दरवर्षी एप्रिल- मे महिन्यात कोकणातील विविध ठिकाणी लाखो पर्यटक भेट देत असतात. या पर्यटनातून इतर व्यवसायांबरोबरच आता शेतकऱ्यांनाही नफा कमावता येतोय. कमी वेळेत येणारं आणि या उष्ण हवामानात पर्यटकांसाठी उपयुक्त ठरेल असं कलिंगड आणि स्वीटकॉर्नचं पीक इथला शेतकरी घेऊ लागलाय. समूह गटांमार्फत 10 -15 शेतकऱ्यांना एकत्र करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणं त्यामुळं शक्य झालंय.
'मधुबाला' कलिंगडाला विशेष पसंती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी इथले शेतकरी संतोष आंजर्लेकर यांनी 30 गुंठ्यांमध्ये 'मधुबाला' जातीच्या कलिंगडाची लागवड केली आहे. हेक्टरी 35 टन उत्पादन देणाऱ्या या कलिंगडाला पर्यटकांकडून चांगली मागणी असते. म्हणजे इथंही ते ‘मधुबाला’च्या प्रेमातच पडतात. गेल्या महिन्यात कलिंगडाला प्रती किलो 15 रुपये दर मिळत होता. आता त्याचा सीझन संपत आल्यामुळं दर पुन्हा एकदा वधारले असून सध्या कलिंगडाला इथं प्रती किलो 25 रुपये भाव मिळतोय. त्यामुळं उशिरा लागवड केली तर हेक्टरी साडेतीन लाख रुपये जास्तीचे पैसे सहज मिळवता येऊ शकतात. संतोष आंजर्लेकरांनीही तोच फंडा राबवलाय. याच जोडीला त्यात त्यांनी कलिंगडाची सेंद्रीय शेती केल्यामुळं त्याचा स्वादही पर्यटकांना चांगलाच आवडतोय.
पर्यटकांची स्वीटकॉर्नलाही मागणी
कलिंगडाची लागवड या परिसरात तर झाली आहे, पण त्याचबरोबर गेल्या 15-20 वर्षांपूर्वी भारतात दाखल झालेल्या आणि पर्यटकांची खास पसंती असलेल्या स्वीटकॉर्नची अर्थात अमेरिकन मक्याची लागवडही इथं होऊ लागलीय. इथलेच शेतकरी उदय जोशी यांनी आपल्या शेतात ही स्वीटकॉर्नची लागवड केलीय. कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा विचार करूनच त्यांनी ही स्वीटकॉर्नची लागवड थोडी उशिराच केली आहे. सुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या केळशीमध्ये उन्हाळ्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होत असते. त्याचा विचार करून लागवड करण्यात आलेल्या पिकांच्या काढणीचा हंगाम येणाऱ्या 10 दिवसांत सुरू होईल, असं जोशी यांनी सांगितलं. स्वीटकॉर्न 65 ते 80 दिवसांत येणारं पीक आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना 42 दिवस तरी त्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल अशीच आखणी करण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लागवड केलेल्या स्वीटकॉर्नला स्थानिक बाजारात चांगली मागणी आहे. स्वीटकॉर्नची गरज भागवेल एवढ्याच पिकाचं त्यांनी आपल्या शेतीत नियोजन केलेय. स्वीटकॉर्नच्या एक किलो बियाणांची किंमत 2000रु. आहे. शिवाय मक्याची योग्य निगा राखली तर त्याच्या माध्यमातून 22 ते 28 हजार रुपये सहज मिळवता येऊ शकतात, असं उदय जोशी यांनी स्पष्ट केलं.
कृषी खात्याकडूनही शेतकऱ्यांना प्रोत्साहन
कृषी खात्यानंही इथल्या शेतकऱ्यांना चांगलं प्रोत्साहन दिलं आहे. समूह गटांमार्फत 10 -15 शेतकऱ्यांना एकत्र करून कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं घेतलं जाऊ शकतं याबाबत कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केलं जातंय. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात कृषी खातं विशेष प्रयत्न करत असल्याची माहिती मंडल कृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी दिली.
आपल्या शेतात शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पिकं घेतली, तर त्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकतं हे केळशीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय.
संपर्क -: उदय जोशी - ०२३५८-२८७३८८
Comments
- No comments found