता बागायतदारही पुढं सरसावलेत. पाण्याचं योग्य नियोजन करत तंत्रज्ञानाचा वापर करतायेत. त्यामुळं आपल्या बागेतल्या पपईच्या पिकाला पाटानं पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन पद्धतीनं दिलं जात असल्याचं बागेचे व्यवस्थापक दिलीप सुर्वे सांगतात. यामागचं कारण स्पष्ट करताना सुर्वे म्हणतात, "ही पपईची झाडं दोन वर्षांची असल्यापासून मी एकटा याची निगा राखू शकतोय, ठिबकाचा वापर केल्यामुळं पाण्याची नासाडीही कमी होते आणि झाडाला फळंही मोठ्या आकाराची लागतात.”

 

Papaya 5.pngबारमाही पीक असल्यानं आर्थिक अडचण नाही
पपईचं आंतरपीक म्हणून लागवड करण्यात आल्यानं पपईला देण्यात येणाऱ्या विविध औषधांचा फायदा नारळ, काजू आणि आंबा इत्यादी पिकांनाही होत असून त्यांच्या उत्पादनातही वाढ होतेय. शिवाय जर हवामानबदलामुळं आंबा आणि काजूला जरी फळधारणा झाली नाही, तरी पपईचं उत्पादन मात्र कायम घेता येतं. इथं हवामानबदलामुळं पपईची नासाडी होण्याची भीती नसते. ते बारमाही पीक असल्यानं आर्थिक अडचणही येत नाही, असं पवार आवर्जून सांगतात.

 

सेंद्रीय खताचा केला अवलंब
गुहागरमध्ये गेल्या तीन वर्षांपासून तायवान जातीच्या पपयांची शेती करणाऱ्या गजानन पवार यांनी येणाऱ्या काळात सेंद्रीय शेती करण्याचं ठरवलंय. इतर जातींपेक्षा सेंद्रीय पद्धतीच्या गावठी पपईला बाजारात जास्त मागणी आहे. त्यामुळं आता हे फळ परदेशात पाठवण्याचाही त्यांचा मानस आहे. त्यासाठी लागणारी उत्तम क्वालिटी घेण्याचा पवार प्रयत्न करतायेत.

 

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, प.बंगाल, मध्य प्रदेश, बिहार इत्यादी राज्यांमध्ये पपईची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. कोकणातही पपईची लागवड वाढल्यास इथल्या शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळतील, असा विश्वासही पवारांना आहे.

 

Papaya 9.pngचारुशीलाताईंनी केला पपईचा पुरेपूर वापर
पपईचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी तर होतोच, शिवाय पपईच्या पेपेनपासून जालीम औषधंही तयार केली जातात. एवढंच नाहीतर कातडी कमावण्यासाठी, लोकर आणि रेशीम उद्योगातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पपईपासून बनवलेला जाम तर चवदार आहे की, पाहुण्यांना खाण्यास दिला तर त्यांना हा पपईचा जाम आहे हे सांगितल्यानंतर कळतं. पण सगळ्यांना तो खूप आवडतो, असं पपईपासून वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या चारुशीला पवार सांगतात.

 

  • Papaya 16.pngऔषधीयुक्त पपई
  • व्हिटॅमिन 'ए' युक्त पपई
  • पाचक
  • पित्तशामक
  • मूळव्याधींच्या मोडांना पपईचा चीक लावल्यास ते गळून पडतं
  • जेवणानंतर खाल्ल्यानं आम्लपित्तावर अत्यंत गुणकारी
  • पपईच्या हिरव्या फळात ९२ टक्के पाणी, ४.५ टक्के कार्बोहायड्रेट्स, १ टक्के पेक्टीन आणि १- ०.५ टक्के पेपेन असतं.
  • तर पिकलेल्या फळात ८९ टक्के पाणी, ८.२ टक्के साखर, ०.५ टक्के प्रथिनं असतात.  

 

अशा या गुणकारी पपईच्या लागवडीकडं शंभर टक्के रुजणारी आणि किफायतशीर शेती म्हणून बघितलं जातंय, असं पवार कुटुंबीय आवर्जून म्हणतात. 

संपर्क – गजानन पवार, प्रयोगशील शेतकरी, गुहागर, रत्नागिरी – 09404765698

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.