भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती आणि शेतीसंबंधित कामं अल्प खर्चात, कमी मनुष्यबळात, सहजसोपी कशी होतील, हे आज आपल्यापुढंच आव्हान आहे. मातीत राबणाऱ्या हजारो हातांनी वेळोवेळी अनेक उपकरणं निर्माण केलीत. परंतु कालानुरूप होणाऱ्या बदलांमध्ये नावीन्यपूर्ण कल्पनांची गरज नेहमीच असते. गवताचं आगार असणाऱ्या कोकणात भेडसावणाऱ्या गवत बांधणीवर असाच कल्पनेचा उतारा शोधून काढलाय रत्नागिरीजवळच्या कुडावळे इथल्या विनय महाजन या शेतकऱ्यानं. उन्हाळ्यातही गुरांसाठीचं गवत मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी या गवत बांधणी यंत्राची निर्मिती केलीय. हे यंत्र एका ठिकाणाहून दुसरीकडं सहजगत्या हलवता येतं. शिवाय पारंपरिक यंत्राच्या तुलनेत याची गवत बांधण्याची क्षमता अडीच पट जास्त असल्याचं महाजन यांनी 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं.
पारंपरिक यंत्र वापरण्यास खर्चिक
पूर्वी काळात वाड्याच्या बाजूलाच असलेल्या गोठ्यात गुरं बांधलेली असायची. त्यामुळं गवत जमा करून तिथंच ठेवता येत होतं. आता परिस्थिती बदलली आहे. गवत घेऊन जायचं अंतर वाढलं आहे. चारा जर गुरांपर्यंत घेऊन जायचा झाला तर खर्च खूप येतो. त्यामुळं एकदाच गवत बांधायचं आणि पूर्ण उन्हाळाभर ते वापरायचं अशी संकल्पना पुढे आली. यामधूनच गवत बांधणी यंत्राची निर्मिती झाली. पण ही यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नव्हती. त्यामुळं ज्या ठिकाणी हे यंत्र आहे तिथं हे गवत घेऊन जावं लागत होतं. त्याचबरोबर या एका गाठोड्याचं वजनही जवळपास ४० किलोपर्यंत भरलं जाई. हे ओझं वाहून नेणं फार कठीण होतं. शिवाय ते एका माणसाला उचलता येणं शक्य नसल्यानं खर्चही वाढत होता. त्याचप्रमाणं आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार एक गाठोडं २० किलोपर्यंतचं असावं अशी अट आहे. त्यामुळं दोन्ही बाजूनं विचार केल्यास या पारंपरिक यंत्रापासून फायद्यापेक्षा तोटेच दिसत होते.
हलवण्यास सोपं आणि किफायतशीर
शेतकऱ्यांसाठी खर्चाच्या दृष्टीनं फायदेशीर व्हावं, अधिकाधिक गवत व्यवस्थित आणि घट्ट बांधलं जावं, याशिवाय हे यंत्र वजनानं हलकं असावं, त्याचबरोबर हे बांधणी यंत्र एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलवता येणं सुलभ व्हावं या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या यंत्राची निर्मिती केली पाहिजे, असा विचार कुडावळेच्या विनय महाजन या शेतकऱ्याच्या मनात रेंगाळू लागला. मग त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला चालना देत लोखंडी पाईपाचा पाया रचत, चार बांबू आणि दोन स्कूटरच्या क्लच केबलचा वापर करून त्यांनी या यंत्राची निर्मिती केली. त्यांनी निर्मिती केलेलं हे यंत्र आता हलवायला अतिशय सोपं असल्यामुळं जिथं गवत उपलब्ध आहे अशा ठिकाणी हे यंत्र वाहून नेणं सुलभ आहे, कारण ते पाडताही येतं. शेतकऱ्यांना सोयीस्कर अशा या गवत बांधणी यंत्रावरून ‘गरज ही शोधाची जननी आहे’ हे पुन्हा एकदा प्रकर्षानं स्पष्ट झालंय.
गवत बांधणीस कमी मनुष्यबळ
कॉम्पॅक्ट वरंड (गवताचं गाठोडं) तयार करण्यासाठी केवळ एकाच माणसाची गरज लागते. त्यामुळं जेव्हा गवत मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं, तेव्हा त्याच्या गाठोडी तयार करून ठेवल्या जातात. याशिवाय या गवत बांधणी यंत्राची गवत बांधणी क्षमता पारंपरिक यंत्राच्या क्षमतेपेक्षा अडीचपट जास्त असल्यामुळं गवत अधिक वेगात बांधून होतं. नंतरच्या काळात गवताच्या मागणीनुसार ६० रुपये एक वरंड याप्रमाणं या गवताची विक्रीही करता येते. या गवत विक्रीतून काही फायदा जरी होत नसला तरी आपल्या जागेत वाढलेल्या गवताची स्वच्छता करता येते आणि काही पैसेही वसूल करता येतात. त्याचबरोबर उन्हाळ्यात गुरांसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होतो, असं महाजन यांनी सांगितलं.
संपर्क – विनय महाजन : 8149282405
Comments
- No comments found